मंडणगड : तालुक्यातील पेवे-उंबरशेत खलाटी येथे मंडणगड पोलिसांना नऊ गावठी बॉम्ब सापडल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. पोलिस पथकाने सापळा रचून केलेल्या कारवाईत तीन संशयितांना अचक केली. गावठी बॉम्ब सापडण्याची मंडणगड तालुक्यातील ही पहिलीच वेळ असल्याने याबाबत तर्क-वितर्क लावले जात आहेत.
या संदर्भात मंडणगड पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, काल (ता. २९) पोलिसमित्राकडून पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, पेवे-उंबरशेत खलाटी या ठिकाणी पोलिस पथकाने सापळा रचून धडक कारवाई केली. तीन संशयित आरोपींसह नऊ गावठी बॉम्ब पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. मात्र, पुढील तपासात बाधा येऊ नये, यासाठी अधिक माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला. याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे. कारवाईत पोलिस निरीक्षक शैलजा सावंत, सहायक पोलिस उपनिरीक्षक गफार सय्यद, पोलिस कॉ़न्स्टेबल वैभव गमरे, पोलिस कॉन्स्टेबल ऋषीकेश देसाई यांनी सहभाग घेतला. दरम्यान, संशयितांना उद्या (ता. १) न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
शिकारीच्या उद्देशाने की...?
खरिपाच्या हंगामात भातशेतीचे पीक हातात येण्याच्या कालावधीत जंगली श्वापदांचा शेतीस उपद्रव वाढतो. यासाठी शेतकरी शेतीच्या संरक्षणासाठी विविध उपाययोजना करतात. यात फासकीचा सर्रास वापरही केला जातो. शेतकऱ्यांनी मागणी करूनही श्वापदांना रोखण्यासाठी वन खात्याकडून कोणत्याही उपाययोजना होत नसल्याने शेतकरी नाइलाजाने त्यांना जमतील ते उपाय करतात. पेवे पणदेरीपट्ट्यात भातशेतीचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे गावठी बॉम्बचा वापर जंगली श्वापदांना रोखण्यासाठी केला जात होता, की केवळ शिकारीच्या उद्देशाने गावठी बॉम्ब ठेवण्यात आले होते, की आणखी कोणती कारणे होती, या प्रश्नांची उत्तरे तपासानंतरच मिळणार आहेत. जंगली श्वापदांनी पिकांची नुकसानी केल्यास त्यास नुकसान भरपाई देण्याची कोणतेही कायदेशीर तरतूद नसल्याची गंभीर बाब या निमित्ताने पुन्हा एकदा पुढे आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.