गणपतीपुळ्यात
भाद्रपदी गणेशोत्सव
रत्नागिरी ः तालुक्यातील श्रीक्षेत्र गणपतीपुळे देवस्थानतर्फे ४ ते ८ सप्टेंबरला भाद्रपदी गणेशोत्सवानिमित्त श्रींच्या मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाला गणेशभक्तांनी उपस्थिती राहावे, असे आवाहन श्रीदेव गणपतीपुळे संस्थानतर्फे करण्यात आले आहे. बुधवारी (ता. ४) सकाळी साडेनऊ ते साडेअकरा या वेळी श्रींची महापूजा व प्रसाद, दररोज सायंकाळी सात ते साडेसात या वेळेत आरती व मंत्रपुष्प, दररोज सायंकाळी साडेसात ते साडेनऊ या वेळेत सुप्रसिद्ध कीर्तनकार रोहिणी माने-परांजपे यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे. गुरूवारी (ता. ५) दुपारी ११ ते १२ या वेळेत श्रींना सहस्र मोदक समर्पण, शनिवारी (ता. ७) दुपारी चार ते सहा या वेळेत श्रींची पालखी मिरवणूक प्रदक्षिणा, सायंकाळी कीर्तन, ८ ला सायंकाळी सामुदायिक आरती व मंत्रपुष्प, कीर्तन, १५ ला वामन जयंतीच्या दिवशी दुपारी साडेअकरा ते दोन या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवाला गणेशभक्तांनी उपस्थित राहावे, असे आवाहन विद्यमान पंचकमिटी सरपंच डॉ. श्रीराम केळकर, खजिनदार अमित मेहेंदळे, सचिव विद्याधर शेंड्ये, पंच डॉ. विवेक भडे, प्रा. विनायक राऊत, नीलेश कोल्हटकर, वेदमुर्ती श्रीहरी रानडे यांनी केले आहे.
---------
‘जीजीपीएस’मध्ये
दहीहंडी उत्सव साजरा
रत्नागिरी ः येथील जीजीपीएस इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक विभागातील बालगोपाळांनी जल्लोषात दहीहंडी उत्सव साजरा केला. या वेळी प्राथमिक विभाग मुख्याध्यपिका अपूर्वा मुरकर, फौझिया नाखवा आणि शिल्पा प्रभू यांनी श्रीकृष्णाची पूजा करून उत्सवाची सुरवात केली. त्यानंतर बालगोपाळांसमेवत कृष्णाची पालखी मिरवणूक, दर्शनसोहळा, दुसरीच्या मुलांचे सुंदर असे ''गोविंदा रे.... '' नृत्य आणि राधाकृष्ण वेषातील मुलांचे रॅम्पवॉक झाले. गोविंदा रे गोपाळाच्या गजरात मुलांनी व मुलींनी आपली स्वतंत्र दहीहंडी फोडली. या वेळी मुलांनी फुगड्या आणि गाण्याच्या तालावर नृत्य करत गोपाळकाल्याचा आनंद घेतला. प्रसाद वाटपानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. या संपूर्ण कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
------
जिल्हास्तरीय लोकशाही दिन
रत्नागिरी : जिल्हास्तरावर दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय लोकशाही दिन साजरा होतो. २ सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी एक ते दोन या वेळेत जिल्हास्तरीय लोकशाही दिन साजरा करण्यात येणार आहे. या लोकशाही दिनाकरिता नागरिकांनी प्रथम तालुका लोकशाही दिनात अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. तालुका लोकशाही दिनातील उत्तराने समाधान न झाल्यास जिल्हास्तरीय लोकशाही दिनात अर्जदार अर्ज सादर करावेत, असे प्रभारी उपजिल्हाधिकारी सहाय्यक प्रभारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी कळवले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.