‘शासन आपल्या दारी’चे
एसटींचे भाडे ८२ लाख!
३५३ गाड्या आरक्षित, एकूण खर्च पावणेदोन कोटींवर?
रत्नागिरी, ता. १६ ः राज्याला मार्गदर्शक ठरणारा ‘शासन आपल्या दारी’ हा शासनाचा पहिला उपक्रम रत्नागिरीत झाला. प्रचंड गाजावाजा करून आलिशान मंडप उभारून जिल्ह्यातील सुमारे २५ हजार लाभार्थ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विविध दाखल्यांचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाला जिल्ह्यातून आलेल्या हजारो लाभार्थ्यांसाठी ३५३ एसटी आरक्षित करण्यात आल्या होत्या. या एसटींच्या भाड्याचा खर्च ८२ लाख रुपये झाल्याची माहिती हाती आली आहे. मंडप आणि इतर खर्च पाहिला तर दीड ते पावणेदोन कोटींवर खर्च झाल्याचे समजते.
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी अनेक उपक्रम राबवण्यात येत आहेत. आगामी निवडणुकीला सामोरे जाताना युतीच्या सरकारने दहा महिन्यांत राज्याच्या विकासाला प्रचंड गती दिली. गतिमान शासन म्हणून त्याचा प्रचार सुरू झाला. विविध कामांसाठी आणि दाखल्यांसाठी ग्रामीण भागातील जनता शासनाच्या आणि प्रशासनाच्या दारात येते; मग आपणच जनतेच्या दारात गेलो तर शासनसुद्धा ग्रामीण भागात प्रत्येक घराघरांत पोहचेल, ही धारणा ठेवून युती शासनाने शासन आपल्या दारी हा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला. पालकमंत्री उदय सामंत हे मुख्यमंत्र्यांच्या जवळचे नेते आहेत. त्यांच्या शब्दाला वजन असल्याने राज्याला मार्गदर्शक ठरणारा शासन आपल्या दारी हा पहिला उपक्रम रत्नागिरीत घेण्याचा निर्णय झाला. अतिशय नियोजनबद्ध हा कार्यक्रम घेण्यात आला.
दोन ते तीन महिने आधी याचे नियोजन सुरू झाले. शासनाचाच हा उपक्रम असल्याने जिल्हा प्रशासनाच्या प्रत्येक अधिकाऱ्यावर जबाबदारी देण्यात आली. गावे आणि तालुक्यांचे नियोजन करण्यात आले. अधिकाऱ्यांनी गावागावांत जाऊन या कार्यक्रमाचा प्रसार आणि प्रचार केला. २५ मे रोजी रत्नागिरीच्या प्रमोद महाजन क्रीडा संकुलामध्ये हा भव्य कार्यक्रम घेण्याचे नियोजन झाले. अलिबागला झालेल्या एका जाहीर कार्यक्रमात उन्हाच्या तडाख्यामुळे गालबोट लागले होते. त्यामुळे जिल्ह्यातून येणाऱ्या लाभार्थ्यांना उन्हाची झळ बसू नये यासाठी आलिशान बंदिस्त मंडप घालण्यात आला. पाण्याची बाटली, ओआरएस, मोठे फॅन, कुलर आदींची व्यवस्था केली होती. जिल्ह्यातून येणाऱ्या लाभार्थ्यांसाठी शासनाकडून जिल्ह्यासह राज्यातील विविध ठिकाणांहून ३५३ एसटी महामंडळाच्या गाड्या आरक्षित करण्यात आल्या होत्या. या गाड्यांना नंबर देऊन त्या गाड्यांमध्ये क्षमतेएवढे लाभार्थी बसवण्यात आले. त्यांना रत्नागिरीत आल्यानंतर एसटीपासून ते मंडपापर्यंत पोहचवणे आणि परत गाडीपर्यंत आणण्याची जबाबदारी शासकीय कर्मचाऱ्यांवर होती. यातून सुमारे १५ ते १६ हजार लाभार्थ्यांना आणण्यात आले आणि कार्यक्रम झाल्यानंतर परत सोडण्यात आले. एसटींच्या या गाड्यांचा खर्च ८२ लाखांवर गेल्याची माहिती समोर आली आहे. आलिशान मंडपाचा खर्च या दरम्यान असण्याची शक्यता आहे. इतर सोयीसुविधांचा विचार केला तर शासन आपल्या दारीचा खर्च दीड ते पावणेदोन कोटींवर गेल्याचे समजते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.