Devi Bharadi Yatra
Devi Bharadi Yatra esakal
कोकण

Bharadi Devi : देवी भराडीच्या चरणी लाखो भाविक नतमस्तक; आंगणेवाडीच्या यात्रेत मुख्यमंत्र्यांसह दिग्गजांचे साकडे

प्रशांत हिंदळेकर

कोकणचे प्रतिपंढरपूर म्हणून ख्याती पावलेल्या आंगणेवाडीतील आई भराडीच्या यात्रेसाठी महिनाभर आंगणे कुटुंबीय, ग्रामस्थ मंडळ, प्रशासनाने जय्यत तयारी केली होती.

आंगणेवाडी : राज्याच्या कानाकोपऱ्‍यातून आलेले लाखो भाविक आई भराडीच्या (Devi Bharadi Yatra) चरणी नतमस्तक झाले. ‘आई भराडी नमो नमः’ च्या जयघोषात संपूर्ण आंगणेवाडीनगरी दुमदुमून गेली. देवीच्या दर्शनाने भाविक कृतार्थ झाले. असंख्य भाविकांमुळे संपूर्ण आंगणेवाडी परिसर भक्तीत न्हाऊन निघाला आहे.

मध्यरात्री तीनपासून आई भराडीच्या दर्शनाचा, ओटी भरण्याच्या कार्यक्रमास सुरुवात झाली. दिवसभरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar), शिक्षणमंत्री दीपक केसरकर, केंद्रीयमंत्री नारायण राणे, नीलम राणे, माजी खासदार नीलेश राणे, उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार रवींद्र फाटक, मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार, आमदार वैभव नाईक, खासदार विनायक राऊत, आमदार अनिल परब, खासदार मनोज कोटक, आमदार कालिदास कोळंबकर, शिवसेना नेते किरण सामंत, माजी आमदार शिवराम दळवी, परशुराम उपरकर, मनसेचे अविनाश जाधव, अमित इब्रामपूरकर यांसह अन्य राजकीय नेत्यांनी देवीचे दर्शन घेत आशीर्वाद घेतले.

रात्री उशिरा भाविकांचा जनसागर आंगणेवाडीत लोटल्याने परिसर बहरून गेला होता. कोकणचे प्रतिपंढरपूर म्हणून ख्याती पावलेल्या आंगणेवाडीतील आई भराडीच्या यात्रेसाठी महिनाभर आंगणे कुटुंबीय, ग्रामस्थ मंडळ, प्रशासनाने जय्यत तयारी केली होती. मध्यरात्रीपासूनच भाविक रेल्वे, एसटी व खासगी वाहनांमधून शहरात, गावागावांत दाखल होत होते. मध्यरात्रीपासून देवीच्या दर्शनासाठी रांगा लागल्या. आंगणे कुटुंबीयांनी चांगली सुविधा केल्याने भाविकांना अल्पकाळातच देवीचे दर्शन घेता येत होते. भराडी देवीस भरजरी साडी व सुवर्णालंकारानी सजविण्यात आले होते. मंदिराचा गाभारा आकर्षक फुलांनी सजविला होता. मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. यंदा मालवण व कणकवलीच्या बाजूने नऊ रांगांची सुविधा होती.

महत्त्वाच्या व्यक्तींसाठी स्वतंत्र रांग होती. दिव्यांगांसाठी मालवण व कणकवली बसस्थानक ते मंदिरापर्यंत मोफत रिक्षा सुविधा होती. पहाटे अनेक भाविकांनी देवीचे दर्शन घेतले. मुखदर्शनाची स्वतंत्र व्यवस्था होती. सकाळच्या सत्रातही भाविकांची गर्दी होती. मंदिरात नवस बोलणे, फेडणे, तसेच तुलाभार करण्यासाठी भाविकांची झुंबड उडाली होती. परिसरात उद्धव ठाकरे शिवसेना, भाजप, शिंदे शिवसेना आदी पक्षांची कार्यालये, शासकीय योजनांच्या माहितीचे कक्ष, बचतगट प्रदर्शन, विक्री केंद्र, पोलिस नियंत्रण कक्ष उभारले होते. मालवण व कणकवलीच्या दिशेने जिल्ह्यातील हॉटेल व्यावसायिक, मिठाई, अन्य गृहोपयोगी साहित्यांची, आकाश पाळणे, लहान मुलांना आकर्षून घेणारे विविध खेळ उभारले होते. जिल्हा बँकेसह विविध राजकीय पक्षांच्या स्वागत कमानी, बॅनर्स लावले होते. दुपारनंतर भाविकांची गर्दी वाढण्यास सुरुवात झाली.

