पावस (रत्नागिरी) : ग्रामपंचायत निवडणुकीचे वातावरण तापू लागल्याने पावस ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हालचालींना वेग आला असून मागील पंचवार्षिक निवडणुकीत झालेली चूक पुन्हा होऊ नये, याकरिता सर्व घटकांना एकत्र केले आहे. शिवसेनेची एकहाती सत्ता आणण्याकरिता जोरदार मोर्चेबांधणीला सुरवात केली आहे.
पूर्वीचा मित्रपक्ष असलेल्या भाजपशी लढत होणार आहे. आजवर शिवसेनेला एक हाती सत्ता प्रस्थापित करता आलेली नाही. या खेपेस पक्षातून बाहेर गेलेले शिवसैनिक, राष्ट्रवादीतून आलेले शिवसैनिक व गाव पॅनलचे सदस्य अशा सगळ्यांची मोट बांधणे सुरू आहे. २००० मध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे पूर्ण बहुमत होते.
२००५ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनलचे सरपंच लाईक फोंडू यांच्या मार्गदर्शनाखाली विकासकामांचा झंझावात झाला होता. २०१० शिवसेना-भाजप युती झाली. सरपंचपद अडीच वर्षाचे ठरवून घेण्यात आले. परंतु शिवसेनेच्या पावसकर यांनी भाजपला सरपंचपद न देता राष्ट्रवादी काँग्रेसचे पाठबळ घेत पुन्हा सरपंचपद मिळवले होते. तेव्हापासूनच शिवसेनेने राष्ट्रवादीची सलगी करण्याचा प्रयत्न सुरू झाला. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला.
येथील अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादीमध्ये राहिले. काहीजण सेनेत गेले. त्यामुळे २०१५ मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेनाविरुद्ध गाव पॅनल असा सामना रंगला. त्यात शिवसेना आठ जागा तर गाव पॅनेलला पाच जागा मिळाल्या. परंतु माजी सरपंचांच्या हट्टाचा फायदा उठवत गावपॅनलचे बहुमत नसतानादेखील सेनेच्या दोन सदस्यांना फोडून त्यांना सरपंच व उपसरपंचपद दिले. पुढील पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ता काबीज करण्यासाठी आमदारानी गाव पॅनलच्या सदस्यांना सेनेत प्रवेश करून घेऊन आपल्या गटाचा सरपंच शेवटच्या वर्षात बसवला.
शिवसेनेशी कडवी झुंज
भाजपला या खेपेस शिवसेनेशी कडवी झुंज द्यावी लागणार आहे. त्या दृष्टीने भाजपचे जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन यांनी आपले फासे टाकण्यास सुरवात केली. शिवसेनेच्या जुन्या-नव्याचा मेळ घालण्यात आमदार यशस्वी झाले असले तरी त्यांना विचलित करण्याचे काम भाजप करण्याची शक्यता आहे. सरपंचपदाचे आरक्षण अगोदर पडले नसले तरी आपल्या गटाचे वर्चस्व राहावे, याकरिता शिवसेनेमध्ये रस्सीखेच सुरू आहे.
तेवढी ताकद उरली नाही..
शिवसेनेला रोखणाऱ्या गाव पॅनलचे महादेव आखाडे यांचे निधन झाल्यामुळे संघर्ष कमी झाला आहे. भाजपची म्हणावी तेवढी ताकद पावसमध्ये उरली नाही. गाव पॅनलचे युवा नेते यांनी शिवबंधन बांधल्याने सेनेची बाजू मजबूत झाली आहे.
संपादन - स्नेहल कदम
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.