girna river dam
girna river dam 
जळगाव

चार वेळा सर्व प्रकल्प भरतील; ऐवढे पाणी गेले वाहून 

सुधाकर पाटील

भडगाव (जळगाव) : यंदाच्या पावसाळ्यात गिरणा व तापी नदीतून किती पाणी वाया गेले असेल, हे ऐकाल तर तुम्हीही थक्क व्हाल! तीन महिन्यांत या दोन्ही नद्यांमधून तब्बल पाच हजार ९२७ दशलक्ष घनमीटर एवढा पाण्याचा विसर्ग झाला. एवढ्या पाण्यात जळगाव जिल्ह्यातील तीन मोठे, १३ मध्यम व ९६ लघुप्रकल्प तब्बल चारवेळा भरले असते. मात्र, एवढे पाणी सर्वांच्या डोळ्यादेखत वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आम्ही आमच्या हक्काचे पाणी केव्हा अडवणार आहोत, असा प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. 
जळगाव जिल्ह्यातून तापी व गिरणा या दोन प्रमुख नद्या वाहतात. गिरणा नदीवर नाशिक जिल्ह्यात गिरणा धरण आहे, तर तापीवर हतनूर प्रकल्प आहे. ते भरल्यावर पाणी पुढे कुठेच अडविण्याची सोय नसल्याने ओव्हरफ्लो होणारे पाणी दर वर्षी वाया जाते. मात्र, या वाया जाणाऱ्या पाण्याचे कुणालाच काही सोयरेसुतक नाही, ही वस्तुस्थिती आहे. 
जळगाव जिल्ह्यातील सर्व प्रकल्पांची साठवण क्षमता एक हजार ४२७ दशलक्ष घनमीटर म्हणजेच ५०.४० टीएमसी इतकी आहे. गिरणा धरणाची साठवण क्षमता ६०८ दशलक्ष घनमीटर आहे. मात्र, यंदा पावसाळ्यात गिरणा धरणातून आतापर्यंत ९६५ दशलक्ष घनमीटर पाण्याचा विसर्ग झाला. तर हतनूर धरणातून शुक्रवार (ता. ९)पर्यंत चार हजार ९६२ दशलक्ष घनमीटर एवढे पाणी वाहून गेल्याचे आकडेवारी सांगते. 

पाणी अडविण्याची झोळी फाटकी... 
तापी नदीवर हतनूर प्रकल्पानंतर कुठेही अद्याप पाणी अडविण्याची व्यवस्था नाही. शेळगाव व पाडळसे प्रकल्पाचे काम बऱ्याच दिवसांपासून अपूर्णावस्थेत आहे. अर्थात, आता शेळगाव बॅरेजचे काम मार्गी लागू शकते. मात्र पाडळसे प्रकल्प अजूनही निधीकडे डोळे लावून बसला आहे. तर गिरणा नदीवर धरणानंतर कुठेही पाणी अडविले जात नाही. वरखेडे येथील प्रकल्पाला चालना मिळाली आहे. तर सात बलून बंधाऱ्यांना निधीची प्रतीक्षा आहे. त्यामुळे सध्या तरी गिरणा धरणाचा ओव्हरफ्लो हा वाया जात आहे. त्यामुळे यंदा एक वेळ गिरणा भरेल, इतके पाणी तीन महिन्यांत वाहून गेल्याचे पाहावयास मिळाले. पाणी अडविण्यासाठीची फाटकी झोळी केव्हा शिवली जाईल, असा प्रश्‍न आता शेतकरी उपस्थित करत आहेत. 

नद्याजोडला गती देण्याची गरज 
जळगाव जिल्ह्यातून पावसाळ्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाते. त्यामुळे हे पाणी नदीजोडच्या माध्यमातून इतर भागात वळविणे गरजेचे आहे. ज्या भागात पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे, अशा भागात हे पाणी वळवायला हवे. कालव्यांद्वारे हे ओव्हरफ्लो होणारे पाणी उपयोगात येऊ शकते. याशिवाय तापी व गिरणा नदीवरील प्रकल्पाला एकाचवेळी पूर्ण निधी देऊन ते पूर्णत्वास आणले पाहिजे. त्यामुळे हे पाणी त्या प्रकल्पात अडविणे शक्य होणार आहे. एकीकडे दुष्काळाचे चटके सहन करायचे अन् दुसरीकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात असेल, तर ते परवडणारे नाही. सर्वच पाणी अडविणे शक्य नसले तरी त्यातील ३०-४० टक्के पाणी अडविले तरी जिल्हा टँकरमुक्त होऊ शकतो. शिवाय जिल्हा सिंचनाने सुजलाम् सुफलाम् होईल, हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही. अर्थात, यासाठी लोकप्रतिनिधींची इच्छाशक्ती आणि यासाठी शासनाकडे रेट्याची आवश्यकता आहे. 

...तर जिल्ह्यात आबादानी 
जळगाव जिल्ह्यात गिरणा, हतनूर व वाघूर हे मोठे, तर १३ मध्यम प्रकल्प आहेत. याशिवाय ९६ लघुप्रकल्प आहेत. या सर्वांची एकूण साठवण क्षमताही एक हजार ४२७ दशलक्ष घनमीटरएवढी आहे. आतापर्यंत तापी व गिरणा नदीतून बाहेरच्या जिल्ह्यात तब्बल पाच हजार ९२७ दशलक्ष घनमीटर एवढे पाणी वाहून गेले. म्हणजेच जळगाव जिल्ह्यातील सर्व प्रकल्प किमान चार वेळा भरले असते, एवढे पाणी जिल्ह्याच्या सीमेतून दुसऱ्या जिल्ह्यात वाहून गेल्याचे पाण्याची आकडेवारी डोळ्यात अंजन घालणारी आहे. योग्य पद्धतीने हे वाया जाणारे पाणी अडविले गेले, तर जिल्ह्यात पाण्याच्या बाबतीत आबादानी पाहायला मिळणार आहे. 

तुझं आहे तुजपाशी परी जागा भुललासी... 
जळगाव जिल्ह्यात तापी आणि गिरणा या समृद्ध करणाऱ्या जीवनदायिनी प्रवास करतात. विषेश म्हणजे या दोन्ही प्रमुख नद्या वेगवेगळ्या भागांतून वाहतात. त्यामुळे या दोन्ही नद्यांचे पावसाळ्यात वाया जाणाऱ्या पाण्याला नदीजोडच्या माध्यमातून पाण्याचे दुर्भिक्ष्य असलेल्या भागात वळवले, तर गिरणा आणि तापी पट्ट्यातील इंचन् ‌इंच जमीन पाण्याखाली येऊ शकते. अर्थात, ‘तुझं आहे तुजपाशी, परी जागा भुललासी’ अशी गत आपली झाली आहे. गेल्या वर्षीही जिल्ह्यातून तब्बल दहा हजार दशलक्ष घनमीटर पाणी वाहून गेले होते. 

आकडे बोलतात.... 

- मोठे प्रकल्प.....................३ 
- मध्यम प्रकल्प..................१३ 
– लघुप्रकल्प......................९६ 
– गिरणा धरण क्षमता............६०८ (दशलक्ष घनमीटर) 
– हतनूर धरण क्षमता.............३८८ (दशलक्ष घनमीटर) 
– जिल्ह्यातील साठवण एकूण क्षमता ...१४२७ (दशलक्ष घनमीटर) 
– वाहून गेलेले पाणी.........५९२७ (दशलक्ष घनमीटर) 

संपादन ः राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT