१२ (टूडे ४ साठी)
(२९ जून पान आठ)
जनरिती भाती ...........लोगो
rat१२p२.jpg ः
२३M१५६१७
डॉ. विकास पाटील
कोकणातील आकाड (आषाढ) महिन्यातील परंपरा
मृग नक्षत्रात सर्वत्र पाऊस पडतो; पण कोकणात मात्र मृग नक्षत्राअगोदर पाऊस सुरू होतो. या वेळी कोकणातील शेतीची कामे जोर धरू लागतात. कोकणात प्रामुख्याने भातशेती केली जाते. या काळात शेतकरी जोत धरून चिखल करण्याच्या मागे लागतो. शेतीकामाला प्रारंभ करताना राखण देण्याचा प्रघात कोकणात आहे. शेती उदंड पिकावी, शेताचे, शेतकऱ्यांचे आणि प्राण्यांचे रक्षण व्हावे यासाठी शेतात वा परसात विशिष्ट ठिकाणी कोंबडा बळी दिला जातो, यालाच राखण देणे म्हणतात. काहीजण हातभेटीचा नारळही राखण म्हणून देतात. या ज्येष्ठ महिन्यातील अमावस्येनंतर आषाढ महिना सुरू होतो. याच दरम्यान मृग नक्षत्र संपून आद्रा नक्षत्र सुरू होते. यालाच बोलीभाषेत अडदरा म्हटले जाते. त्याच दरम्यान, २१ जूनला दक्षिणायनाचा आरंभ होतो. २१ जून हा दिवस वर्षातील सर्वात मोठा दिवस म्हणून मानला जातो. आषाढ महिन्यात आकाड महिना का म्हणतात? याचे उत्तर ज्येष्ठांकडून मिळते.
--
२१ जूननंतर दिवस लहान होत जातात, रात्र मोठी होत जाते. म्हणजेच दिवस आकडत जातात. म्हणूनच आषाढ महिन्यास आकाड म्हटले जाते, असे उत्तर आपणास मिळते. या महिन्यात एखाद्यावेळी पाऊस पडायला उशीर झाला वा दुष्काळसदृश परिस्थिती दिसू लागली तर कोकणात पाऊस मागण्याचा विधी करतात. या विधीस विशिष्ट असे नाव नाही. गावाच्या सीमेवर सावर नावाच्या झाडाची होळी केली जाते. देवदेवतांना गाऱ्हाणे घातले जाते. पाऊस यावा म्हणून धोंडी नावाची कल्पित देवता रचून तिच्यासमोर पावसासाठी विनंती करणारी लहान मुले गावभर फिरतात. यातील काही मुले अंगावर वस्त्र परिधान न करता केवळ कडुलिंबाच्या डहाळ्या अंगावरती गुंडाळतात. हातात एका काठीला बेडूक लटकवून त्याला गावभर फिरवतात. ''धोंडी धोंडी पाणी दे, साळ माळ पिकू दे'', असे लोकगीत त्यांच्या तोंडी असते. आषाढ महिन्यात आषाढी एकादशी ही मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. आषाढी एकादशीचा उपवास अनेकजण करतात. या दिवशी प्रत्येक घरात देवपूजा होते. अनेक घरात संपूर्ण कुटुंबाचा एकच देव असतो. त्यास मोठा देव म्हटले जाते. या दिवशी अशा मोठ्या देवाची (देव्हाऱ्यातील संपूर्ण देवांची) देवपूजा भक्तिभावे केली जाते. त्यानंतर द्वादशी दिवशी गोडाधोडाचा नैवेद्य देवाला दाखवला जातो. आषाढ महिन्यात आद्रा आणि पुनर्वसू (तरणा पाऊस) ही दोन नक्षत्रे खूपच पावसाची येतात. आषाढ हा सृजनाला संजीवनी देणारा महिना आहे. आषाढातल्या एका काळ्या ढगाला बघून मेघदूत या कालिदासाच्या अमर काव्याची निर्मिती झाली होती. सृष्टीला पल्लवित करणारा हा पाऊस संपूर्ण अर्थव्यवस्था, समाजव्यवस्था यांचा पायाच आहे. या काळात कोकणात खूप पाऊस होतो. विशेषतः आषाढात पडणारा पाऊस हा शेतीच्यादृष्टीने महत्वाचा असतो. आषाढात भरपूर पाऊस पडला तर भातपिक भरपूर येईल, असा अंदाज शेतकरी कित्येक वर्षे करत आला आहे. नुकतीच लग्न