पहूर (ता. जामनेर) : सरासरीपेक्षा अधिक झालेला पाऊस आणि पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून गावकऱ्यांनी दिलेले भरीव योगदान यामुळे गेल्या दहा वर्षांत यंदा प्रथमच पहूरकरांची पाण्यासाठी असलेली वणवण थांबली आहे. टॅकरमुक्तीचे दिलासादायक चित्र ग्रामस्थांनी अनुभवले असून, वाहून जाणारे लाखो लिटर्स पाणी अडविल्या गेल्यामुळे गाव खऱ्या अर्थाने पाणीदार बनले.
सततचा दुष्काळ आणि पाण्यासाठी होणारी भटकंती थांबावी, यासाठी गेल्या वर्षी फेब्रुवारीपासूनच पहूरकरांनी पाणी फाउंडेशनच्या सहकार्याने नदी खोलीकरण, नाला खोलीकरण, शोषखड्डे, शेततळे, बांधबंदिस्ती, चर खोदणे, वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन आदी उपक्रम प्रभावीपणे राबविले. गाळमुक्त धरण योजनेतून हजारो ट्रॅक्टर्स गाळ उपसण्यात आला. वाघूर नदीपात्रात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात खोलीकरण करण्यात आले. पहूर पेठ ग्रामपंचायतीच्या वतीने शिरपूर पॅटर्नच्या धर्तीवर काळ्या डोहाचे खोलीकरण करण्यात आले. बाहेरगावी असलेल्या भूमिपुत्रांनी आर्थिक योगदान दिले. गावकऱ्यांच्या एकजूटीमुळे पहूर पेठला १ लाख रुपयांचे बक्षीसही मिळाले. पहूर कसबे ग्रामपंचायतीच्या सहकार्याने शनिमंदीरा जवळ नदी खोलीकरणाचे मोठे काम झाले. परिणामी या वर्षी एकही कुपनलीका, विहीर तसेच आड भर उन्हाळ्यातही आटले नाहीत. गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या गोगडी धरणातही आजरोजी ३० ते ४० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
सरासरीपेक्षा अधिक पाऊस
गेल्या वर्षी पहूर परिसरासह जिल्हाभरात सरासरीपेक्षा अधिक पर्जन्यवृष्टी झाली होती. सर्वच प्रकल्प शंभर टक्के भरले होते. याचाच परिणाम म्हणून यंदा पाणीटंचाईच्या झळा जाणवल्या नाहीत. पहूर पेठ - कसबे दोन्ही गावात नियमित पाणीपुरवठा होत असल्याचे पहुरपेठच्या सरपंच निता रामेश्वर पाटील आणि पहूर कसबेच्या सरपंच ज्योती शंकर घोंगडे यांनी सांगितले.
चाळीस वर्षांत प्रथमच भूजलपातळीत वाढ
गेल्या वर्षी पावसाची विक्रमी नोंद झाली. वाघूर नदीला लहान मोठे तब्बल २० पेक्षा अधिक पूर गेले होते. नदीवर ठिकठिकाणी खोलीकरणाची कामे झाली होती. या सर्वांचा परिणाम म्हणून यंदा १०० ते १५० फुट भु-अंतर्गत पाणी पातळी वाढली. यामुळे शेतकऱ्यांना रब्बी हंगामात मका, गहू, हरभरा, ज्वारीचे भरधोस उत्पादन मिळाले. आणि महत्त्वाचे म्हणजे गावकऱ्यांची तहानही भागली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.