ओरोस : देशातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून बहुमान मिळालेल्या सिंधुदुर्गाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. कोंड नेस्ट ट्रॅव्हलर या मॅगझिनने यंदाच्या वर्षी भेट देण्यासाठी जगातील ३० सर्वात सुंदर पर्यटन स्थळांची यादी जाहीर केली. यामध्ये महाराष्ट्रातील एकमेव सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश आहे. यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटनदृष्ट्या जागतिक स्तरावर पोहोचल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले. (Sindhudurg in Top 30 Tourism Places in The World)
कोंड नेस्ट ट्रॅव्हलर या मॅगझिनने जाहीर केलेल्या यादीत जगप्रसिद्ध लंडन, सिसिली, सिंगापूर यासह इस्तंबूल, इजिप्त, माल्टा, सर्बिया, केपवर्दे अशा आंतरराष्ट्रीय तसेच सिक्कीम, मेघालय, ओरिसा, राजस्थान, गोवा, कोलकाता, भिमताल, केरळमधील आयमानम अशा भारतीय नऊ पर्यटन स्थळांत महाराष्ट्रातील एकमेव सिंधुदुर्गचा समावेश केला आहे. जगातील सर्वात सुंदर ३० पर्यटन स्थळांच्या यादीमध्ये सिंधुदुर्गचा समावेश असणे ही खरोखरच आपल्यासाठी मोठी अभिमानाची गोष्ट आहे, अशी प्रतिक्रिया जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली. स्वच्छ सुंदर किनारे, समुद्रातील प्रवाळ, सिंधुदुर्ग किल्ला, त्सुनामी आयलंड या सारख्या पर्यटनस्थळांविषयी यामध्ये माहिती देण्यात आली आहे. स्कुबा डायव्हिंगची सोय, समुद्री जीवनाच्या दर्शनाची सोयही उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली आहे. चिपी विमानतळ सुरू झाल्यामुळे सिंधुदुर्गातील पर्यटन सोपे झाल्याने जागतिक पर्यटनाच्या नकाशावर सिंधुदुर्ग पोहचला आहे.
कोंड नेक्ट ट्रॅव्हलर आहे तरी काय?
कोंड नेस्ट ट्रॅव्हलर, इंडिया ही https://www.cntraveller.in/story/best-places-to-visit-in-india हे एक मॅगझिन तसेच वेबसाईट असून दरवर्षी जगातील सुंदर पर्यटन स्थळांची यादी ते प्रसिद्ध करतात. त्यामध्ये या पर्यटन स्थळांची संपूर्ण माहिती दिली जाते. जागतिक स्तरावरील पर्यटनास चालना देण्यासाठी त्यांच्याकडून हा उपक्रम दरवर्षी राबवला जातो.
मंदीत दिलासा
सिंधुदुर्ग जिल्हा हा नैसर्गिक रचनेत जगात सुंदर आहे. या जिल्ह्याची भुरळ देश-विदेशी पर्यटकांना अनेक वर्षांपासून पडलेली आहे. त्यामुळे गोवा राज्यापाठोपाठ विदेशी पर्यटक मोठ्या प्रमाणात सिंधुदुर्ग जिल्ह्याला भेट देताना दिसतात. मात्र, गेली दोन वर्षे कोरोनामुळे पर्यटक यायचे थांबले होते. परिणामी येथील पर्यटन विकासाला ब्रेक लागण्याची चिन्हे निर्माण झाली होती; परंतु जागतिक यादीत जिल्ह्याचा समावेश झाल्याने रोडावलेली पर्यटक संख्या पुन्हा वाढण्यास मदत मिळणार आहे. जगातील गर्भ श्रीमंत पर्यटकांपासून सर्वसाधारण पर्यटक सुद्धा जिल्ह्यात मोठ्या संख्येने दाखल होण्याची शक्यता वाढली आहे.
मानाचे स्थान
या यादीमध्ये श्रीलंका, भूतान, कतार, जपान, युएई, इजिप्त, ओक्लाहोमा, सेऊल, गोबन, उझबेकिस्तान यासारख्या पर्यटनस्थळांचा समावेश आहे. आता या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पर्यटनस्थळासह सिंधुदुर्गचा समावेश झाला आहे. पर्यटनाच्या दृष्टीने खऱ्या अर्थाने सिंधुदुर्ग हे आंतरराष्ट्रीय पर्यटनाच्या नकाशावर आल्याचे दिसून येते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.