रत्नागिरी: ‘मै अपनी झाँसी नहीं दूँगी,’ असे म्हणत ब्रिटिशांशी एक वर्षभराहून अधिक काळ निकराचा लढा देणारी झाशीची राणी लक्ष्मीबाई (queen of jhansi Lakshmibai)स्वातंत्र्यलढ्यात अमर झाली. तिच्या कर्तृत्वाचे पोवाडे त्यानंतर कित्येक काळ गायले जात आहेत. सासर - माहेर रत्नागिरी जिल्ह्यात असलेल्या झाशीच्या राणीचा आज हौतात्म्य दिन. ब्रिटिशांच्या हातात राणी सापडली त्या वेळी तिच्यासोबत तिचा मुलगाही होता. त्याला वाचवण्यात यश आले. या मुलाचे पुढे काय झाले? याबाबतचे कुतूहल साऱ्यांनाच असते. आजच्या हौतात्म्य दिनानिमित्ताने.(queen-of-jhansi-Lakshmibai-martyrdom-day-special-story-kokan-marathi-news)
- अॅड. विलास पाटणे
झाशीच्या राणीच्या मुलाचे पुढे काय झाले ?
झाशीची राणी लक्ष्मीबाई म्हणजे पराक्रम, शौर्य, त्याग आणि देशप्रेम. राणी लक्ष्मीबाई पेशव्यांचे व्यवस्थापक मोरोपंत तांबे यांची मुलगी. तांबे यांचे मूळ गाव लांजा-रत्नागिरीजवळील कोलधे. त्यांचा जन्म १९ नोव्हेंबर १८३५ मध्ये काशीत झाला. झाशीचे राजे गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी त्यांचा विवाह १८४२ मध्ये झाला. नेवाळकरांचे मूळ गाव लांजाजवळील कोट. झाशीमध्ये लक्ष्मीबाईंनी रंगपंचमी उत्सव तसेच मराठी नाटके सुरू केली. झाशी संस्थानला त्यांनी सुसंस्कृत चेहरा दिला. १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धामध्ये झाशी इंग्रजाच्या विरुद्धच्या लढ्याचं प्रमुख केंद्र होतं.
राणी लक्ष्मीबाई आठ वर्षाच्या मुलाला पाठीवर घेऊन किल्ल्याबाहेर पडल्या
राणी लक्ष्मीबाई "मैं अपनी झाँसी नही दूँगी" असे म्हणत सात ते आठ वर्षाच्या मुलाला पाठीवर बांधून ४ एप्रिल १८५३ ला किल्ल्याबाहेर पडल्या. जवळजवळ एक वर्ष इंग्रजांशी निकरचा लढा दिला. काल्पीला गेल्यावर नाना टोपेंनी त्यांना मदत केली. सरतेशेवटी घोडा ओढा ओलांडू न शकल्याने ग्वाल्हेरच्या स्वर्णरेखा नदीजवळ त्यांनी वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी देशाकरीता वीरमरण पत्करले. आपला देह इंग्रजांच्या हाती लागू नये म्हणून त्यांच्या इच्छेनुसार मुखाग्नी देण्यात आला. झाशीच्या राणीच्या मुलाचं पुढं काय झालं ? याची उत्सुकता आपणा सगळ्यानांच आहे. झाशीचे राजे गंगाधरपंतानी दामोदरला दत्तक घेतले. ग्वाल्हेरच्या लढाईत राणीला हौताम्य आलं पण दामोदरराव वाचला. झाशीच्या राणीच्या सेवेतील काशीबाई हिच्यावर दामोदर यांची जबाबदारी देण्यात आली.
रामचंद्र देशमुख व इतरांनी दामोदर याला घेऊन पेशव्याच्या बिठ्ठूरच्या छावणीतून पळ काढला. जंगलामध्ये लपतछपत ते बुंदेलखंडच्या दिशेने जात होते. जवळचे सगळे पैसे संपल्याने दामोदरच्या हातातले ३२ तोळ्याचे सोन्याचे तोडे विकावे लागले. कित्येक महिने अन्न-पाण्याशिवाय काढावे लागले. झाशीच्या वारसदाराचे प्राण वाचवण्यासाठी अखेर नन्हेखानने इंग्रजांसमवेत मध्यस्थी केली आणि विनंती केली. ‘‘ जंगलात जगण्यासाठी दामोदरराव दोन वर्ष तडफड करत आहे. त्याचा जीव वाचवा म्हणजे हिंदुस्तानी जनता तुम्हाला दुवा देईल. ५ मे १८६० मध्ये इंदूरच्या इंग्रज छावणीत आणल्यावर रिचर्ड शेक्सपियर याने, दामोदररावला वार्षिक १० हजार रुपयांची पेन्शन मंजूर केली. त्याच्या शिक्षणासाठी काश्मिरी पं. मुन्शी धर्मनारायण यांची नियुक्ती केली.
इंदूरमध्ये आल्यावर त्याचे लग्न झाले. त्याला लक्ष्मणराव नावाचा मुलगा झाला. इंग्लंडच्या राणीचे देशात राज्य आल्यावर त्यांनी आपल्या हक्कासाठी प्रयत्न केले. ब्रिटिशांच्या पेन्शनवर जगण्याच्या नामुष्कीचे त्यांना शल्य होते. २८ मे १९०६ रोजी वयाच्या ५६ व्या वर्षी त्याचा मृत्यू झाला. दामोदर चित्रकार होते. दामोदररावच्या मृत्यूनंतर वारसांना मिळणारे पेन्शन बंद केले. मुलगा लक्ष्मणराव ज्याने आपले आडनाव झाशीवाले लावण्यास सुरवात केली होती. इंदूरच्या न्यायालयाच्या बाहेर टायपिंगचे काम करून उदरनिर्वाह करण्याची वेळ त्यांच्यावर आली. २०१५ साली झाशी किल्ल्यात झालेल्या ‘‘झाँसी जनमहोत्सव’’ कार्यक्रमात झाशीच्या राणीचे पाचवे वंशज अरुण कृष्णराव झाशीवाले हजर होते. एन. केळकर यांच्या ‘इतिहासाच्या सहली’ या पुस्तकात जाणकारांसाठी अधिक तपशील आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.