Martin of America Became Farmer from Sindhudurg
Martin of America Became Farmer from Sindhudurg  sakal
कोकण

अमेरिकेचा मार्टिन बनला सिंधुदुर्गातला शेतकरी

नीलेश मोरजकर

बांदा : निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण केलेल्या कोकणच्या निसर्गसौंदर्याची भुरळ ही परदेशी नागरिकांनाही पडत आहे. अमेरिकेतील प्रगत राज्य असलेल्या कॅलिफोर्निया येथील युवक लुकस मार्टिन हा येथील निसर्गाच्या इतका प्रेमात पडला की त्याने येथेच स्थायिक होण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे येथील मुक्ता पाटील या मराठी युवतीशी लग्न करून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाफोली गावात आधुनिक पद्धतीने शेती करण्यासही त्याने प्रारंभ केला आहे. कोकणातील नैसर्गिक साधनसंपत्तीला सेंद्रीय शेतीची जोड दिल्यास येथील अर्थकारणात निश्चितच बदल घडेल. येथील निसर्गसौंदर्याचे संवर्धन करून कृषी पर्यटनाच्या माध्यमातून विदेशी पर्यटकांना येथे वळविण्याचा निर्धार लुकस मार्टिन याने ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केला आहे. याकामी त्याला त्याची पत्नी मुक्ताही खंबीरपणे साथ देत आहे.(Martin of America Became Farmer from Sindhudurg)

भारतासारख्या खंडप्राय देशाची संस्कृती, येथील परंपरा, प्रदेशनिहाय बदलणारी विविधता, खाद्य संस्कृतीचे नेहमीच विदेशी नागरिकांना आकर्षण असते. कित्येक पाश्चात्य नागरिकांनी भारतीय संस्कृती अंगीकृत केली आहे. भारतीय परंपरेने अनेक विवाह सोहळे देखील संपन्न झाले आहेत. अमेरिकेतील कॅलिफोर्निया हे आर्थिकदृष्ट्या संपन्न असलेले अतिप्रगत राज्य आहे. कॅलिफोर्निया व कोकणचे वातावरण हे मिळतेजुळते आहे. यासाठीच युती शासनाच्या काळात ‘कोकणचे कॅलिफोर्निया’ करण्याची घोषणा तत्कालीन राज्यकर्त्यांनी केली होती; मात्र ही घोषणा प्रत्यक्षात उतरली नाही. मायभूमी व कर्मभूमी कॅलिफोर्निया असूनही व तेथील सर्व अत्याधुनिक सोई-सुविधांना तिलांजली देत मार्टिनने कोकण भूमीला पहिली पसंती दिली आहे. जो भाग प्रगत आहे त्याठिकाणी काम न करता कोकण सारख्या मागासलेल्या भागाला येथील उपलब्ध आलेल्या साधनसंपत्तीच्या जोरावर जागतिक पर्यटनाच्या नकाशावर आणण्याचा मानस मार्टिनने व्यक्त केला आहे. यासाठी प्रचंड मेहनत घेण्याची तयारी देखील त्याने ठेवली आहे. त्याने पुढील १० वर्षांचे नियोजन बनविले आहे. नियोजनानुसार काम केल्यास येथील विकास दूर नसल्याचे त्याने सांगितले.

