93480
वेंगुर्ले ः राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या समारोप कार्यक्रमाचे उद्घाटन करताना प्रा. वैभव खानोलकर आदी.
कर्तव्यनिष्ठता हीच खरी देशसेवा
प्रा. वैभव खानोलकर; वेंगुर्लेत एनएसएस शिबिराचा समारोप
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. ४ ः देशभक्ती म्हणजे आपले कर्तव्य प्रामाणिकपणे व निष्ठेने करणे होय, असे प्रतिपादन प्रा. वैभव खानोलकर यांनी व्याख्यानात केले.
येथील लोकनेते अॅड. दत्ता पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजनांतर्गत ‘व्यसनमुक्तीसाठी युवक’, या संकल्पनेवर सात दिवसीय निवासी शिबिर तुळस येथे उत्साहात पार पडले. या शिबिराच्या समारोप प्रसंगी प्रा. वैखानोलकर यांचे ‘आजचा युवा आणि देशप्रेम’, यावर व्याख्यान झाले. यावेळी महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ. पूजा कर्पे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.
प्रा. खानोलकर म्हणाले, ‘‘देशाबद्दल नागरिक म्हणून असणारी कर्तव्ये आणि जबाबदारी या विषयावर मेडिकल कॉलेजच्या युवाईसमोर व्यक्त होताना भारताला जर महासत्ता बनवायचे असेल, तर तरुणांनी पुढाकार घेतला पाहिजे. सरकारला नावे ठेवण्यात व्यस्त न राहता आपण निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले पाहिजे. केवळ स्वप्न न बघता ते पूर्णत्वास नेण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न आणि चिकाटीने अभ्यास केला पाहिजे. जगात जेव्हा जेव्हा क्रांती झाली, परिवर्तनाची लाट आली, तेव्हा ते कार्य केवळ तरुणांनीच केले. मग ते स्वराज्याचे तोरण बांधणारे जाणते राजे शिवछत्रपती, शिकागोला भारतीय तत्त्वज्ञान ओजस्वी भाषेत मांडणारे योद्धा संन्यासी स्वामी विवेकानंद, पसायदान मागणारे ज्ञानेश्वर माऊली असोत, हे सगळे तरुण होते. पाश्चात्य देशांत ही समाज परिवर्तनाची किमया सुद्धा युवा समाज सुधारकांनीच केली.’’
---
कामाशी प्रामाणिक हीच देशभक्ती
प्रा. खानोलकर म्हणाले की, ‘‘देश हाच देव मानून आपण आपल्या कामाशी प्रामाणिक राहून जर कार्य केले, तर निश्चितपणे ती देशभक्ती ठरेल. आपल्या अभ्यासपूर्ण मांडणीतून केलेल्या देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी तरुणाईची ताकद आणि सकारात्मक प्रयत्न करण्याची जबाबदारी माझ्यावरच आहे, याची जाणीव या देशातील युवाईने पावलोपावली ठेवल्यास देशसेवेची पहिली पायरी यशस्वीरित्या चढता येईल.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.