रत्नागिरी : कोकणच्या हापूसला ग्राहकांकडून मोठी मागणी असते; परंतु दरवर्षी कर्नाटकी आंबा आणि हापूस भेसळ करून विकला जात असल्याने हापूसच्या दरावर मोठा परिणाम होतो. यंदाही मुंबई, पुण्यासारख्या मेट्रोसिटीमध्ये हापूसच्या नावाखाली कर्नाटक आंब्याची सर्रास विक्री सुरू झाली आहे. कर्नाटकी आंब्याची वाशी मार्केटमध्ये आवक वाढल्याने रत्नागिरी आणि देवगड हापूसचे दर घसरले आहेत. यंदा उत्पादन कमी असल्यामुळे चिंताग्रस्त बागायतदारांपुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
हापूसचा हंगाम यंदा उशिराने सुरू झाला आहे. वातावरणातील बदलामुळे यंदा उत्पादन कमी झाले असले तरीही रत्नागिरी, देवगडमधून १५ ते २० हजार पेटी दररोज वाशी बाजारात दाखल होत आहे. रत्नागिरी हापूसचा दर ७०० ते ८०० रुपये डझनने विकला जात आहे. पेटीला दोन ते साडेचार हजार रुपये आहे. गतवर्षी यामध्ये दर अधिक होता. सध्या वाशी बाजारात कर्नाटकी आंबा ७० ते ८० रुपये किलोने विकला जात आहे. हापूस गुणवत्तेत कर्नाटकी आंब्यापेक्षा उजवा आहे. मुंबई, पुण्यातील काही व्यावसायिक कर्नाटकी आंबा हापूस म्हणून विकतात.
काहीजणं तर रत्नागिरीतील पेपरची रद्दी कर्नाटकमध्ये नेऊन तसे बॉक्स भरत असल्याचे काही बागायतदारांनी निदर्शनास आणून दिले आहे. याचा फटका कोकणातील आंबा बागायतदारांना बसत आहे. याचा परिणाम हापूसच्या दरावर होत आहे. मोठ्या शहरांमध्ये हापूसची गोडी अधिक असल्यामुळे अनेकजण पैसे मोजतात. हीच गोष्ट लक्षात घेऊन अनेक व्यापारी फायदा उठवत आहेत.
हापूस आतून केशरी, साल पातळ
कोकणातील पाच जिल्ह्यातील आंब्याला हापूस जीआय मानांकन मिळाले असले तरीही त्यादृष्टीने कारवाई करणे अपेक्षित आहे. हापूस हा आतून केशरी आणि त्याचे साल पातळ असते. त्यामुळे तो ओळखण्यास सोपा जातो. इतर राज्यातील आंबा हा बाहेरून हिरवा तर आतून पिवळा असतो. थोडा रसाळ आणि त्याचा आकार उभट असतो. या बाबी तपासूनच ग्राहकांनीही हापूस विकत घ्यावा, असे आवाहन बागायतदारांनी केले आहे.
एक नजर
"वाशीसह मोठ्या मार्केटमध्ये कर्नाटकी आंबा लेबल लावून पाठवण्याची सक्ती केली पाहिजे. या गोंधळात कोकणच्या हापूसचे महत्त्व कमी केले जात आहे. यंदापासून लेबल लावूनच हापूस पाठवण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. कर्नाटक आंब्यामुळे दरावर परिणाम होतो."
- डॉ. विवेक भिडे, बागायतदार
"वाशीतील हापूसचे दर पडल्यामुळे बागायतदारांच्या नफ्या-तोट्याचे गणित बिघडते. हापूसला जीआय मानांकन मिळाले आहे. सरकारच्या मदतीने भेसळ करणाऱ्यांवर कारवाईसाठी पथके तयार केली पाहिजेत. तरच त्याला आळा बसू शकतो."
- आनंद देसाई, बागायतदार
संपादन - स्नेहल कदम
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.