Logo
Logo 
कोकण

Vidhan Sabha 2019 राष्ट्रवादीच्या नाशिक पश्‍चिमच्या घोळात आघाडी मालेगाव बाह्य-नांदगावमध्ये अडचणीत 

महेंद्र महाजन ः सकाळ वृत्तसेवा

नाशिक ः राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे नाशिक पश्‍चिम विधानसभा मतदारसंघातील उमेदवारी "वेटिंग'वर ठेवल्याने आघाडीच्या मालेगाव बाह्य आणि नांदगाव या दोन जागा अडचणीत सापडल्या आहेत. नाशिक पश्‍चिममधून राष्ट्रवादीतर्फे भाजपमधून लोकसभा निवडणुकीअगोदर राष्ट्रवादीमध्ये प्रवेशकर्ते झालेले डॉ. अपूर्व हिरे यांनी तयारी सुरु केली. पण राष्ट्रवादीच्या दोन यादीत त्यांचा समावेश झालेला नाही. इगतपुरी विधानसभा मतदारसंघातील कॉंग्रेसचे उमेदवार हिरामण खोसकर यांचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना नाशिक पूर्व मतदारसंघ प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या पक्षाला आणि नाशिक पश्‍चिम मतदारसंघ आघाडीतर्फे मित्रपक्षाला सोडण्यात आल्याचे स्पष्ट केल्याने विशेषतः राष्ट्रवादीमधील अस्वस्थता आणखी वाढली आहे. 
मालेगाव बाह्यमधून राष्ट्रवादीच्या समर्थनावर कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांनी उमेदवारीची तयारी दर्शवली. शिवसेनेचे ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्याविरुद्धच्या लढतीत डॉ. शेवाळे यांना राष्ट्रवादीची आणि त्यातल्या त्यात हिरे घराण्याचे समर्थन महत्वाचे असेल. त्याचवेळी छगन भुजबळांचा मुलगा आणि नांदगावचे राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार पंकज भुजबळ यांच्यासाठी देखील मतदारसंघात समाविष्ट असलेल्या मालेगाव तालुक्‍यातील भागातून हिरे घराण्याचे समर्थन महत्वाचे ठरणार आहे. याच पार्श्‍वभूमीवर भुजबळ समर्थकांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे डॉ. हिरे यांच्या नाशिक पश्‍चिममधील उमेदवारीसाठीचा आग्रह धरला आहे. डॉ. हिरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, की पक्षाध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची आजच आपण भेट घेणार आहोत. आपणाला राष्ट्रवादी कॉंग्रेसची उमेदवारी मिळेल याची खात्री आहे. या मतदारसंघात मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचा काहीही संबंध नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारीसाठी छगन भुजबळांची भेट घेतली असून त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. मात्र राष्ट्रवादीने इतर कुणाला उमेदवारी देण्याचा निर्णय घेतल्यास आपण अपक्ष निवडणूक लढवणार आहोत. 

कळवणमध्ये मैत्रीपूर्ण लढत कशी शक्‍य? 
आघाडीच्या राजकारणात राष्ट्रवादीची जिल्ह्यात कोंडी होण्याची चिन्हे दिसताहेत. नाशिक पश्‍चिमची जागा मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाला सोडायचे म्हटल्यावर कळवण-सुरगाणा मतदारसंघातून काय करायचे? असाही प्रश्‍न यानिमित्ताने पुढे आला आहे. कळवण-सुरगाणा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून नितीन पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याच मतदारसंघातून मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार जे. पी. गावीत हे निवडणूक लढवत आहेत. मग हे कसे? असा प्रश्‍न विचारल्यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मैत्रीपूर्ण लढत असे उत्तर देत वेळ मारुन नेली आहे. मात्र याही जागेवर राष्ट्रवादीची कोंडी होणार नाही कशी? याचे उत्तर मिळत नाही. अगोदर मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या स्थानिकांनी राष्ट्रवादीत प्रवेश करणे पसंत केले आहे. 

राष्ट्रवादीचा भाजपला धक्का 
मेगा भरतीमध्ये भाजपने सळो की पळो करुन सोडलेल्या राष्ट्रवादीने जिल्ह्याच्या राजकारणात भाजपला धक्का दिला. कॉंग्रेसमधून प्रवेशकर्ते झालेले लक्ष्मण मंडाले यांना थांबवत राष्ट्रवादीने भाजपच्या सरोज अहिरे यांना देवळाली विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार योगेश घोलप यांच्याविरोधात उमेदवारी दिली आहे. दरम्यान, राष्ट्रवादीच्या पहिल्या यादीत "वेटिंग'वर असलेल्या चार जागांपैकी तीन जागांचे उमेदवार आज दुसऱ्या यादीत जाहीर केले आहेत. बागलाणमधून आमदार दीपिका चव्हाण, नांदगावमधून पंकज भुजबळ आणि देवळालीतून अहिरे यांना उमेदवारी जाहीर केली. दुसरीकडे मात्र कॉंग्रेसच्या वाट्याच्या नाशिक पूर्व मतदारसंघातील उमेदवारीचा घोळ अद्याप काही केल्या मिटत नसल्याचे चित्र आहे. प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या पक्षासाठी जागा दिल्याचे सांगितले जात असले, तरीही भाजपच्या उमेदवारीचा तिढा सुटला नसल्याने आमदार बाळासाहेब सानप, मनसेचा राजीनामा दिलेले ऍड्‌. राहूल ढिकले हे "वेटिंग'वर आहेत. कालच्याप्रमाणे आजही समर्थकांनी सानपांच्या निवासस्थानासमोर गर्दी केली होती. सानपांनी मतदारसंघ मुलासारखा सांभाळला असल्याने पक्ष सोडणार नाही, दुसऱ्या कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नाही अशी भूमिका मांडली. अर्थात, त्यामागे नगरसेवक गणेश गिते यांच्या भाजपच्या उमेदवारीची सुरु झालेली चर्चा कारणीभूत नाही ना? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. तसेच घडल्यास ऍड्‌. ढिकलेंचे काय? असा प्रश्‍न अनुत्तरीत राहतोय. ढिकलेंच्या समर्थकांकडून भाजपची उमेदवारी "फिक्‍स' असल्याचा दावा केला जात असला, तरीही कॉंग्रेसचे "वेटिंग' याच मुद्यावर सुरु असल्याचे प्रकर्षाने जाणवते. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commuter Murder Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! गर्दुल्यांकडून ट्रेनमध्ये हैदोस

Latest Marathi News Live Update: अमेठीत राहुल गांधींच्या उमेदवारीची चर्चा; कार्यकर्त्यांनी पोस्टर्सही छापले

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : ट्रॅविस हेडने डाव सावरला; अर्धशतक ठोकत संघाला नेलं शतकाच्या जवळ

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

SCROLL FOR NEXT