24265
दोडामार्ग ः येथे आयोजित पत्रकार परिषदेत उपस्थित राजेंद्र म्हापसेकर, एकनाथ नाडकर्णी, सुधीर दळवी, संतोष नानचे. (छायाचित्र ः संदेश देसाई)
एमआयडीसी लाँग मार्चला पाठिंबा
दोडामार्गात भाजपचा निर्णय; नेत्यांच्या दुर्लक्षामुळे तालुका शापित
सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. १७ ः आडाळी एमआयडीसीत उद्योजक आणण्यासाठी औद्योगिक महामंडळ व राज्यसरकार निष्कामी ठरत असल्याने दशक्रोशीतील सरपंच आणि ग्रामस्थांनी पुकारलेल्या लाँग मार्च आंदोलनाला भाजप कार्यकर्ते पूर्णपणे पाठींबा देत आहोत. स्थानिक आमदार जे कॅबिनेट मंत्री आहेत, ते युवकांच्या रोजगाराच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असलेला हा विषय मार्गी लावण्यास अपयशी ठरले आहेत. नेत्यांच्या दुर्लक्षामुळे तालुका शापित असल्यासारखी स्थिती आहे, असा टोला दोडामार्ग भाजप कार्यकर्त्यांनी आज पत्रकार परिषदेतून लगावला.
येथील स्नेह रेसिडेन्सी हॉटेलमध्ये भाजपची पत्रकार परिषद झाली. यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, तालुकाध्यक्ष सुधीर दळवी, नगरसेवक संतोष नानचे, चंदू मळीक उपस्थित होते. सरकारमध्ये त्यांचा मित्र पक्ष असलेल्या शिवसेना पक्षाचे आमदार तथा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यावर तोफ डागली.
श्री. म्हापसेकर यांनी, राज्यात एमआयडीसी जाहीर केल्या जातात आणि चार-पाच वर्षांत त्या विकसितही होतात; मात्र, आडाळी एमआयडीसी अद्यापही विकसित न होण्यामागचे कारण मात्र गुलदस्त्यात आहे, असे सांगितले. श्री. नाडकर्णी म्हणाले, ‘‘२०१३ ला नारायण राणे यांनी आडाळी एमआयडीसी मंजूर करून आणली; मात्र, २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीच्या सत्तांतरानंतर या एमआयडीसीचे काम रखडले. या काळातील मंत्री निष्क्रिय होते. ही एमआयडीसी चालू झालेली पाहता आली नाही तर ते आमचे मोठे दुर्दैव आहे. सरकारला जाग आणण्यासाठीच हा लाँग मार्च होणार असून याला तालुक्यातील भाजपचा पूर्णपणे पाठिंबा आहे.’’
श्री. मळीक म्हणाले, ‘‘केसरकरांच्या नैराश्येचा भुर्दंड तालुकावासीयांना भोगावा लागत आहे. ते कोणत्याही विषयाचा पाठपुरावा करत नाहीत. तवा तापला, की त्यावर भाकरी भाजून घेण्याचे काम मात्र चोखपणे करतात. एकीकडे आमदार रोहित पवार हे एमआयडीसीसाठी अजित पवारांशी भांडताना दिसत आहेत तर दुसरीकडे केसरकरांकडे मंत्रिपद असूनही ते निष्क्रिय आहेत. युवकांना रोजगार नसल्यामुळे बेकारी वाढली. रोजगार उपलब्धतेसाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, आमदारांनी प्रयत्न केलेच पाहिजेत; मात्र, केसरकर हे आमदार म्हणून कर्तव्य पार पाडण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. आडाळी एमआयडीसीवरून सध्या वातावरण तापलेले असून लाँग मार्चला आमचा पाठिंबा राहणार आहे.’’
------------------
चौकट
रोजगार आणण्यात केसरकर अपयशी
केसरकर यांनी रोजगाराच्या दृष्टीने दिलेली एकही घोषणा पूर्ण केलेली नाही. माटणे येथील एमआयडीसी, तिलारी येथील ॲम्युजमेंट पार्क, पर्यटनातून विकास करण्याच्या घोषणा, आंतरराष्ट्रीय दर्जाचे आयटी पार्क तसेच इतरही त्यांच्या अनेक घोषणा हवेतच विरल्या. ते आमदार झाल्यापासून तीनही टर्ममध्ये सत्तेत होते; मात्र, येथील जनतेसाठी रोजगार आणण्यात ते अपयशी ठरले. शेजारी गोवा राज्य नसते तर येथील तरुणांना रोजगार व जनतेला आरोग्य सेवा मिळाली नसती व येथील परिस्थिती भयावह झाली असती. येथे रोजगार आणण्यासाठी तुमचे जर कोणी मंत्री ऐकत नसतील तर तसे सांगा, आम्ही त्यांना विनंती करू आणि जर अधिकारी ऐकत नसतील तर त्यांच्या विरोधात आंदोलन करू, असे यावेळी श्री. म्हापसेकर यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.