आंगणेवाडीत खासगी वाहनांसाठी तीन किलोमीटरवर वाहनतळाची सुविधा होती. आंगणेवाडीकडे जाणाऱ्‍या मुख्य मार्गावर वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी वाहतूक पोलिसांची पथके कार्यरत होती. साध्या वेशातील पोलिसांची गस्तही होती. यात्रेसाठी मुंबईकर चाकरमानी आजही सकाळच्या सत्रात शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात दाखल होत होते. यात्रेच्या निमित्ताने आरोग्य, महसूल यंत्रणा, पोलिसांसह अन्य शासनाच्या विभागांचे कक्ष उभारले होते. जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलिस बंदोबस्त होता. गावागावांमध्ये विविध राजकीय पक्षांच्या स्वागत कमानी, बॅनर्स लावले आहेत. लोकसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून राजकीय पक्षांनी यात्रेच्या निमित्ताने जोरदार वातावरण निर्मितीवर भर दिला आहे.

कष्टकरी-बळीराजाला चांगले दिवस येऊ दे, मुख्यमंत्र्यांचे देवीला साकडे

कष्टकरी व बळीराजाला चांगले दिवस येऊ दे, असे साकडे घालतानाच देवीच्या आशीर्वादाने एक सेवक म्हणून राज्याचे काम करण्याची संधी मिळाली आहे. लाखो भाविक भराडी देवीच्या यात्रेला येतात. आंगणे कुटुंबीय भाविकांना सेवा-सुविधा देऊन मोठे काम करत आहेत. शासनाच्या माध्यमातून याठिकाणी सुविधा देण्यासाठी काही कमी पडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे दिली.

श्री भराडी देवी वार्षिकोत्सवात श्री. शिंदे यांनी सकाळी दर्शन घेत आशीर्वाद घेतले. यावेळी आंगणे कुटुंबीयांच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी शिंदे म्हणाले, ‘‘आंगणेवाडीचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्‍यांना नव्याने सूचना दिल्या आहेत. भक्त निवाससुद्धा लवकरच मार्गी लागेल. देवीचे सत्त्व भक्तांना येथपर्यंत घेऊन येते. तसाच मीसुद्धा आलो आहे. मुख्यमंत्री पद मिळण्यामागे आई भराडीचे आशीर्वाद आहेत. आंगणेवाडीसाठी आवश्यक सुविधा सूचवा, सरकार म्हणून कुठे कमी पडणार नाही.”

यावेळी प्रांत ऐश्वर्या काळुशे, तहसीलदार वर्षा झालटे, अध्यक्ष भास्कर आंगणे, आनंद आंगणे, बाळा आंगणे, बाबू आंगणे, मधुकर आंगणे, जिल्हाप्रमुख संजय आंग्रे, कुडाळ मालवण विधानसभाप्रमुख बबन शिंदे, उपजिल्हाप्रमुख विश्वास गावकर, तालुकाप्रमुख राजा गावकर, महेश राणे यांच्यासह शिवसेनेचे अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सर्व सामान्यांसाठी सरकार काम करत आहे. कोकणच्या विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यात येईल. सिंचनासाठी बारमाही पाण्याची व्यवस्था झाल्यास वाहून जाणारे पाणी शेतीस उपयोगी होणार आहे. सिंधुदुर्ग ते मुंबई एक्स्प्रेस रस्ता होत आहे. कोकण विकास क्षेत्र प्राधिकरणाच्या माध्यमातून अनेक सुविधा देण्यात येणार आहेत.

-एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ebrahim Raisi Death: इराणच्या राष्ट्राध्यक्षांच्या हेलिकॉप्टर अपघातामागे षडयंत्र आहे का, नेमकं काय घडलं? इस्रायलच्या भूमिकेबाबत मोठा दावा!

Rohit Sharma : क्रिकेटपटूंची गोपनीयता जपा! ; मुंबई इंडियन्सचा खेळाडू रोहित शर्मा आयपीएल ब्रॉडकास्टरवर भडकला

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील १३ मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.३३ टक्के मतदान

Kalyan News: देशाच्या विकासासाठी मतदार महायुतीच्याच बाजूने, विश्वनाथ भोईरांचे वक्तव्य

Akshay Kumar : अक्षयचा दिलदारपणा; जॉली एलएलबीचं शूटिंग पूर्ण होताच केली 500 मुलींना मदत

SCROLL FOR NEXT