कोकण

Vidhan Sabha 2019 : सिंधुदुर्गात शिवसेना - भाजपच्या प्रचाराचे नारळ फुटले 

सकाळ वृत्तसेवा

कणकवली - जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघांत आज प्रचाराचे नारळ फुटले. शिवसेनेने कणकवलीतून प्रचाराचा प्रारंभ केला. भाजपने वैभववाडीत नारळ वाढवला. प्रचारासाठी अवघे दहा दिवस शिल्लक आहेत. या कालावधीत आरोप - प्रत्यारोपांच्या फैरी झडणार आहेत. एकमेकांचे कार्यकर्ते फोडून आपलीच ताकद अधिक दाखविण्याचेही प्रयोग गावागावात होणार आहेत. 

सावंतवाडी मतदारसंघात भाजपचे प्रदेश चिटणीस राजन तेली यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करून, पालकमंत्री दीपक केसरकर यांना आव्हान दिले आहे. कुडाळमध्ये भाजपच्या पाठबळावर अपक्ष रणजित देसाई आमदार वैभव नाईक यांच्याशी लढत देत आहेत. सर्वांत हायव्होल्टेज लढत कणकवलीत होत असून, येथे शिवसेनेचे सतीश सावंत आणि भाजपचे उमेदवार नितेश राणे यांच्यात तगडा मुकाबला आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीतदेखील प्रचाराचा मुख्य रोख राणे यांच्याभोवतालीच फिरताना दिसत आहे. 

शिवसेना उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ आज कणकवलीत खासदार विनायक राऊत यांनी फोडला. यात त्यांच्यासह आमदार वैभव नाईक आणि इतर युतीच्या नेत्यांनी सिंधुदुर्गातील तीनही मतदारसंघांत शिवसेनेचेच आमदार असतील, असा दावा केला. भाजपच्या प्रचाराचा प्रारंभ आज वैभववाडीत झाला. यंदा कणकवलीची जागा पुन्हा भाजपकडे असेल, तर 2024 मध्ये सिंधुदुर्गसह कोकणातील सर्व जागांवर शतप्रतिशत भाजपची सत्ता असेल. सर्व आमदारही भाजपचेच असतील, असा विश्‍वास भाजप नेतेमंडळींनी यावेळी व्यक्‍त केला. 

प्रचाराचा नारळ फुटल्यानंतर लगेचच "ऑक्‍टोबर हीट'प्रमाणे राजकीय वातावरण तापण्यास सुरवात झाली आहे. सावंतवाडी मतदारसंघात विकासकामांच्या मुद्द्यावरून पालकमंत्री दीपक केसरकर आणि त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार राजन तेली यांच्यात कलगी-तुरा रंगला आहे. कुडाळ मतदारसंघात आमदार वैभव नाईक यांनी गावागावातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा शिवसेनेत प्रवेश करवून वातावरणनिर्मिती राखली आहे. कणकवलीत आमदार नितेश राणेंसह माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांची विविध पक्षांतील पक्षांतरे आणि त्यांतून होणारी मानहानी, हा मुद्दा घेऊन शिवसेनेसह भाजपच्या बंडखोर नेत्यांनी राणेंना टीकेचे लक्ष्य केले आहे. 

दरम्यान, मोठ्या सभांच्या घोषणा अद्याप निश्‍चित झालेल्या नाहीत; तरीही भाजपच्या प्रचारासाठी सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे, मुंबई जिल्हा बॅंक अध्यक्ष प्रवीण दरेकर कणकवली मतदारसंघात दाखल झाले आहेत. पुढील कालावधीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही सभा घेण्याचे नियोजन भाजपकडून सुरू आहे. शिवसेना उमेदवारांची प्रचाराची धुरा खासदार विनायक राऊत यांच्यासह पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक यांच्यासह भाजपचे युवा नेते संदेश पारकर, अतुल रावराणे सांभाळत आहेत. 

सिंधुदुर्गातील तीन मतदारसंघांपैकी सावंतवाडीत राष्ट्रवादी; तर कणकवली आणि कुडाळमध्ये कॉंग्रेसचे उमेदवार लढत देत आहेत; मात्र त्यांच्याकडून फारशी प्रचार यंत्रणा सुरू असल्याचे चित्र नाही. मनसे आणि वंचित आघाडीच्या उमेदवारांनी सभा, मेळावे आदींपेक्षा थेट जनसंपर्क करून आपापली प्रचारयंत्रणा सुरू ठेवली आहे. 

यंदाच्या निवडणुकीत प्रचारासाठी फार कमी कालावधी असल्याने सर्वच उमेदवारांची धावपळ सुरू आहे. दररोज दहा ते बारा ठिकाणी बैठका, संध्याकाळी जेवणावळी आणि रात्री उशिरापर्यंत व्यक्‍तिगत भेटींवर जोर देण्यात आला आहे. उमेदवारांप्रमाणे त्यांचे विश्‍वासू कार्यकर्तेदेखील आपापले बूथ आणि गावाची जबाबदारी सांभाळताना दिसत आहेत. 

""सिंधुदुर्ग आणि कोकणचा सर्वांगीण विकास या मुद्द्यावर आम्ही ही निवडणूक लढतोय. वैभववाडी-कोल्हापूर रेल्वे, महामार्ग चौपदरीकरण आदी कामे भाजप सरकारनेच मार्गी लावली. त्याचप्रमाणे पुढील काळात रखडलेला "सी वर्ल्ड' प्रकल्पदेखील पूर्ण होईल. रोजगार देणारे अनेक प्रकल्प आम्हांला राबवायचे आहेत. हेच मुद्दे घेऊन आम्ही जनतेसमोर जात आहोत.'' 
- विनोद तावडे,
सामाजिक व सांस्कृतिकमंत्री, भाजप 

""विकास हाच आमचा अजेंडा आहे. आम्हाला इथली अतिरेकी प्रवृत्तीदेखील हद्दपार करायची आहे. राडेबाजी, चिखलफेक यांमुळे सिंधुदुर्ग जिल्हा बदनाम होतोय. गेल्या पाच वर्षांत कुडाळ, सावंतवाडी मतदारसंघांत विकासकामे झाली, तर कणकवली मतदारसंघ विकासात मागे राहिला. कणकवलीचा हा बॅकलॉग भरून काढण्यासाठी आम्ही ही निवडणूक लढवतोय.'' 
- विनायक राऊत,
खासदार, शिवसेना 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati Lok Sabha Election : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; पंजाबची गळती सुरू जवळपास निम्मा संघ गारद

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT