मेहुणबारे (ता.चाळीसगाव) : यावर्षी चाळीसगाव तालुक्यात समाधानकारक पाऊस झाला असल्याने पाण्याची खात्रीही शेतकऱ्यांना आहे. यामुळे अनेक शेतकरी कांदा पिकाकडे वळले आहेत. डिसेंबरच्या सुरवातीला उन्हाळी कांदा लागवड करण्यास गिरणा पट्ट्यात सुरवात झाली आहे. मागील वर्षी चाळीसगाव तालुक्यात दोन हजार हेक्टरवर कांदा लागवड झाली असली तरी यावर्षी एक हजार हेक्टरवर म्हणजे तीन हजार हेक्टर कांदा लागवड होणार असल्याचे तालुका कृषी विभागाच्या सुत्रांनी सांगितले आहे. महागडी कांदा बियाणे खरेदी करुन कांदा रोपे तयार केली आहे.कांद्याला पुढील वर्षी चांगला भाव मिळेल या आशेने शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या असून कांदा लागवडीत वाढ होणार आहे.
चाळीसगाव तालुक्यात यावर्षी पाऊस चांगला असल्याने पाण्याची देखील शेतकऱ्यांना शाश्वती आहे. बेभरवशाचे पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कांद्याकडे शेतकरी पुन्हा एकदा वळले आहेत. अवकाळीच्या फटक्याने शेतकऱ्यांनी आता कांदा लागवडीवर भर दिला आहे. तालुक्यात मागीलवर्षी दोन हजार हेक्टरवर उन्हाळी काद्यांची लागवड झाली होती. यावर्षी ही लागवड वाढली असुन तालुका कृषी कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार 3 हजार हेक्टरवर उन्हाळी कांदा लागवड होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तवली आहे.
कांदा पिकाकडे वळले
चाळीसगाव तालुक्याचे एकूण क्षेत्र 95 हजार हेक्टर असून यात ऊस, मका, केळी आदी पिके घेतली जातात.तीन वर्षापुर्वी असलेली दुष्काळी परिस्थिती, पाण्याच्या दुर्भिक्ष्यामुळे इतर पिकांबरोबरच बागायती पिकांनाही धोका निर्माण झाला होता.गेल्या दोन वर्षापासून चाळीसगाव तालुक्यात पाऊस चांगला झालेला असल्याने बहुतांश शेतकरी आता कांदा पिकाकडे वळले आहेत.गिरणा पट्ट्यात कांदा लागवड सुरुच झाली असल्याने आता मजुरांना देखील हाताला काम मिळाले आहे.कादा लागवड वाढणार असल्याचे तालुका कृषी अधिकारी सी.डी साठे यांनी यावेळी सांगितले.
किरकोळ बाजारात वीस ते तीस रुपये किलो
कांद्याला सध्या मोठी मागणी केली जात असून किरकोळ बाजारात कांद्याचे दर 20 ते 30 रुपये किलो दराने विक्री होत आहे.आजही सर्व सामान्य व्यक्ती कांद्याचे भाव पाहुन कांदा घेणे टाळत असले तरी खराब कांदा देखील बाजारात विकला जात आहे.यामुळे चांगला कांदा हा आजच्या घडीला घेणे परवडत नसल्याचे सर्व सामान्य ग्राहकाचे म्हणने आहे.आठ दिवसापासून वातावरणात बदल झाल्याने कांदा रोपे ही खराब होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. महागडी बियाणे खरेदी करून शेतकऱ्यांनी कांदा रोपे तयार केली आहेत. रोपांच्या उपलब्धतेनुसार लागवडी ह्या टप्प्याटप्प्याने केल्या जात आहेत. ज्या भागात कांदा लागवडी होत नव्हत्या, त्याभागातही लागवड क्षेत्र वाढले आहे.कांदा उत्पादनात अग्रेसर असलेल्या नाशिक जिल्ह्यात कांदा लागवडीखालील क्षेत्र तब्बल सातपटीने वाढले आहे.
शेतकऱ्यांचा कल वाढला
नाशिक, नादगाव, मनमाड, चांदवड या भागातील शेतकरी यापूर्वी कांदा लागवडीसाठी गिरणा पट्यात येत असत; मात्र यावर्षी त्यांच्या भागात मुबलक पाणी असल्याने त्या शेतकऱ्यांनी या भागात कांदा लागवडीसाठी येण्यास निरुउत्साह दाखवला आहे. यावर्षी नोव्हेंबर व डीसेंबर महिन्यात कांदा दर वधारल्याचे पाहायला मिळाले. चालू वर्षी पर्जन्यमान चांगले असल्याने कांदा लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.
ढगाळ वातावरणाचा परिणाम
हिवाळ्यात देखील पाहिजे तशी थंडी न पडल्याने व ढगाळ वातावरण, वातावरणातील दमटपणा आदी कारणांमुळे कांदा उगवणशक्तीवर काही ठिकाणी परिणाम झाला. तर दमटपणामुळे कोवळ्या रोपांची चांगली वाढ झाली नाही. त्यामध्येही जी रोपे तग धरून उभी होती तीच रोपे लागवड झाली.काही रोपे सुरवातीला धुक्यामुळे पांढरी पडली होती, कांद्याची पात पूर्णतः खराब झाली होती. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी अपेक्षीत केलेली लागवड देखील या रोपांपासून होणे शक्य नसल्याने काहीना रोपे विकत आणावी लागली.अधुनमधून होत असलेल्या ढगाळ वातावरणामुळे कांदा उत्पादक चिंतीत झाले आहेत.
संपादन ः राजेश सोनवणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.