The foundation of modern farming in Willowdale kokan marathi news
The foundation of modern farming in Willowdale kokan marathi news 
कोकण

'या शेतकरी युवकाने' वापरला नवीन फंडा आणि कमावले लाखो रुपये..

महेश चव्हाण

ओटवणे (सिंधुदुर्ग) : बीएससी हाॅर्टीकल्चरची पदवी संपादन केल्यानंतर शासकीय नोकरीच्या मागे न लागता वडिलांच्या पारंपरिक शेतीला आधुनिक रूप देण्याचे ध्येय बाळगून लाल मातीत उतरलेल्या प्रमोद राघोबा दळवी यांनी दिशादर्शक काम उभे केले आहे. विलवडे येथील आपल्या शेतात त्यांनी तब्बल 4 एकर क्षेत्रात प्लास्टिक मल्चींगवर कलींगड लागवड करून या ग्रामीण भागात आधुनिक शेतीचा पायंडा घालून दिला आहे. 

युवा प्रगतशील आणि उपक्रमशील शेतकरी म्हणून अल्पावधीतच नावारूपास आलेले प्रमोद दळवी यांचा हा नाविन्यपूर्ण शेती उपक्रम युवा शेतकऱ्यांसाठी आदर्शवद ठरत आहे. त्यांच्या या विविध उपक्रमशील शेती व्यवसायामुळे गतवर्षी त्यांना राज्यस्तरीय वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पूरस्कार देऊन गौरविण्यात आले. जिल्ह्यातील कृषीप्रधान गांव अशी ओळख असलेल्या सह्याद्री पट्यातील विलवडे या छोट्याशा गावात शेतीविषयक क्रांती घडली आहे.

प्लास्टिक मल्चींगवर कलींगड लागवड कशी..?

भाजीपाल्याच्या उत्पादनात अग्रेसर असणाऱ्या या गावाने वालीच्या भाजीला जिह्यातच नव्हे तर देशपातळीवर मान मिळवून दिला आहे. अशा कृषी गावातील असलेल्या प्रमोद दळवी यांनी यशस्वी प्लास्टिक मल्चींगवर कलींगड लागवड करत युवा शेतकऱ्यांसाठी रोजगाराच्या संधी शेतीतून निर्माण करण्याची चालना दिली आहे. यासाठी त्यांनी 2 एकर जमिन स्वतःची तर 2 एकर क्षेत्र भाडे करारावर घेऊन ट्रॅक्‍टरच्या साहय्याने त्याची मशागत केली. ज्या ठिकाणी बिया पेरायच्या आहेत त्याठिकाणी एका लांब लचक ओळींमध्ये शेणखत घालून प्रथमतः जमीन भुसभुशीत करून लागवडी योग्य केली. यासाठी त्यांनी पुणे येथून ऑगस्टा जातीच्या बियाणांची निवड केली.

मशागत केलेल्या या मातीच्या लांबलचक भागावर 30 मायक्रोमचे प्लास्टिक घालून घेतले. या ओळीवर 25 ते 30 सेंमी अंतरावर होल मारून बियांची लागवड केली. अशा 10 ते 12 फूट अंतर सोडून शेणमिश्रित मातीच्या ओळी बनविल्या. 
या लागवडीसाठी त्यांनी प्लास्टिक मल्चींगच्या खाली ठिबक सिंचनाने बियांना अनुकूल पाणी पुरवठा दिला आहे. ठिबक सिंचनामुळे पाणी वाया जाण्याचे प्रमाण कमी असते. त्याशिवाय प्लास्टिक मल्चींग असल्याने पाणी बाहेर तर जात नाही उलट बऱ्याच प्रमाणात ओलावा टिकून राहतो.

कुटुंबियांची साथ

बियांवर प्लास्टिक मल्चींग असल्याने उन्हाचा प्रत्यक्ष होणारा मोठा परिणाम कमी होतो. पाणी प्लास्टिक मल्चींगच्या बाहेर जात नसल्याने अतिरिक्त वाढणारे गवत- चार वाढत नाही. त्यामुळे नडणी, खुरपणीसाठी लागणारी मशागत खूपच कमी होते. विविध नाविन्यता असणाऱ्या प्रमोद दळवी यांच्या या शेती व्यवसायात त्याचे वडील राघोबा दळवी, भाऊ प्रवीण, आई द्वारकाबाई तसेच त्यांच्या कुटुंबियांचे मोठे योगदान आहे. 

असे आहे अर्थकारण 
प्रमोद दळवी यांनी केलेल्या या 4 एकर क्षेत्रात पहिल्या वर्षी 3 लाख एवढा खर्च येतो असे त्यांनी सांगितले. त्यांना मिळणारे उत्पन्न हे खर्च वगळता फळांच्या वजनाच्या हिशोबाने अंदाजे 2 ते अडीच लाखाच्या आसपास होते. जर वातावरण पूरक असल्यास आणि बाजारपेठेत भाव योग्य असल्यास या उत्पनात भरीव वाढ होते. काही अंशी उत्पन्न कमी देखील होते असे त्यांनी सांगितले. केवळ 70 दिवसात परिपक्व होणारे हे फळ डिसेंबर ते मे या सहा महिन्यात दोन वेळा घेता येते. दुसऱ्या वेळी येणारा खर्च तुलनेत कमी असतो. त्यामुळे उत्पन्नाची बाजू वाढते. 

हेही वाचा-  सत्ताधारी एवढे घाबरले का? यातच कुठेतरी पाणी मुरतंय... कोण म्हणाले वाचा...
 
सहज बाजारपेठ 
कलिंगड हे उन्हाळ्यातील महत्वाची मागणी असणारे फळ ठरू लागल्याने स्थानिक बाजारपेठ, हायवे मार्गालगतच्या दुकानामध्ये, गोवा बाजारपेठेत सहज 12 ते20 रुपये किलोला हे फळ विक्रीला जाते. काही दुकान व्यवसायिक पूर्णतः फळाने बहरलेली बागच वनटाईम सेटलमेंट ने बागायतदाराकडून घेतात. त्यामुळे या फळांच्या बाबतीत वितरणाच्या तेवढ्या मर्यादा येत नाहीत. 

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा

वाढत्या शिक्षण पद्धतीत तरुणांनी शेतीकडे दुय्यम नजरेने किंवा खुजेपणाने न पाहता सकारात्मत दृष्टीने आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून शेती केल्यास शासकीय नोकऱ्यांच्या मागे धावण्याची गरज भासणार नाही. शेतीमध्ये प्रचंड मेहनत नक्कीच आहे; पण या मेहनतीची आवड निर्माण झाल्यानंतर यातून व्यवसाय निर्माण होतो, अशी आपली आश्वासक खात्री आहे. 
- प्रमोद दळवी, शेतकरी  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : लोकसभा मतदानाचा तिसरा टप्पा; कित्येक दिग्गजांचं भवितव्य आज ईव्हीएममध्ये होणार कैद

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 7 मे 2024

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

Dr. Amol Kolhe : आढळराव पाटील शब्द पाळणार का?

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

SCROLL FOR NEXT