07479
दोषींवर कारवाई करा; अन्यथा आंदोलन
शिवप्रेमींची मागणी ः राजकोट दुर्घटनेप्रकरणी दोडामार्गात प्रशासनास इशारा
सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. २७ : मालवण राजकोट येथे शिवरायांचा पुतळा कोसळण्याचा घडलेला प्रकार दुर्दैवी आहे. या घटनेबाबत मराठा समाजाच्यावतीने नायब तहसीलदार यांची भेट घेऊन तीव्र निषेध व्यक्त केला. याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करावी; अन्यथा शिवप्रेमींतर्फे जनआंदोलन उभारू, असा इशारा मराठा महासंघ, शिवजयंती उत्सव समिती व शिवप्रेमींनी दिला. या मागणीचे निवेदन दोडामार्ग तहसीलदारांना देण्यात आले.
मालवण राजकोट येथे आठ महिन्यांपूर्वी नौदलाने शिवरायांचा भव्य पुतळा उभारला होता. या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले; मात्र आठ महिन्यांतच हा पुतळा कोसळण्याची घटना घडली. या घटनेचे तीव्र पडसाद दोडामार्ग तालुक्यातही उमटले. तालुक्यातील शिवप्रेमी आज सकाळी एकवटले. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘जय भवानी जय शिवाजी’, अशा घोषणा देत तहसीलदारांना निवेदन दिले. तहसीलदार उपस्थित नसल्याने महसूल नायब तहसीलदारांची भेट घेत घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करण्यात आला. दोषींवर कठोर कारवाई करण्याबाबतचे निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे, ‘‘छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा घाईगडबडीत उभारला होता. अवघ्या आठ महिन्यांत हा पुतळा भ्रष्ट यंत्रणेमुळे खाली कोसळला, ही बाब दुर्दैवी आहे. यामुळे अखंड हिंदुस्थानातील शिवप्रेमींच्या अस्मितेला धक्का पोहोचला आहे. हा पुतळा उभारताना यंत्रणा, अधिकारी व तत्कालीन शासन यांनी सखोल अभ्यास न करता घाईगडबडीत पुतळ्याचे निकृष्ट दर्जाचे काम केल्यामुळेच ही घटना घडली. या घटनेची तत्काळ चौकशी करून संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्यावर गुन्हा दाखल करावा. संबंधित ठेकेदारांना काळ्या यादीत टाकावे; अन्यथा तालुक्यातील शिवप्रेमींकडून आंदोलन करण्यात येईल, असे नमूद केले आहे. यावेळी मराठा महासंघाचे दोडामार्ग तालुकाध्यक्ष ॲड. सोनू गवस, सचिव उदय पास्ते, वैभव इनामदार, दिवाकर गवस, उल्हास नाईक, विलास आईर व शिवप्रेमी उपस्थित होते.
..............
शिवरायांच्या नावावर मतांचे राजकारण नको
छत्रपती शिवरायांचा पुतळा ४० किलोमीटर प्रतितास वेगाने आलेल्या वाऱ्यामुळे कोसळला, असे विधान करणे चुकीचे आहे. महाराजांनी परकियांच्या आक्रमणांची अनेक वादळे आपल्या निधड्या छातीवर झेलून त्यांचा चुराडा केला. समुद्राच्या खाऱ्या वाऱ्यामुळे पुतळा कोसळल्याचे विधानही दिशाभूल करणारे आहे. त्यामुळे पुतळ्याची जबाबदारी शिवभक्तांवर सोपवा. आम्ही असा पुतळा उभारू, जो आठ महिनेच काय, ८०० वर्षांहून अधिक काळ टिकेल; मात्र कोणत्याही राजकारण्याने यापुढे शिवरायांच्या नावावर मते मागू नये, असा इशारा ॲड. सोनू गवस यांनी दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.