08190
सत्ता येताच राडेबाजांना जेलमध्ये पाठवू
संजय राऊत ः कोळंब येथील मेळाव्यात इशारा
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ३० ः शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्या भाजपच्या गुंडांना दोन महिन्यांनी त्याची किंमत चुकवावीच लागेल. दोन महिन्यांनी महाविकास आघाडीची सत्ता राज्यात येणार असून राडेबाजांना जेलमध्ये पाठवू. लोकसभेवेळी झालेला दुर्दैवी पराभव बाजूला ठेवून शिवसैनिकांनी कोकणावर भगवा झेंडा पुन्हा डौलाने फडकविण्यासाठी सज्ज होण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन ठाकरे शिवसेना नेते संजय राऊत यांनी कोळंब येथील सभेत केले.
शिवछत्रपतींचा पुतळा कोसळल्यानंतर शिवसैनिक पेटून उठणार नाही तर काय करणार? असा प्रश्न उपस्थित करत शिवसेना नेते संजय राऊत यांनी आमदार वैभव नाईक यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाची केलेली तोडफोड योग्यच असल्याचे सांगत देशातील ती पहिली उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती, असे सांगत नाईक यांचे अभिनंदन केले. राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचेही विसर्जन होण्याची वेळ जवळ आली आहे, असाही टोलाही राऊत यांनी यावेळी लगावला.
शिवसेना मालवण तालुका कार्यकारिणीची सभा कोळंब येथील समर्थ मंगल कार्यालय याठिकाणी आयोजित केली होती. व्यासपिठावर शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर, आमदार वैभव नाईक, संजय पडते, अतुल रावराणे, माजी जिल्हा प्रमुख भाई गोवेकर, जान्हवी सावंत, मंदार केणी, हरी खोबरेकर, बाळा गावडे, नितीन वाळके, महेश जावकर, दिपा शिंदे, पूनम चव्हाण, शिल्पा खोत आदी उपस्थित होते. नितीन वाळके यांनी प्रास्ताविक केले. शिवछत्रपती महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सभेला सुरूवात करण्यात आली.
पुतळा कोसळल्यानंतर बालिश वक्तव्ये करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आता कितीही वेळा माफी मागितली तरी त्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही. त्यांनी आधी पुतळा कोसळल्याची जबाबदारी कोण घेणार? हे जाहीर करावे. ज्याला अनुभव नाही, ज्याने पाच फुटापेक्षा मोठा पुतळा कधी उभारला नाही, त्याला अशा पुतळ्याचा ठेका देण्यासाठी कोणी प्रयत्न केला, याची माहिती जनतेसमोर यायला हवी. महाराष्ट्राच्या जनतेला तुम्ही फसवू शकत नाही. या जनतेला आता उत्तर देण्याची वेळ आली आहे. वाऱ्यामुळे पुतळा कोसळला म्हणता, मग आता कशाला माफी मागता?, कितीही वेळा नाक घासलात तरीही तुम्हाला जबाबदारी घ्यावीच लागेल, असेही श्री. राऊत यांनी सांगत मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीका केली.
ते पुढे म्हणाले, ‘‘लोकसभा निवडणुकीपुर्वी शिवपुतळा उभारणे, हॅलिपॅड उभारणे अशी मोठी कामे करून कोट्यवधींचा गैरव्यवहार करण्यात आला. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मोठ्या प्रमाणात पैसा गोळा करत लोकसभा निवडणुकीत याच पैशांतून मतदारांना पैसे दिले. यामुळे पालकमंत्र्यांच्या विरोधात बोलण्याची ताकद शासनाकर्त्यांमध्ये नाही. चव्हाण यांच्या जीवावर आणि त्यांच्या पैशांवर राजकारण केले जात आहे. यामुळेच मालवणात आम्हाला रोखण्याचा प्रकार केला होता का? पोलिसांसमोर धमक्या दिल्या जात असताना पोलिसांना बघ्याची भूमीका घ्यायला सांगणारे गृहमंत्री राज्यात आहेत की दिल्लीत? हा प्रश्न आहे.’’
ते म्हणाले, ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रात बाळासाहेबांची शिवसेना फोडून मोठी चूक केली आहे. त्याची किंमत लोकसभेत चुकवावी लागली आहे आणि आता विधानसभेतही भाजप भुईसपाट झाल्यानंतर कळून चुकेल. मोदींनी आपल्या खोट्या प्रतिष्ठेपाई जे जे उभे केले ते ते आज दुर्दैवाच्या फेऱ्यात अडकले आहे. संसद भवन, राम मंदिर, शिवपुतळा या घटनांतून त्यांनी हात लावला त्याठिकाणी केवळ पाणी पाणी आणि मातीच झाली आहे. राम मंदिरात तर चक्क पुजाऱ्याला छत्री घेऊन उभे रहावे लागते यासारखे दुसरे दुर्दैव नाही.’’
मुख्यमंत्री शिंदे सध्या पंतप्रधान मोदी यांचे राईट हॅन्डप्रमाणे वागत आहेत. छत्रपतींचा पुतळा कोसळल्यानंतर आधी शिंदेंना बरखास्त करणे आवश्यक होते. त्यांच्या प्रतिक्रिया म्हणजे त्यांच्या डोक्यातील स्कू गंजलेला असल्याप्रमाणे आहेत. पुतळा कोसळल्यानंतर मालवणमध्ये केलेल्या राड्यातून भाजपचे रंगलेले मुखवटे गळून पडले आहेत. आज पोलिस तुम्हाला सलाम करत आहेत आणि आमच्या कॉलर पकडत आहेत. दोन महिन्यांनी हे चित्र बदलणार आहे, असाही इशारा श्री. राऊत यांनी यावेळी दिला.
आमदार नाईक म्हणाले, ‘‘शिवसैनिकांची ताकद भाजपच्या गुंडाना दाखवून दिली आहे. आम्ही रस्त्यावर फिरणारे कार्यकर्ते आहोत. आमच्या अंगावर आलात तर आम्ही आमची ताकद दाखवू. राजकोट दुर्घटना घडल्यानंतर काही क्षणांत मी पोहचलो. म्हणून माझ्यावर टीका केली जात आहे. पण, मी जिल्ह्यात राहणारा आहे. मालवणमध्ये सभेत असल्याने तत्काळ घटनास्थळी पोहचलो. शिवरायांना मी घटनास्थळी पोहचावे, अशी इच्छा असल्याने त्यासाठी मी दाखल झालो. शिवसैनिक आता सज्ज झाला आहे. लढण्यासाठी आम्ही सदैव तयार आहोत.’’ यावेळी नितीन वाळके, पूनम चव्हाण, हरी खोबरेकर, संदेश पारकर, सतीश सावंत यांनीही आपले विचार मांडले. मंदार केणी यांनी आभार मानले.
------------------------
चौकट
‘बांधकाम’तर्फे जिल्ह्यात भ्रष्टाचार
शिवपुतळा उभारणीच्या पहिल्या कामापासून याठिकाणी भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आम्ही करत असताना त्याकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने आज ही परिस्थिती निर्माण झाली आहे. आम्ही सरकारला शांत बसू देणार नाही. त्यांनी यातील दोषींवर कारवाई केलीच पाहिजे. आज सिंधुदुर्गात मोठ्या प्रमाणात बांधकाम विभागाच्यामार्फत भ्रष्टाचार केला जात आहे. त्यातून मतदारांना पैसे वाटण्यात येत आहेत. आम्ही हा प्रकार खपवून घेणार नाही, असे आमदार नाईक यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.