09750
कोलझर ः मधलीवाडी येथे भरत देसाई यांच्या बागायतीत केलेले नुकसान. (छायाचित्र ः राजेश देसाई)
09747
तळकट ः देऊळवाडी येथे हत्तींनी दगडी कुंपणाचे नुकसान केले.
09748
तळकट ः हतींनी पाणीपुरवठ्याची पाईपलाईन व स्प्रिंकलर मोडून टाकले.
09749
कोलझर ः मधलीवाडी येथील खापोरकोंड भागात हत्तींनी नदीजवळ धुडगूस घातल्याच्या पाउलखुणा.
‘वन’च्या खेळात हत्ती ‘कोअर एरिया’त
वस्तीजवळ धुडगूस; कोलझर, तळकट-देऊळवाडीत प्रवेश
सकाळ वृत्तसेवा
कोलझर, ता. १६ ः वन विभागाच्या खेळात हत्तींचा कळप थेट वस्तीजवळ असलेल्या बागायतीच्या ‘कोअर एरिया’त पोहोचला आहे. हत्तींनी काल (ता. १५) रात्री कोलझर-मधलीवाडी आणि तळकट-देऊळवाडी भागात बागायतीचे मोठे नुकसान केले. हा भाग वस्तीचा आहे. त्यामुळे वन विभागाने आता ठोस पावले उचलून हत्तींचा कळप माघारी पिटाळावा, अशी मागणी जोर धरत आहे.
हत्तींच्या उपद्रवाचे संकट तीव्र झाले आहे. इतके दिवस हत्ती रायचे वायंगण आणि बाद्याची राई या दाट जंगल असलेल्या भागात मुक्काम ठोकत होते. तेथून तळकट कट्टावाडीतील वस्तीपासून तुलनेत दूर बागायतीचे नुकसान करत होते. काल मात्र त्यांनी थेट वस्तीत असलेल्या बागायतीत घुसून मोठे नुकसान केले. हत्तींना हटविण्यासाठी काल सायंकाळी वन विभागाने मोहीम सुरू केली. ड्रोनच्या मदतीने त्यांचे लोकेशन कोलझरच्या परिसरात दिसू लागले. त्या दिशेने पथक गेले; मात्र प्रत्यक्षात हत्तींनी त्यांना हूल देत थेट वस्ती असलेल्या भागात प्रवेश केला. कोलझर पोष्टाजवळ मुख्य रस्ता पार करून हा कळप भरत देसाई यांच्या बागेत घुसला. त्यांनी त्यांच्या केळी बागायतीचे मोठे नुकसान केले. तेथून खाली उतरत नारळ, सुपारीच्या बागांमधून धुमाकूळ घालत ते नदीपर्यंत पोहोचले. तेथून नदी पार करत तळकट देऊळवाडा या भागात बागायती क्षेत्रात प्रवेश केला. या प्रवासात अनेक ठिकाणी कुंपण, पाणी पुरवठ्यासाठीचे पाईप, स्प्रिंकलर तोडून टाकले. तेथून एन. टी. सावंत यांच्या बागेत केळी बागेचे मोठे नुकसान केले. दगडी कुंपणालाही धक्का देत ते पाडले. यानंतर हत्ती नेमके कोठे गेले, याबाबत संभ्रम आहे. हे सर्व नुकसान सत्र सुरू असताना वन विभागाच्या पथकाला त्याची काहीच कल्पना आली नाही. ते वेगळ्याच ठिकाणी हत्ती हटाव मोहीम राबवत होते. हे नुकसान आज सकाळी उघड झाले.
