Konkan News esakal
कोकण

Konkan News : आयुष्यभर लोकांच्या डोक्यावर कौलाचं छत्र धरणारा डाह्याभाई 'बेसहारा' होऊन निघून गेला!

कोकणात गेली अनेक दशके गुजराती (Gujarati) आणि मारवाडी पिढ्या व त्यांचे व्यापारउदीम सुखेनैव सुरू आहेत.

सकाळ डिजिटल टीम

डाह्याभाईला मूलबाळ नव्हते. घरी तो आणि त्याची बायडी सुधाबेन. घरात १५/२० मांजरांचा पोरवडा कायम असायचा.

-राजा बर्वे, चिपळूण

कोकणातील (Konkan) सुदूर आणि दुर्गम खेडेगावातदेखील गेली अनेक दशके गुजराती (Gujarati) आणि मारवाडी पिढ्या व त्यांचे व्यापारउदीम सुखेनैव सुरू आहेत. अगदी अलीकडे पाच-दहा वर्षांत मात्र खेड्यातील माणूससुद्धा मॉल संस्कृतीकडे आकर्षित झाल्यापासून तिथला व्यापार कमी होऊ लागला. किराणा, स्टेशनरी, कपडा, इमारती साहित्य, कौले असे अनेक व्यापार ही मंडळी करत आली आणि त्यांना इथल्या माणसांनीदेखील आपलेसे केले आहे. डाह्याभाईदेखील इथलाच.. कोकणात त्याच्या तीन पिढ्या गेलेल्या...!

डाह्याभाईचा कौलाचा व्यापार...कौले, नळे, कोने त्या जोडीला पत्रे आणि हार्डवेअर सामानाचे त्याचे दुकान.. मी बँकेत असल्यामुळे डाह्याभाईची बँकेत ओळख झालेली.. खरंतर, डाह्याभाईने पासष्ठी ओलांडलेली; पण कोकणातल्या रिवाजाप्रमाणे सगळेच अरेतुरे करत आणि त्यात कोणालाच वावगे वाटत नसे. मी अनेकवेळा त्याच्या दुकानात जात असे. आगे दुकान पिछे मकान, असे त्याचे मोठे घर. समोर मोठी जागा ती कौलांची वखार. दुकानात समोरच नाकोडा भेरोजीचा मोठा फोटो, त्या खाली बरोबर गादी, समोर डेस्क, गल्ला, समोर दोन गाद्या; मात्र त्यावरची बेडशीट अस्वच्छ. डाह्याभाई पक्का गुजराती, कमालीचा गोड बोलायचा..

कपाळाला उभे दुबोटी गंध, काच्याचे धोतर, अंगात कबजा, कायम एक हात कबजाच्या पोटखिशात, त्यात भरपूर पैसे, तुरुतुरु चाल, सतत घाईत असायचा. त्या काळी बंदरामार्फत गलबतातून माल यायचा. हुंडी सोडवायला डाह्याभाई बँकेत (Bank) येत असे. गलबत निघाले आणि आले की माल पाठवल्याची तार पोस्टात येत असे. माल मिळाला की, डाह्याभाई केरळच्या व्यापाऱ्याला तार करत असे. डाह्याभाईला इंग्रजीचा गंध नव्हता. तो माझ्याकडून तार लिहून घेत असे. तिथून पोस्टात न जाता अगोदर हायस्कूलच्या एक-दोन शिक्षकांना मी काय लिहिलंय ते विचारी आणि मगच तार करत असे. मला कळल्यावर एकदा मी विचारले, ‘डाह्याभाई, माझ्यावर विश्वास नसेल तर माझ्याकडून का लिहून घेता तार?’ यावर तो गोड हसून म्हणत असे, ‘साबजी, भरोसा हे पर कंधी कंधी चुकभूल होते रे, तू इतका बेकार का वाटून घेते?’.

डाह्याभाईला मूलबाळ नव्हते. घरी तो आणि त्याची बायडी सुधाबेन. घरात १५/२० मांजरांचा पोरवडा कायम असायचा. सुधाबेन त्यांना कायम कवटाळून बसलेली दिसायची.. एकदा डाह्याभाईच्या मालाचे गलबत केरळहून निघाले आणि मलबारच्या पुढे वादळात सापडल्याची तार आली. डाह्याभाई माझ्याकडे धावत आला. ‘हे तारेमंदी काय लिवले रे साबजी?’ मी सांगितल्यावर मटकन खालीच बसला आणि दीनवाण्या चेहऱ्याने, भेरोजी, भेरोजी असे पुटपुटत तिथेच कितीतरी वेळ बसला. नशिबाने गलबत आणि माल सुखरूप आला. डाह्याभाईने उष्ट्या हातानेसुद्धा कधी कावळा उडवला नाही. जामनगरला गावी गेला तर मला मात्र भावनगरी, मिठाई आणत असे.

कदाचित बँकेची कामे आणि तारलेखन हे त्याचे कारण असावे. त्याची नजर चांगली नाही, हमखास दृष्ट पडते, अशी गावात वदंता होती. लहान मुलांना डाह्याभाई दिसला की आया पदराखाली लपवत. केळीचे लोंगर झाकून ठेवत. एक दिवस सुधाबेनला अचानक अर्धांगाचा झटका आला आणि डाह्याभाई जामनगरला गावी निघून गेला. पुढे काही दिवस वसुली आणि मालाची निरवानीरव करायला येत असे; पण मग मात्र जो गेला तो गेलाच. पुढे तो गेल्याचीही बातमी आली. कोकणात राहून व्यापारी पिंड जपत डाह्याभाईचे आयुष्य असेच संपून गेले. आयुष्यभर लोकांच्या डोक्यावर कौलाचे छत्र धरणारा डाह्याभाई मात्र असा बेसहारा होऊन निघून गेला.

(लेखक कोकणवर मनस्वी प्रेम करणारा व कोकण टिपणारा आहे.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Milk Politics : गोकुळ दूध संघाकडून शौमिका महाडिकांचे आरोप खोडून काढले, प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली माहिती

कोण आहे राकेश किशोर? वय ७२, म्हणे,'पश्चाताप नाही, मी तुरुंगात जाणं चांगलं'

Latest Marathi News Live Update : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची लवकरच होणार घोषणा, प्रशासकीय पातळीवर तयारी सुरु

Nagpur Cough Syrup Death : विषारी कफ सिरपमुळे नागपुरात १८ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, देशभरात मृतांचा आकडा १५ वर, प्रशासन अ‍ॅक्शनमोडवर...

ChatGPT Misuse : मित्राची वर्गातच हत्या कशी करायची? 'चॅटजीपीटी'ला विचारला प्रश्न, विद्यार्थ्याला खावी लागली तुरुंगाची हवा

SCROLL FOR NEXT