झालेली नवी नवरी आकाड पाळते. आषाढ महिन्याच्या सुरवातीस पाच दिवस किंवा त्यापेक्षा अधिक ती माहेरी राहते. माहेरीही तिच्या मनासारखे सारे केले जाते जाते. आकाड पाळण्याची परंपरा असल्यामुळे नव्या नवरीस पाच दिवसाची माहेरी राहण्याची मुभा मिळते. पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब आणि घरात माणसांचा मोठा राबता असल्यामुळे तसेच शेतीची कामे सुरू झाल्यावर आणि रोपलागणीच्या काळात घरात असणाऱ्या नववधूवर कामाचा ताण वाढत असावा. लग्न झाल्यानंतर तिला हक्काने माहेरी जाता येत नाही. तिला विश्रांती मिळावी, तिच्या माहेरात हक्काच्या आणि प्रेमाच्या माणसांत राहता यावे, सासरच्या राबत्यातून उसंत मिळावी म्हणूनच आकाड पाळण्याची प्रथा रूढ झाली असावी, असे वाटते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बिळवस गावच्या श्री देवी सातेरीची जत्रा आषाढ महिन्यात होते. सुमारे ७०० वर्षापूर्वी उभारलेल्या श्री सातेरी देवीच्या जलमंदिरामुळे मसुरे गावातील बिळवस या वाडीस महत्व प्राप्त झाले. या मंदिराच्या तिन्ही बाजूस पाणी आहे. पूर्वी गाभाऱ्यात मूर्ती नव्हती तेव्हा एक उंच वारूळाची पूजा केली जात होती. त्या वारूळात शेषरूपात देवीचे वास्तव्य आहे, असे भक्तांचे म्हणणे आहे. या मंदिराबाबत असे सांगितले जाते की, मंदिरा सभोवतालच्या तलावात गाई-म्हशी पाणी पीत. एके दिवशी तलावातील वारूळातून रक्त येऊ लागले. त्या वेळी एका भक्ताच्या स्वप्नात देवीने दृष्टांत देऊन ''माझं वास्तव्य या तलावातील वारूळात आहे. जनावरांपासून मला त्रास होत असल्याने या वारूळावर माझ्यासाठी देवालय बांधा'', असा आदेश दिला. देवीचा आदेश म्हणून ग्रामस्थांनी या ठिकाणी मंदिर बांधले. आषाढ महिन्यात या मंदिरात मोठी जत्रा भरते आणि देवीच्या दर्शनासाठी दूरवरून भाविक एकत्र येतात. संपूर्ण कोकणात आषाढ महिन्यात होणारी एकमेव यात्रा आहे. आषाढाच्या शेवटी येणारी गटारी अमावस्या कोकणात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. शेतीकामातून मोकळा झालेला शेतकरी, कष्टकरी आता श्रावणातल्या भक्तीत, भजनात, कीर्तनात दंग होणार असतो. त्यासाठी श्रावण महिन्यात तो मांसाहार करत नाही म्हणूनच गटारी अमावस्या मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. या दिवशी मांसाहार घराघरात केला जातो. खरेतर, गटारी अमावस्या ही दीपपूजनाची अमावस्या आहे. या दिवशी घरात आणि देवळात दीपप्रज्वलन करावे, असा प्रघात आहे. त्यामुळे काही ठिकाणी दिव्यांनी घर, मंदिर आणि परसबाग उजळून निघते. कोकणातील आषाढ महिना हा वैशिष्ट्यपूर्ण असतो. तरारून आलेल्या भाताच्या रोपा, सृष्टीने पांघरलेली हिरवी शाल, डोंगररांगांवर उतरलेले ढग, आकाशात पाण्याने तुडुंब भरलेल्या काळ्या ढगांची गर्दी, सतत वर्षणाऱ्या जलधारा हे सारे अप्रूप फक्त कोकणातच आषाढ महिन्यात पाहता येते. असा हा कोकणातील आषाढ महिना मन मोहवणारा आहे.
(लेखक महाविद्यालयाचे मराठीचे प्राध्यापक आहेत.)
-
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.