खेडमधील ३२ बसफेऱ्या आज रद्द
खेड ः खेड बसस्थानकातून ग्रामीण भागासह लांब पल्ल्याच्या मार्गावर मार्गस्थ होणाऱ्या ३२ फेऱ्या १ ऑक्टोबरला रद्द करण्यात येणार आहेत. रायगड जिल्ह्यातील रोहा येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या महिला सशक्तीकरण कार्यक्रमासाठी जादा बसफेऱ्या सोडण्यात येणार असल्याने बसफेऱ्या बंद ठेवण्यात येणार आहेत. ३० सप्टेंबरला येथील आगारातून सुटणाऱ्या ११ बसेस रद्द करण्यात आल्या. १ ऑक्टोबरला खेड-बिजघर वस्ती, खेड-कात्रण वस्ती, खेड-मंडणगड वस्ती, खेड-भेलसई वस्ती, खेड- कोंडिवली-शिव, खेड-आयनी, खेड-वाडीजैतापूर वस्ती, खेड-कशेडी, खेड- नांदिवली, खेड-महाड वस्ती, खेड-चिपळूण, खेड-तिसंगी, खेड-सुकदर, खेड किल्लेमाची, खेड-शिवतर, खेड-आष्टी, खेड-पोयनार, खेड-पन्हाळजे, खेड-तुळशी आदी बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.
-------------
कायमस्वरूपी लेखापाल
खेड पालिकेत रूजू
खेड ः खेड नगरपालिकेत प्रभारी मुख्याधिकाऱ्यांचा यापूर्वी सुरू असलेला प्रकार महादेव रोडगे यांच्या कायमस्वरूपी नियुक्तीने संपुष्टात आला आहे. हे लेखापाल पद प्रभारी होते. अखेर कायमस्वरूपी लेखापालाची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे आर्थिक बाबतींतील प्रशासकीय कामांना गती मिळणार आहे. चार महिन्यांपूर्वीच येथील पालिकेत सेवा बजावणाऱ्या महादेव रोडगे यांची कायमस्वरूपी मुख्याधिकारीपदी नियुक्ती करण्यात आल्याने प्रभारींचा प्रश्न संपुष्टात आला. अखेर पालिकेने हृदय आग्रे यांची कायमस्वरूपी लेखापाल म्हणून नियुक्ती केली आहे.
--------------
मोराच्या शिकारप्रकरणाचा
वनविभागाकडून तपास
खेड ः तालुक्यातील कशेडी येथे अनोळखी शिकाऱ्याकडून मोराच्या झालेल्या शिकारीनंतर येथील वनविभाग खडबडून जागे झाले आहे. शिकाऱ्याचा शोध घेण्यासाठी वनविभागाने तपास सुरू केला आहे. यासाठी गुप्त पथकामार्फतही करडी नजर ठेवण्यात येणार असल्याचे वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. तालुक्यात मोराची शिकार करणारी एक टोळीच कार्यरत असल्याची बाब समोर आली आहे. कर्टेल-सुकिवली मार्गावर मोराची शिकार होत असल्याचे निदर्शनास येताच ग्रामस्थांनी त्यांना रंगेहाथ पकडण्यासाठी सापळा रचला होता; मात्र याची कुणकुण लागताच शिकाऱ्यांनी पोबारा केला होता. यानंतर शिकाऱ्यांनी दुसऱ्या गावाची निवड केल्याचे पुढे आले आहे. कशेडी येथील एका शेतानजीक वावरणारा मोर गायब झाल्याचे लक्षात येताच काही ग्रामस्थांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला असता, शेतात मोराची पिसें आढळली होती. शिकाऱ्याच्या शोधासाठी वनविभागाच्या पथकाने जंगलमय भागावर करडी नजर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मोराची शिकार करणाऱ्यांना नक्कीच गजाआड करू, असा विश्वासही वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.