कल्याण : टिटवाळ्यात गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत पुढे जाण्यावरून झालेल्या वादाचे रूपांतर धक्काबुक्की, मारहाण आणि गोंधळात झाले. या घटनेत भाजप आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याची माहिती आहे. मिरवणुकीत पुढे जाण्यावरून भाजपच्या माजी उपमहापौर तथा विद्यमान नगरसेविका उपेक्षा भोईर, त्यांचे पती शक्तिवान भोईर, तसेच ठाकरे गटाचे माजी नगरसेवक सुरेश भोईर आणि पदाधिकारी प्रदीप भोईर यांच्यात वाद झाला. वाद वाढल्यानंतर दोन्ही गटांमध्ये धक्काबुक्की आणि मारहाण झाल्याचे समोर आले. त्यामुळे गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या प्रकरणी कल्याण तालुका पोलिसांनी चौघांसह दोन्ही गटातील सुमारे ७० ते ८० जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.