चिपळूण (रत्नागिरी) : पंचायत समितीच्या सभापती धनश्री शिंदे यांनी अखेर सभापतीपदाचा राजीनामा दिला. जिल्हा परिषदेच्या प्रभारी अध्यक्षांकडे त्यांनी राजीनामा सुपूर्द केला. गेल्या काही दिवसांपासून सभापतीपदावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चलबिचल सुरू आहे. महाविकास आघाडीत यावेळी सभापती पद राष्ट्रवादी काँग्रेसकडे राहणार आहे. त्यामुळे इच्छुक असलेल्या सदस्यांकडून मोर्चेबांधणीला सुरवात झाली आहे. काही महिन्यांपूर्वी कापसाळ गणाच्या सदस्या रिया कांबळी यांना सभापती पदाचा शब्द दिला होता.
तालुक्यात पंचायत समिती सभापतीपदी अद्याप बौद्ध समाजाला संधी मिळालेली नाही. या वेळेस कांबळींच्या रूपाने ती पूर्ण करावी, अशी मागणी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांमधून होऊ लागली आहे. दरम्यान, कोकरे गणाच्या सदस्या समीक्षा घडशी यांनीही सभापतीपदी संधी मिळण्याची मागणी केली आहे. सुरवातीला सभापती धनश्री शिंदे यांनाच मुदतवाढ देण्याचा निर्णय झाला होता. राष्ट्रवादीच्या अनेक सदस्यांनी त्याला पाठिंबाही दर्शवला होता; मात्र इच्छुकांनी उचल खाल्ल्याने ठरलेले गणित बिघडले आहे.
शिवसेनेच्या वरिष्ठांनी राजीनामा देण्याची सूचना केल्यानंतर सभापती शिंदे यांनी आज जिल्हा परिषद अध्यक्षांकडे आपला राजीनामा सुपूर्द केला आहे. सभापती शिंदेंनी आजच राजीनामा दिल्याने पुढील महिन्यात सभापतीपदाची निवडणूक लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, महाविकास आघाडीत उपसभापतीपद शिवसेनेकडे जाणार आहे. सेनेतही उपसभापती पदासाठी इच्छुकांची मांदियाळी आहे. एकाच व्यक्तीकडे दोन-दोन पदांचा भार नको, अशी भूमिका सेनेच्या काही सदस्यांनी खासगीत व्यक्त केली आहे. त्यावर शिवसेनेचे स्थानिक नेते कोणती भूमिका घेतात, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
माळी प्रभारीपदी
सभापती शिंदे यांनी राजीनामा दिल्याने पुढील निवडीपर्यंत उपसभापती पाडुरंग माळी यांच्याकडे प्रभारी सभापतीपदाचा कालावधी राहणार आहे.
संपादन - स्नेहल कदम
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.