09855
दोडामार्ग ः हेवाळे शाळेत कायमस्वरूपी शिक्षकासाठी ग्रामस्थांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना जाब विचारला.
(छायाचित्र ः संदेश देसाई)
शिक्षकप्रश्नी हेवाळेवासीय आक्रमक
गटशिक्षणाधिकाऱ्यांना घेराओ; गटसाधन केंद्रात शाळा भरविण्याचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. १६ : शून्य शिक्षकी शाळा असलेल्या हेवाळे जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ मध्ये कार्यरत असलेल्या दोन्ही शिक्षकांची कायमस्वरूपी नेमणूक करावी, या मागणीसाठी आज पालकांसह ग्रामस्थांनी येथील गटसाधन केंद्रावर धडक देत गटशिक्षणाधिकारी निसार नदाफ यांना घेराओ घातला. यावेळी नदाफ यांनी शाळेवर देवगड येथून बदली झालेल्या दोघा शिक्षकांना कायमस्वरूपी नेमणूक देण्यात आली आहे; मात्र त्यांनी बदलीविरोधात न्यायालयात दाद मागितल्याने सध्या ही प्रक्रिया तात्पुरती स्थगित झाल्याची माहिती दिली. तोपर्यंत एक शिक्षक कामगिरीवर देण्यात आला असून दुसरा शिक्षक मंगळवारपर्यंत रुजू होईल, असे आश्वासनही त्यांनी पालकांना दिले; मात्र, आश्वासनांची पूर्तता न झाल्यास बुधवारी विद्यार्थ्यांना घेऊन गटसाधन केंद्रातच शाळा भरवू, असा इशारा पालकांनी दिला.
यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष भाऊसाहेब देसाई, सरपंच साक्षी देसाई, रुपेश कदम, उपसरपंच समीर देसाई, आनंद सम्राट, विलास गवस, ठाकरे गट शिवसेना तालुकाप्रमुख संजय गवस, युवासेना तालुकाप्रमुख मदन राणे, आत्माराम सडेकर आदींसह पालक व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी पालकांनी नदाफ यांना विचारणा केली. अखेर येत्या मंगळवारपर्यंत कामगिरीवर दुसरा शिक्षक देऊ, असे आश्वासन नदाफ यांनी दिले. त्यावर पूर्ण समाधानी न झालेल्या ग्रामस्थांनी आश्वासनाची पूर्तता न झाल्यास बुधवारी मुलांना घेऊन गटसाधन केंद्रात शाळा भरवू, असा इशारा दिला.
--
रिक्त पदांबाबत विचारला जाब
हेवाळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्र. १ मध्ये पटसंख्या १४ असून नव्याने ४ मुले दाखल झाली आहेत; मात्र आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत येथे कार्यरत असलेल्या दोन्ही शिक्षकांची बदली झाल्याने या दोन जागा रिक्त आहेत. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने ते टाळण्यासाठी शाळेत कायमस्वरूपी शिक्षक द्यावेत, या मागणीसाठी पालकांनी गटसाधन केंद्रावरच धडक देत रिक्त पदांबाबत जाब विचारला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.