मालवण (सिंधुदुर्ग) - आघाडी सरकारच्या काळातच रस्त्यांची चाळण झाली हा... लोकांची कंबरडी मोडली...रस्त्यांवरून प्रवास करणारो प्रत्येकजण सरकारच्या नावानं शिव्या शाप देता...लोकांचे शाप खरे ठरांदे आणि या सरकार लवकरच खड्ड्यांमध्येच जावंदे...असा मालवणी बोलीभाषेत गाऱ्हाणे घालत तालुका भाजपच्यावतीने आज कसाल-मालवण खड्डेमय रस्तेप्रश्नी कुणकावळे येथे "खड्डेपुजा' आंदोलन छेडले.
आठ दिवसांत खड्डेमय रस्ता दुरुस्ती व डांबरीकरण काम सुरू न झाल्यास कोणतीही पूर्व सूचना न देता रस्त्यावर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा भाजप पदाधिकाऱ्यांनी दिला. भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, सभापती अजिंक्य पाताडे, भाजप युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस बाबा परब व उपसभापती राजू परुळेकर यांच्या नेतृत्वाखाली हे अनोखे लक्षवेधी आंदोलन प्रशासन व सत्ताधारी यांना जाग आणण्यासाठी छेडण्यात आले.
यावेळी तालुका सरचिटणीस महेश मांजरेकर, दादा नाईक, युवामोर्चा जिल्हा उपाध्यक्ष आशिष हडकर, राजन माणगावकर, महेश वाईरकर, मामा बांदिवडेकर, सतीश वाईरकर, मकरंद सावंत, विनीत भोजने, जयेंद्रथ परब, विजय निकम, चेतन मुसळे, जगदीश चव्हाण, सागर वाईरकर, समीर शेख, संजय पाताडे, बाबा कुबल, आबा पोखरणकर, अमित चव्हाण यासह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस बंदोबस्त होता.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंता पल्लवी मनसुख या आंदोलन स्थळी हजर झाल्या. कसाल-मालवण मार्गावर 24 किलोमीटर रस्ता विशेष दुरुस्तीअंतर्गत डांबरीकरणसाठी 4 कोटी 12 लाख निधी मंजूर असून कोल्हापूर येथील डी. आर. कन्स्ट्रक्शन यांना फेब्रुवारी 2020 मध्ये कार्यरंभ आदेश देण्यात आले. डांबरीकरण सुरवात झाली; मात्र लॉकडाऊन त्यानंतर निसर्ग चक्रीवादळ व पाऊस यात काम थांबले. त्यानंतर शासनाने 18 मेस प्रगतीपथावरील काम थांबवण्याचे आदेश दिले. त्यानुसार काम थांबले आहे. आम्ही काम सुरू करण्याबाबत परवानगी मागितली आहे. तोपर्यंत खड्डे बुजवण्याची कार्यवाही आम्ही सुरू करतो, असे लेखी पत्र बांधकाम अभियंता यांनी आंदोलनकर्त्यांना दिले; मात्र यावर भाजप पदाधिकाऱ्यांचे समाधान झाले नाही. अपघात घडून लोकांचे मृत्यू होण्याची वाट बांधकाम विभाग पाहत आहे का? असा सवाल तालुकाध्यक्ष चिंदरकर यांनी उपस्थित केला.
पदाधिकारी झाले आक्रमक
सभापती पाताडे व उपसभापती परुळेकर अधिकच आक्रमक बनले. बांधकाम विभाग व सत्ताधारी यांचे साटेलोटे आहे. ठेकेदारांची मर्जी सांभाळण्याचे काम बांधकाम विभाग करते आहे. सर्वसामान्य जनतेशी सत्ताधारी व बांधकाम विभाग यांचे काहीच देणेघेणे नाही का? असा संतप्त सवाल सभापती पाताडे यांनी उपस्थित केला. या कामाचा पोट ठेकेदार नेता कोण? असा सवाल उपसभापती परुळेकर यांनी उपस्थित करत सर्व काही जनतेला माहीत आहे, असे सांगत सत्ताधाऱ्यांना लक्ष केले.
संपादन - राहुल पाटील
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.