विद्यार्थ्यांसाठी दीनदयाळ शिष्यवृत्ती योजना
एन. टी. कुरळपकर ः गतवर्षी ३१ विद्यार्थ्यांचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३० : शालेय विद्यार्थ्यांना पोस्टाच्या तिकीट संग्रहामध्ये रुची निर्माण व्हावी, यासाठी भारतीय टपाल विभागातर्फे ‘दीनदयाळ स्पर्श योजना’ २०१७-१८ पासून सुरू करण्यात आली आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षामध्ये जिल्ह्यातील ३१ विद्यार्थ्यांनी यात भाग घेतला होता. त्यामधील श्रीमान गंगाधर गोविंद पटवर्धन इंग्लिश मीडियम शाळेच्या एका विद्यार्थ्याची महाराष्ट्र सर्कल स्तरावर निवड होऊन शिष्यवृत्ती प्राप्त झाली. चालू आर्थिक वर्षामध्ये दीनदयाळ शिष्यवृत्ती योजना परीक्षेमध्ये अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन डाकघर अधीक्षक एन. टी. कुरळपकर यांनी केले आहे.
‘फिलाटेली’ हा छंद जोपासणाऱ्यांसाठी, याशिवाय, विद्यार्थ्यांच्या अभ्यासाला चालना देण्यासाठी अखिल भारतीय स्तरावर शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. ही योजना सहावी ते नववीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे. शिष्यवृत्तीची रक्कम ५०० रुपये प्रतिमाह दराने मिळेल. विद्यार्थी मान्यताप्राप्त शाळेत शिकणारा असावा. वार्षिक परीक्षेत कमीत कमी ६० टक्के गुण (अनुसूचित जाती-जमातीमधील विद्यार्थ्यांना ५५ टक्के) असणे किंवा समतुल्य श्रेणी किंवा ग्रेड पॉइंट असणे बंधनकारक आहे. शाळेचा ‘फिलाटेली क्लब’ असावा आणि संबंधित विद्यार्थी त्याचा सदस्य असणे आवश्यक आहे. शाळेचा क्लब नसेल तर त्या संबंधित विद्यार्थ्याचे स्वतंत्र ‘फिलाटेली अकाउंट’ असणे आवश्यक आहे.
प्रकल्पाचा विषय सर्कल ऑफिसद्वारा देण्यात येणार असून, टपाल खात्याचे प्रतिनिधी आणि प्रसिद्ध ‘फिलाटेलिस्ट’ यांचा समावेश असलेली एक समिती सर्कल पातळीवर स्थापन केली जाईल. त्यांच्यामार्फत विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रकल्पाचे मूल्यमापन केले जाईल. फिलाटेली प्रकल्प कार्यावरील मूल्यांकन किंवा सर्कल ऑफिसकडून आयोजित प्रश्नमंजूषा स्पर्धेतील कामगिरीवर विद्यार्थ्याची निवड केली जाईल. सर्कल ऑफिसद्वारा शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्याची निवड केली जाईल. इच्छुक विद्यार्थ्यांनी अर्जाकरिता जवळील पोस्ट ऑफिसमध्ये संपर्क करावा व आपले अर्ज नजीकच्या पोस्ट ऑफिसमध्ये ३१ ऑगस्टपर्यंत जमा करावेत, असे आवाहन केले आहे.
---------
---------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.