दरम्यान, वन विभागाच्या हत्ती हटवण्याच्या प्रयत्नांबाबत स्थानिक पातळीवर संभ्रम निर्माण झाला आहे. काल रात्री हे हत्ती कोलझर येथील वेटे कुटुंबीयांच्या बागायतीच्या भागात होते. त्यांनी याबाबतची कल्पना वन विभागाच्या स्थानिक कर्मचाऱ्यांना दिली. त्यांनी ‘‘सध्या जेवण चालू आहे, जेवण झाले की येतो’’, असे उत्तर दिल्याचे त्यांचे म्हणणे आहे. यानंतर बराच वेळ कर्मचारी पोचलेच नाहीत. याच दरम्यान हे हत्ती खाली उतरून कोलझर मधलीवाडीकडे आले. हत्ती हटाव मोहीम रात्रीच्यावेळी राबवली जाते. दिवसा ड्रोनच्या मदतीने या हत्तींचे लोकेशन शोधून त्यांना या भागातून माघारी न्यावे, अशी मागणी होत आहे. वन विभागाच्या हत्ती हटावच्या खेळात स्थानिकांची रोजीरोटी असलेली बागायती उद्ध्वस्त होण्याची भीती निर्माण झाली आहे. यामुळे परिसरात दहशत आहे.
...............
चौकट
पंचनामे करण्यातही चालढकल
हत्तींकडून मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. याचा साधा पंचनामाही वेळेत होत नसल्याच्या तक्रारी आहेत. नुकसानाबाबत कळवूनही चार-चार दिवस याची साधी दखलही घेतली जात नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला. कोलझर येथे माड बागायतीचे नुकसान झाल्याची तक्रार चार दिवसांपूर्वी केली होती; मात्र वन विभागाचे कर्मचारी आजपर्यंत तेथे पोहोचले नव्हते. ते आले तरी सादर करण्यासाठीच्या कागदपत्रांची यादी बागायतदारांसमोर ठेवली जाते. ऑनलाईन पीक नोंदणी पध्दतीमुळे अनेकांनी माड, सुपारी, केळी याच्या नोंदी सातबारावर केलेल्या नाहीत. पंचनाम्यावेळी नुकसान प्रत्यक्ष दिसत असतानाही अशा नोंदीच्या सातबाराचा आग्रह धरला जात आहे. वन विभागाच्या आडमुठ्या धोरणामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना फटका बसत आहे.
..............
चौकट
स्थानिक आमदार आहेत कुठे?
पंचक्रोशीत हत्तींचे संकट तीव्र झाले आहे. स्थानिक, वन कर्मचारी आणि अधिकारी हत्तींना हटविण्यासाठी प्रयत्न करत आहेत; मात्र मुळातच त्यांच्याकडे यंत्रणा कमी पडत आहे. वरिष्ठ स्तरावरून या प्रश्नाबाबत फारसे गांभीर्य नसल्याचे चित्र आहे. पावसाळ्यात हत्ती या भागात राहिल्यास कोट्यवधीचे नुकसान होण्याबरोबरच शेकडो कुटुंबांचा रोजीरोटीचा आधार असलेली बागायती उद्ध्वस्त होण्याची भीती आहे. स्थानिक आमदार दीपक केसरकर यांना या भागातून आतापर्यंतच्या आमदारकीच्या सर्व टर्मना भरभरून मते मिळाली आहेत. त्यांनी या भागातील प्रत्येक दौऱ्यावेळी इथल्या बागायतींबाबत भरभरून भाषणे केली आहेत; मात्र हत्तींचे संकट या भागावर इतके दिवस गडद होऊनही त्यांनी याची साधी दखलही घेतली नसल्याची नाराजी स्थानिक पातळीवरून व्यक्त होत आहे. त्यांचे सध्याच्या राज्य सरकारमध्ये वजन आहे. याचा वापर करून तातडीने हत्ती हटविण्यासाठी यंत्रणा आणावी व लोकांना भयमुक्त करावे, अशी मागणी येथील बागायतदार करत आहेत.
----------------
कोट
हत्तींना कोलझर पंचक्रोशीतून मागे हटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांना आलेल्या मार्गाच्या वेशीपर्यंत नेण्यातही यश आले होते; मात्र ते तेथून परत आले. कदाचित मोठा पाऊस सुरू झाल्यानंतर हत्ती या भागातून बाहेर पडण्याची शक्यता आहे. कारण मोठ्या पावसाच्यावेळी हत्ती दरीच्या भागात न राहता वरच्या भागात सरकतात.
- नवकिशोर रेड्डी, उपवनसंरक्षक, सावंतवाडी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.