राजापूर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याची साक्ष देणाऱ्या अनेक गडकिल्ल्यांमध्ये तालुक्याच्या पश्चिम भागातील नाटे येथील किल्ले यशवंतगडाचा समावेश होतो. तत्कालिन स्थापत्यशास्त्र आणि दूरदर्शीपणाची साक्ष देणारा हा किल्ला सध्या ठिकठिकाणी ढासळला असून किल्ल्याला झाडे-वेलींचा गराडा पडला आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून डागडुजीच्या प्रतीक्षेत असलेल्या या किल्ल्याची पुरातत्त्व विभागाने पाहणी केली. त्यामुळे या किल्ल्याच्या डागडुजीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या अनेक वास्तू आजही उभ्या आहेत. त्यामध्ये अनेक गडकिल्ल्यांचा समावेश असून किल्ले यशवंतगड त्यापैकी एक आहे. या किल्ल्याच्या बुरूजांच्या तटबंदीमध्ये अनेक मोठमोठी झाडे वाढली असून त्या झाडांपासून या तटबंदीसह बुरूजाला भविष्यात धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. किल्ल्याचे बुरूज आणि बांधकाम अनेक ठिकाणी ढासळले आहे.
त्यामुळे या किल्ल्यांचे जतन आणि संवर्धन करण्याच्या अनुषंगाने डागडुजी करण्यासाठी शासनाकडून प्रयत्न व्हावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सिद्धेश मराठे यांनी तत्कालीन मंत्री अमित देशमुख यांच्याकडे केली होती. त्यानुसार देशमुख यांनी किल्ल्याची पाहणी करून त्याचा सविस्तर अहवाल सादर करण्याची सूचना पुरातत्त्व विभागाला दिली होती. त्याप्रमाणे रत्नागिरीतील पुरातत्त्व विभागाचे कनिष्ठ अभियंता शांताराम केकडे यांनी किल्ल्याची पाहणी केल्याची माहिती मराठे यांनी दिली.
या वेळी नाटे येथील शिवसंघर्ष संघटनेचे अध्यक्ष मनोज आडविलकर, उपाध्यक्ष रविकांत कुबडे, सेक्रेटरी निलीन करंजवकर, खजिनदार नारायण ठाकूर, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष रमेश लांजेकर, साखरीनाटे सरपंच नौशाद धालवेलकर, माजी सरपंच मलिक गडकरी, साखरीनाटे मच्छीमार सोसायटीचे चेअरमन सदस्य शफी वाडकर, हॉटेल व्यावसायिक नीलेश बांदकर, आंबा व्यावसायिक देवेंद्र बांदकर, अक्षय बांदकर, विघ्नेश आडविरकर, अमोल गिरी आदी उपस्थित होते.
वैशिष्ट्यपूर्ण किल्ला बांधकाम
संपूर्ण किल्ला जांभा घडीव दगडांच्या चिऱ्यांनी बांधलेला असून किल्ल्याच्या उत्तर आणि पूर्वेकडील सपाटीच्या बाजूने खोल खंदक खोदून संरक्षित करण्यात आलेला दिसतो. या खंदकात पाणी नसले तरी सपाटीकडून किल्ल्यावर चढाई करण्यासाठी शत्रू आल्यास त्याला अडथळा यावा, असे त्याचे नियोजन केलेले दिसते. किल्ल्यामध्ये एका वास्तूचा चौथरा दिसून येत असून त्याच्यासमोर उंच बुरूज आहे. बुरूजास पायऱ्यांनी वर चढल्यावर एका इमारतीचे बांधकाम दिसून येते. येथून गडावर नियंत्रण ठेवले जात असावे, असा अंदाज व्यक्त केला जातो. याच परिसरामध्ये दोन कोठारे आणि एक विहिर दिसते. बालेकिल्ल्याच्या दक्षिण बाजूच्या पडकोटातील दरवाजाच्या अलीकडे तटबंदीच्या बुरूजाच्या आतील बाजूस गणेशमूर्ती आणि दोन कमळ प्रतिमा दिसतात.
सात हेक्टर क्षेत्रावर किल्ला
किल्ला यशवंतगड हा नेमका कोणी बांधला, या विषयी फारशी माहिती उपलब्ध नसली तरी सुमारे सात हेक्टर क्षेत्र परिसर असलेल्या या किल्ल्याचे बांधकाम तत्कालीन स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना मानला जात आहे. या किल्ल्याच्या दोन्ही बाजूला जैतापूर खाडीच्या पाण्याने वेढलेले दिसते. प्राचीन जैतापूर आणि मुसाकाजी बंदरासह आणि जैतापूर खाडीतून होणाऱ्या व्यापारी मालवाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी हा किल्ला बांधलेला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.