15174
ठाकरे गटाचे सिंधुदुर्गनगरीत ‘आत्मक्लेश’
‘बेंच निधी’प्रकरणी आंदोलन; दोषींवर कारवाई करण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. ३० ः समाज कल्याण विभागाच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना अंतर्गत कणकवली विधानसभा मतदारसंघात वाटप केलेल्या लोखंडी डेस्क बेंच निधीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. तसेच या बेंचवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न टाकता त्यावर आमदार राणे यांचे नाव टाकल्याने हा बाबासाहेबांचा अपमान आहे. बेंच भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी करीत शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटातर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मक्लेश आंदोलन छेडले.
आंदोलकांच्या मते, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत समाज कल्याण विभागाच्या वतीने कणकवली विधानसभा मतदारसंघात २५० दलित वस्तीसाठी २ हजार लोखंडी डेस्क बेंच वाटप करण्यात आले. कोणत्याही ग्रामपंचायतीची मागणी नसताना समाज कल्याण विभागातर्फे आमदार राणेंच्या शिफारशीनुसार त्यासाठी अडीच कोटी रुपये खर्च केले; मात्र ३५०० किंमतीच्या असलेल्या लोखंडी डेस्क बेंचसाठी १२ हजार ५०० दाखवून प्रत्येक बेंचमागे ९ हजार रुपयांचा ज्यादा खर्च दाखविला आहे. त्यामुळे प्रत्येकी ९ हजारप्रमाणे सुमारे दीड कोटींचा भ्रष्टाचार लोखंडी डेस्क बेंच वाटपात केला आहे. डेस्क बेंचवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न टाकता आमदार राणे यांचे नाव टाकले असून, हा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या राष्ट्रपुरुषाचा अवमान केला आहे. डेस्क बेंच हे पावडर कोटेड नाहीत. त्यांना लगेच गंज पकडत असून, दलित वस्तीत वगळून सार्वजनिक जागेत हे डेस्क बसवले असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
------
समाज कल्याण विभागावर आरोप
सिंधुदुर्ग समाज कल्याण विभागाचा या भ्रष्टाचारात हात आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी कर्तव्यात कसूर केला असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा त्यांना विसर पडला आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून या प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. ज्या गावांमध्ये बेंच दिले आहेत, ते दलित वस्तीमध्ये न बसविता इतरत्र बसविले आहेत. त्यामुळे संबंधित ग्रामसेवक व सरपंचांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी जिल्हाप्रमुख संदेश पारकर, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, युवासेना प्रमुख सुशांत नाईक आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.