rat30p3.jpg
N08047
चिपळूण : बहादूरशेख नाका येथे रखडलेले उड्डाणपुलाचे काम.
---------------
उड्डाणपुल निकृष्ट कामाची जबाबदारी कुणाची ?
साडेतीनशे कोटींचे डिझाईन चुकले, गुन्हा दाखल करण्याकडे दुर्लक्ष
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ३० : शहरातून जाणाऱ्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या उड्डाणपुलाचा भाग कोसळला. उड्डाणपुलाचे साडेतीनशे कोटीचे डिझाईन चुकले. कामाच्या ठिकाणी अपघात होऊन कामगार जखमी झाले. कामाच्या दर्जाबाबत बोंब असताना महामार्ग कंपनीच्या ढिसाळ कारभाराबाबत अद्याप जबाबदारी निश्चित नाही. माणगावमधील मुख्यमंत्र्यांच्या पाहणीनंतर तेथील ठेकेदारावर गुन्हा दाखल झाला. चिपळूणमधील बेजबाबदार कामाबाबत गुन्हा दाखल करण्याचे आदेश कोण देणार ? येथील निकृष्ट कामाची अजून जबाबदारी निश्चित झालेली नाही.
मुंबई - गोवा महामार्गाचा पाहणी दौरा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः मैदानात उतरले. महामार्गावर जागोजागी पडलेले खड्डे आणि ते बुजवताना येणाऱ्या अडचणी त्यांनी समजून घेत त्यांनी काही दिवसांपूर्वी मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केली. काहीही करून गणेशोत्सवापूर्वी हा रस्ता नीट करून वाहतुकीसाठी सुरळीत करावा, असे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले. त्यानंतर मुंबई - गोवा महामार्गाच्या ठेकेदार कंपनीवर माणगाव पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.
चेतक एंटरप्रायझेस लिमिटेड कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक हुकुमीचंद जैन, जनरल मॅनेजर अवधेश कुमार सिंह आणि प्रकल्प समन्वयक अभियंता सुजित कांबळे यांना आरोपी केले आहे. माणगाव पोलिसात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी समन्वयक अभियंता सुजित कांबळे यांना पोलिसांनी अटक केली आहे. चिपळूण परिसरात महामार्गाच्या कामाचा पूर्णपणे फज्जा उडाला आहे.
लोटे-परशुराम घाटात केलेले काम खचले आहे. शहरातून जाणाऱ्या उड्डाणपुलाचे काम तब्बल साडेतीनशे कोटीचे आहे. उड्डाणपुलाचे पिलर उभे आहेत. त्यावर गर्डर बसवण्याचे काम सुरू असताना त्यातील एक गर्डर कोसळला. पुलाचे डिझाईन चुकल्यामुळे हा अपघात झाल्याचा ठपका महामार्ग विभागाकडून ठेवण्यात आला. त्यानंतर झालेले काम तोडून नव्याने डिझाईन तयार करण्याचे काम सुरू झाले. पिलरवरील बांधकाम तोडत असताना अपघात होऊन कामगार जखमी झाले. पालवणफाटा, असुर्डेसह अनेक भागात रस्ता खचला आहे. निकृष्ट काम आणि वारंवार अपघात होत असताना या कामाची जबाबदारी अद्याप कोणावर निश्चित झालेली नाही.
कोट
चिपळूण परिसरात सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामात काही ठिकाणी चुका झाल्या आहेत. त्या दुरुस्त करण्याचे काम सुरू आहे; मात्र ठेकेदार कंपनीवर गुन्हा दाखल करण्याबाबत अद्याप आदेश आलेले नाहीत.
- राजेंद्र कुलकर्णी, उपअभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग, चिपळूण
कोट
महामार्गाचे काम चालू असताना अनेक चुका झाल्या आहेत. साडेतीनशे कोटीच्या कामाचे डिझाईन दिल्लीतून तयार झाले की, गल्लीतून तयार झाले. अधिकारी बेफिकीर आहेत. त्यामुळे ठेकेदार मस्तावले आहेत. त्यांच्यावर वचक ठेवण्यासाठी गुन्हा दाखल करणे गरजेचे आहे.
- शौकत मुकादम, माजी उपसभापती, चिपळूण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.