लुकस मार्टिन हा आपल्या मित्रांसोबत २०१५ मध्ये वयाच्या २१व्या वर्षी भारत दर्शनासाठी आला होता. दिल्ली, वाराणसी, हैद्राबाद, हंपी, गोवा तो फिरला. भारतातील विविधता, संस्कृती पाहून तो भारावून गेला. गोव्यात फिरताना त्याची भेट मूळ पुणे येथील पत्रकार मुक्ता पाटील या युवतीशी झाली. मुक्ता ही मुंबईतील एका ऑनलाईन मॅगझीनसाठी पत्रकारिता करत होती. दोघांची चांगली मैत्री झाली. मार्टिनने मुक्ताकडून येथील विविधांगी संस्कृतीची माहिती घेतली. दोघांच्या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाल्यानंतर त्यांनी २०१७ मध्ये भारतीय संस्कृतीनुसार पुणे येथे लग्न केले. लग्नानंतर दोघेही अमेरिकेला परतले. तीन वर्षे ते त्याठिकाणी राहिले; मात्र मार्टिनला भारताची ओढ स्वस्थ बसू देत नव्हती. त्याने आपल्या पत्नीला आपण भारतात स्थायिक होण्याचा निर्णय सांगितला. त्यासाठी या दाम्पत्याने कोकणची विशेषत: सिंधुदुर्ग जिल्ह्याची निवड केली. त्यांनी महिनाभर शोधाशोध करत बांदा शहरापासून नजीक असलेल्या निसर्गसंपन्न वाफोली गावात साडेपाच एकर शेतजमीन घेतली.

मार्टिन हा उच्च शिक्षित आहे. त्याने बॅचरल ऑफ कम्युनिकेशनमध्ये डिग्री घेतली आहे. तसेच इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये देखील डिप्लोमा केला आहे. टेक्सास (अमेरिका) येथे त्याच्या आजोळी बागायती होती. आपल्या लहानपणी तो आजी बरोबर बागेत राहायचा. त्यामुळे त्याला बागायतीत विशेष रुची होती. वाफोली येथे सेंद्रिय पद्धतीने शेती, बागायती करण्याचा त्यांचा मानस आहे. कोकणी संस्कृती, मालवणी, मराठी बोलीभाषा, येथील राहणीमान आत्मसात करण्याचा त्याचा प्रयत्न आहे. त्याला तांदळाची भाकरी, मच्छी व लाल मातीत पिकविलेली पालेभाजी आवडीची आहे. सध्या मार्टिन मराठी शिकण्याचा प्रयत्न करत असून रोजच्या बोलीभाषेतील ठराविक मराठी शब्द तो बोलतो. स्थानिकांशी संवाद साधण्यासाठी तो पत्नीची मदत घेतो. मार्टिन हा उच्च शिक्षित व प्रयोगशील असल्याने भविष्यात याठिकाणी त्याला प्रक्रिया उद्योग उभारायचा आहे. याठिकाणी सेंद्रिय शेती करून फळे व भाज्या पिकविण्यात येणार आहे. यावर याठिकाणीच प्रक्रिया करून वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये चॉकलेट बनविण्याचे युनिट सुरू करण्यात येणार आहे. यासाठी फुला, फळांची नर्सरी उभारण्यात येणार आहे. या माध्यमातून त्यांना येथील पक्षी, प्राण्यांचे संवर्धन करायचे आहे. संपूर्ण बागेत सौरऊर्जा वापरण्यात येणार आहे.

रोजगार उपलब्ध करण्याचा मानस

प्रक्रिया उद्योगातून मार्टिनला स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून द्यायचा आहे. सध्या त्यांनी विकत घेतलेल्या जमिनीत सफाईचे काम सुरू असून मार्टिन एका सराईत शेतकऱ्याप्रमाणे काम करत आहे. या दाम्पत्याला येथील शैलेश गवस हा युवक मदत करत आहे. मार्टिन दाम्पत्याला याठिकाणी घर बांधायचे आहे, आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी दोघेही मेहनत घेत आहेत. सध्या वाफोली गावात ते भाड्याच्या खोलीत राहत आहेत.

अमेरिकेची सून उतरली शेतात

वाफोलीसारख्या भागात वास्तव्य करून परिसरातील तरुणांना रोजगार देण्यासाठी व सेंद्रीय शेतीद्वारे प्रगती साधण्यासाठी आणि गावाचे नाव जगाच्या नकाशावर नेण्यासाठी अमेरिकेची (कॅलिफोर्निया) पाटलीन मुक्ता पाटील या पतीसह शेतात उतरल्या आहेत. त्यांच्या धाडसाचे कौतुक होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT