Girish mahajan Eknath Khadse
Girish mahajan Eknath Khadse  esakal
जळगाव

निमित्त... : खानदेश... मुख्यमंत्रिपद अन्‌ ‘सापशिडी’चा खेळ!

सकाळ वृत्तसेवा

Khandesh News: खानदेशला मुख्यमंत्रिपदाचा मुद्दा गेल्या काही दिवसांत या ना त्या कारणाने पुन्हा एकदा चर्चेला आला. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी राज ठाकरे यांनी सुरेशदादा जैन यांचा उल्लेख केल्यानंतर काल- परवा एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन मुख्यमंत्री होत असतील, तर पाठिंब्याची भूमिका घेत या चर्चेला जागा करून दिली.

पोटेन्शिअल असूनही खानदेशातील नेत्यांना ‘सीएम’ पदाने नेहमी हुलकावणी दिली असल्याचे त्या- त्या वेळची पक्षांतर्गत कारणे वेगळी असली, तरी खानदेशातून या पदासाठी कधीही ‘लॉबिंग’ झाले नाही, हे वास्तवही नाकारून चालणार नाही. (Khandesh Chief Ministership and snake ladder game jalgaon monday column by sachin joshi news)

खानदेश आणि पर्यायाने जळगाव जिल्हाही राज्याचे नेतृत्व करण्याबाबत नेहमीच कमनशिबी ठरलाय. अगदी सुरवातीच्या काळापासून गेल्या चार-पाच दशकांत खानदेशने राज्यात प्रभावी ठरतील असे अनेक नेते दिले.

प्रतिभाताई पाटलांपासून (कै.) मधुकरराव चौधरी, जे. टी. महाजन, अरुणभाई गुजराथी आणि अलीकडच्या काळात धुळ्यातून रोहिदास पाटील, सुरेशदादा जैन, एकनाथ खडसे अशी अनेक नावे घेतली जातील.

फडणवीस सरकारच्या काळात त्यांचे निकटवर्तीय गिरीश महाजन यांना तेव्हा आणि आताच्या शिंदे मंत्रिमंडळातही उत्तर महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची संधी प्राप्त झाली.

यापैकी प्रत्येक नेत्याने त्यांना मिळालेल्या संधीला न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि आपल्या भागाच्या नेतृत्वाचा प्रभावही दाखवून दिला.

पक्षीय राजकारण करताना मात्र यापैकी कोणत्याही नेत्याला जिल्ह्यातून अथवा खानदेश, उत्तर महाराष्ट्रातून सर्वपक्षीय नेत्यांचे सर्वव्यापी समर्थन कधीही मिळू शकले नाही.

बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांनी शिक्षणमंत्री असताना शैक्षणिक संस्थांचे मोठे जाळे उभारले. शिक्षण महर्षी म्हणूनही त्यांचा नामोल्लेख झाला, पण राज्यातून मुख्यमंत्रिपदासाठी त्यांच्या नावाचा विचार झाला नाही.

विधानसभेचे अध्यक्ष म्हणून त्यांच्यासह अरुणभाईंनाही संधी मिळाली. त्या संधीचे त्यांनी सोनेच केले. निष्ठेचे प्रतीक असलेल्या प्रतिभाताई पाटलांना देशाच्या सर्वोच्च राष्ट्रपतिपदावर विराजमान होण्याचा सन्मान मिळाला खरा, पण त्यातून जिल्ह्याचे अथवा खानदेशचे विकासात्मकदृष्ट्या भले होण्याची शक्यता नव्हती.

युती शासनाच्या काळात खडसेंना उच्च व तंत्र शिक्षण, अर्थ व नियोजन आणि पाटबंधारे अशी मोठी खाती मिळाली. प्रशासनावर वचक असलेला लोकनेता म्हणून त्यांची प्रतिमा या मंत्रिपदाने अधिक उजळली.

याच काळात जिल्ह्याचे पर्यायी नेतृत्व म्हणून सुरेशदादा जैन यांचे नाव होते. मात्र, खडसे- जैनांचे राजकीयदृष्ट्या कधीही ‘जमले’ नाही. १९९९ मध्ये युतीचे सरकार काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीने हिरावले.

त्या वेळी आघाडीतील काही आमदारांना सोबत घेऊन सुरेशदादा जैनांना मुख्यमंत्री करावे, असा प्रस्ताव भाजपच्या काही नेत्यांनी बाळासाहेब ठाकरेंसमोर पेश केल्याचा दावा केला. मात्र, ‘मराठी माणूस’ या प्राधान्यातून ठाकरेंनी तो नाकारल्याचा दावा नुकताच राज ठाकरेंनी केला. त्यामुळे त्या वेळीही खानदेशची संधी थोडक्यात हुकली.

धुळ्याच्या रोहिदास दाजींसमोर ही संधी एक-दोनदा आली. मात्र, काँग्रेसच्या एकूणच नेता निवडीच्या ‘गोंधळी’ प्रक्रियेमुळे त्यांचीही संधी हुकली.

२०१४ ला महाराष्ट्र भाजपने तत्कालीन विरोधी पक्षनेते खडसे यांच्या नेतृत्वात विधानसभा लढली आणि जिंकलीही, पण शीर्ष नेतृत्वाने खडसेंऐवजी फडणवीसांना ‘सीएम’ करत खानदेशला पुन्हा या पदापासून वंचित ठेवले. पोटेन्शिअल असूनही श्री. खडसे मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

या प्रत्येक हुकलेल्या संधीच्या वेळी त्या-त्या पक्षांच्या नेतृत्वाने खरेतर खानदेशवर अन्यायच केला, पण दुसऱ्या बाजूला ज्यांच्यासाठी ही संधी चालून आली त्या नावांना खानदेशातून स्वपक्षीय व अन्य पक्षातील आमदारांनी त्यांच्यासाठी ‘लॉबिंग’ केले नाही, ही वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही.

उलटपक्षी या नावांना आपल्याच भागातून विरोध झाल्याचे दिसून येते. त्यामुळे सापशिडीच्या खेळाप्रमाणे खानदेशातील नेते ‘सीएम’पदापर्यंतची शिडी वेळोवेळी चढले खरे, मात्र ‘९०’ क्रमाकांच्या पुढच्या घरात गेल्यानंतर कुठल्या तरी अंतर्गत अथवा बाह्य सापाने त्यांना पुन्हा खालच्या घरात आणून सोडले, हे लपून राहिलेले नाही.

आता खडसेंनी मुख्यमंत्रिपद महाजनांना मिळत असेल, तर आपले नेहमीच त्यासाठी समर्थन असेल, असे वक्तव्य करून या चर्चेला नव्याने तोंड फोडलेय. मुळात, खडसे- महाजनांमधून विस्तवही जात नाही, अशी स्थिती गेल्या आठ- दहा वर्षांपासून आहे. एकाच पक्षात आणि आता विरोधी पक्षांत असतानाही दोघांच्या ‘बाह्या आवरलेल्या’ असतात.

एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी दोघे सोडत नाहीत. असे असताना खडसेंनी महाजनांना ‘सीएम’पदासाठी पाठिंबा देण्याची भाषा करणे आश्‍चर्यकारकच आहे. असो, पण यानिमित्त मुख्यमंत्रिपद अन्‌ खानदेश या नात्याचा महिनाभरात दोनदा उल्लेख झाला अन्‌ चर्चाही, हेही नसे थोडके!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs KKR Live Score: केएल राहुलने जिंकला टॉस, लखनौ संघात मोठा बदल; जाणून घ्या दोन्ही संघांची प्लेइंग-11

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

SCROLL FOR NEXT