राजापूर (रत्नागिरी) : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे उद्योगव्यवसाय बंद पडले असून आर्थिकचक्र सद्यस्थितीमध्ये ठप्प झाले आहे. अशा स्थितीतही संधीनिर्मिती करीत तालुक्यातील महिला बचत गटांनी मास्क तयार करण्यासह कोंबडी आणि भाजी विक्रीतून सुमारे दहा लाख रूपयांची उलाढाल करीत स्वयंरोजगार निर्मिती केली आहे. स्वतः स्वयंपूर्ण होत असताना मास्क निर्मिती आणि भाजीपाला विक्रीतून तालुकावासियांचे आरोग्य आणि सुरक्षा राखण्यात प्रशासनासोबत बचत गटाच्या महिलांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे या उमेद बचत गटाच्या महिला खर्या अर्थाने ‘कोरोना वॉरियर्स’ ठरल्या आहेत.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने जगभरामध्ये थैमान घातले आहेत. त्यातून, उद्योग व्यवसाय बंद होवून आर्थिक चक्र ठप्प झाले आहे. अशा स्थितीमध्ये उमेद स्वयंसहाय्यता बचतगट समूहातील महिलांनी लोकांच्या सुरक्षिततेसाठी मास्क बनविणे आणि आरोग्यासाठी आवश्यक असलेला भाजीपाला विक्री करून रोजगार निर्मिती केली.
त्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बघाटे, गटविकास अधिकारी सागर पाटील, जिल्हा अभियान सहसंचालक नितीन माने, जिल्हा अभियान व्यवस्थापक विक्रम सरगर, तालुका अभियान व्यवस्थापक साक्षी वायंगणकर, तालुका व्यवस्थापक अवधूत टाकवडे, अमित जोशी यांनी मार्गदर्शन करीत प्रोत्साहित केले. तर, प्रभाग समन्वयक प्राजक्ता कदम, ओंकार तोडणकर, मंदार पवार यांच्यासह प्रभागसंघ व्यवस्थापक यांनी मास्क लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी या महिलांना सहकार्य केले.
कोरोना रोखण्यासाठी मास्कची असलेली मागणी लक्षात घेवून बचत गटाच्या महिलांनी सुमारे 32 हजारहून अधिक मास्क तयार केले. तालुक्यामध्ये मास्कचा तुटवडा जाणवत असताना महिलांनी तयार केलेले मास्क उपयुक्त ठरले. त्यातून, सुमारे 6 लाख 40 हजार रूपयांची उलाढाल झाली आहे. सद्यस्थितीमध्ये मास्क बनविण्याचे काम सुरू असून त्यांना मागणीही जास्त प्रमाणात आहे. लॉकडाऊनच्या काळामध्ये बचत गटांनी कोंबडी विक्रीचाही व्यवसाय केला. त्यामध्ये सुमारे अडीच लाख रूपयांची उलाढाल केली.
कोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या कोल्हापूर परिसरातून आलेल्या भाजी खरेदीबाबत साशंकतता व्यक्त केली जात आहे. त्यातच, संचारबंदीमुळे गावांमध्ये भाजी विक्रीसाठी पोहचत नाही. त्यातून, बचत गटांनी तयार केलेल्या भाजीने लोकांसमोर खरेदीचा पर्याय निर्माण केला. या भाजी विक्रीतून सुमारे दिड लाख रूपयांची उलाढाल झाली आहे. मास्क, भाजीपाला, कोंबडी विक्री करून लॉकडाऊनमध्येही स्वयंरोजगार निर्माण करण्यामध्ये कशेळी, माडबन, कोदवली, कोंडेतड, कोतापूर, सौंदळ, पाचल, जुवाठी, राटयपाटण, दोनिवडे, साखरीनाटे, वाडापेठ, तळवडे, शीळ, पन्हळे, केळवली, देवाचेगोठणे, धाऊलवल्ली, पाथर्डे, हर्डी येथील बचत गट यशस्वी ठरले आहेत. लॉकडाऊनसारख्या प्रतिकूल स्थितीमध्येही स्वयंरोजगार निर्मिती करणार्या बचतगटांच्या महिलांचे कौतुक केले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.