नेरळ : नेरळ ग्रामपंचायत क्षेत्रात सध्या तीव्र पाणीटंचाई भेडसावत आहे. सध्या जुन्या पाणी योजनेतून पुरवठा केला जात असून नवीन वाढीव पाणी योजनेचे काम सुरू आहे. मोहचीवाडी, आदिवासी वाड्या, पायरमाळ आदी भागांत कमी दाबाने पाणी येत असल्याने ग्रामस्थ त्रस्त आहेत. त्यातच ग्रामपंचायतीने राजेंद्रगुरूनगर भागासाठी २ इंचीऐवजी थेट ४ इंची जलवाहिनी टाकण्यास सुरुवात केली. २० जूनच्या मध्यरात्री हे काम करायला घेतल्याने ग्रामस्थांनी आक्षेप घेतल्याने वातावरण आणखीनच तापले आहे.
पाण्यासाठी हवालदिल झालेल्या आदिवासी वाड्यांतील ग्रामस्थांनी नेरळ ग्रामपंचायतीवर आक्रोश मोर्चा काढत सरपंचांसह सदस्यांना धारेवर धरले. यावेळी नागरिकांना विचारात घेऊन सुवर्णमध्य काढला जाईल, असे आश्वासन उपसरपंच मंगेश म्हसकर यांनी दिल्याने वातावरण काहीसे निवळले.
नेरळ ग्रामपंचायतीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने १९९८ मध्ये ३६ हजार लोकसंख्या विचारात घेत नळपाणी योजना सुरू केली होती. मात्र नागरिकरण वाढल्याने आजघडीला नेरळ ग्रामपंचायतीतील निम्म्याहून अधिक भागाला कमी दाबाने पाणीपुरवठा होतो.
उन्हाळ्यात नदीची पातळी खालावल्याने त्यातच नव्या पाणी योजनेचे काम सुरू झाले असल्याने सध्याच्या पाणी पुरवठा योजनेवरही होत आहे. राजेंद्रगुरूनगर भागात पाणी मिळण्यासाठी सदस्य संतोष शिंगाडे व गीतांजली देशमुख यांनी ग्रामपंचायतीकडे वारंवार मागणी करत १५ वित्त आयोगातून वॉर्ड क्रमांक ५ मध्ये अंतर्गत जलवाहिनीसाठी आराखडा मंजूर करून घेतला आहे. यासाठी ४ लाखांची तरतूद करण्यात आली असून २० जूनच्या रात्री जलवाहिनीचे काम सुरू करण्यात आले. मूळात ही जलवाहिनी मुख्य जलवाहिनीला जोडली आहे. तो दोन इंची पाईप बदलून चार इंची करण्यात आली.
बोर्ले येथून येणारी मुख्य जलवाहिनी मोहचीवाडी येथील पाण्याच्या टाकीत सोडण्यात येते. त्याच वाहिनीवर गेल्या काही वर्षांत असंख्य जोडण्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळे मोहचीवाडी येथील पाण्याची टाकी भरण्यास उशीर होऊन परिणामी परिसरात पाणीटंचाईची ओरड होते.
दरम्यान राजेंद्रगुरुनगर भागात ४ इंची पाईप टाकल्याने त्याचा थेट परिणाम मोहचीवाडी येथील पाण्याच्या टाकीवर होऊन नागरिकांना पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण होणार
आहे. याविरोधात बुधवारी ग्रामस्थांनी नेरळ आक्रोश मोर्चा काढत सरपंचासह सदस्यांना जाब विचारला. यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते भगवान चव्हाण, काशिनाथ ठमके यांनी ग्रामपंचायतीला निवेदन दिले. दरम्यान ग्रामस्थांच्या आक्षेपामुळे वाढीव नळयोजनेचे काम थांबवण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.
नेरळ-कर्जत रस्त्यालगत राजेंद्रगुरुनगर भागासाठी जलवाहिनी टाकली जात होती, ते काम थांबवण्यात आले आहे. तसेच ग्रामस्थांसोबत चर्चा करूनच सुवर्णमध्य काढू. अनेक ठिकाणी नळाच्या लाईनला मोटार लावण्यात येत असल्याने कमी दाबाने पाणी येते. यावर ग्रामपंचायतीकडून मोहीम राबवण्यात येऊन दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल. यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करावे.
- मंगेश म्हसकर, उपसरपंच, नेरळ ग्रामपंचायत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.