रत्नागिरी - येथील एमआयडीसी परिसरात मच्छीच्या कुटीवर प्रक्रिया करुन विनापरवाना खत निर्मिती करणार्या कारखान्यावर कृषी विभागाच्या पथकाने बुधवारी (ता. 19) कारवाई केली. खताच्या पिशवीवर नमुद केलेले घटक पिशवीत घेण्यात आलेले नाहीत. ते खत बोगस आहे, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. कारखान्यातील सहा हजार पिशव्या जप्त केल्या असून त्याची किंमत सुमारे 35 लाख रुपयांपर्यंत आहे.
ही कारवाई कृषी विभागाच्या जिल्हास्तरीय पथकामार्फत केली असून संबंधित कारखानदाराविरोधत फौजदारी दाखल करण्यात येणार असून कारखाना जप्त केला आहे. पावसाळ्यात शेतकर्यांना खताची गरज भासते. याचा लाभ उठवून सेंद्रीय खताच्या नावाखाली बोगस खताची विक्री केली जाते.
रत्नागिरी शहराजवळील मिरजोळे एमआयडीसीत अॅबीशिअस फिश मिलमध्ये बोगस सेंद्रीय खताची निर्मिती गेले काही दिवस सुरु आहे. मंगळवारी (ता. 18) राजापूर तालुक्यातील केळशी येथे एका विक्री केंद्रात हे बोगस खत विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. ही बाब कृषी पर्यवेक्षकाच्या निदर्शनास आल्यानंतर जिल्हास्तरीय पथकाने ते खत जप्त केले. तसेच कारखान्यावर धाड टाकली. जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी आरिफ शहा, जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक जी. आर. मुरकुटे, विनोद हेगडे, विशाल जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली.
हा कारखाना सिराज काझी यांच्या मालकीची आहे. मच्छी कुजवून त्यात सोयाबीन टाकून सेंद्रीय खत तयार केले जाते. शंभरटक्के विघटनशील सेंद्रीय खत म्हणून प्रोटीनयुक्त सुपिका या नावाने खताची विक्री केली जात आहे. सुमारे चाळीस किलो वजनाचे पोते 550 रुपयाला विकले जाते. याच ठिकाणी 2006 ते 09 सीटी कंपोस्ट खताची निर्मिती होत होती; परंतु 2009 मध्ये परवाना संपल्यानंतर सिराज काझी यांनी प्रोटीनयुक्त सुपिका खतनिर्मितीला सुरवात केली. त्यासाठीचा आवश्यक कोणताही परवाना शासनाकडून घेतलेला नाही. हा कारखाना सील करण्यात आला असून ग्रामीण पोलीसांना तक्रार देण्यात आली असल्याचे आरीफ शहा यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.