11828
‘शतसंवादिनी’द्वारे गोविंदराव पटवर्धनांना आगळी आदरांजली
रत्नागिरीत २१ सप्टेंबरला आयोजन; हार्मोनियम सिंफनी हे मोठे आकर्षण
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १५ : संवादिनीगंधर्व म्हणून ओळख असलेले स्वर्गीय पंडीत गोविंदराव पटवर्धन यांची जन्मशताब्दी रत्नागिरीमध्ये अत्यंत आगळ्या सांगीतिक कार्यक्रमाने साजरी केली जाणार असून रत्नागिरीच्या सांस्कृतिक अवकाशात हा कार्यक्रम मैलाचा दगड ठरावा अशातऱ्हेने त्याची तयारी केली जात आहे. शतसंवादिनी हा गोविंदरावांची सर्वंकष ओळख करून देणारा असा कार्यक्रम २१ सप्टेंबरला सायंकाळी ६.३० वाजता सावरकर नाट्यगृहात आयोजित केला आहे. त्यामध्ये शंभरहून अधिक संवादिनीवादक ''हार्मोनिअम सिंफनी'' सादर करणार आहेत.
रत्नागिरीत अशातऱ्हेचा कार्यक्रम प्रथमच सादर केला जाणार आहे. कार्यक्रमाची संकल्पना प्रसिद्ध संवादिनीवादक, संगीतकार अनंत जोशी यांची आहे. याबाबत माहिती देताना चैतन्य पटवर्धन म्हणाले की, अनेक वेगवेगळ्या वाद्यांच्या एकत्रित सादरीकरणाचा सुंदर सांगीतिक आविष्कार म्हणजे सिंफनी. अशा अनेक वेगवेगळ्या वाद्यांचा परिपोष फक्त आणि फक्त हार्मोनिअमवर सादर करून त्यातून निर्माण होणारी भव्य स्वराकृती म्हणजे ''हार्मोनिअम सिंफनी'' यामध्ये मुख्य वाद्य म्हणून हार्मोनिअम असतेच, पण गिटार, व्हायब्रोफोन, व्हायोलिन अशा अनेक वाद्यांचा स्वरमेळही हार्मोनिअमवरच निर्माण केला जातो.
कार्यक्रमात काही शास्त्रीय रचनांसोबत अभंग, गजर, ठुमरी आदी प्रकार संवादिनीवर सादर केले जाणार आहेत. कार्यक्रमादरम्यान चित्र आणि रांगोळीचे प्रदर्शनही भरविण्यात येणार आहे. सुप्रसिद्ध रांगोळीकार राहुल कळंबटे हे पंडीत गोविंदराव पटवर्धन यांची रांगोळी काढणार असून अनुजा कानिटकर या लाईव्ह चित्र रेखाटणार आहेत.
चौकट
सिंफनीत केरवा, भजनी, झपतालचा आविष्कार
कार्यक्रमात सादर होणाऱ्या सर्व सिंफनी या केरवा, भजनी, झपताल, तीनताल अशा अस्सल भारतीय संगीतातील तालांमध्ये निबद्ध आहेत. एकाच वाद्यातून विविध प्रकारच्या वाद्यांचा अनुभव देणारी जगातील पहिली आणि एकमेव भारतीय कलाकृती म्हणजे हार्मोनिअम सिंफनी. ‘शतायुषी गोविंदराव’ या संकल्पनेमध्ये वर्षभर विविध कार्यक्रम सादर करण्यात येणार आहेत. ‘शतसंवादिनी’ हा त्यातील आरंभाचा कार्यक्रम आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.