१६३९३
ट्रकखाली सापडून नांदगावात एक ठार
दुचाकींची धडक होताच उडाल्याने अपघात; एक गंभीर
सकाळ वृत्तसेवा
नांदगाव, ता. ४ ः देवगड-निपाणी राज्य मार्गावर नांदगाव तिठ्यानजीक वाशिनवाडी येथील धोकादायक वळणावर दोन दुचाकींच्या धडकेत झालेल्या अपघातात एक ट्रकखाली सापडून जागीच ठार झाला. दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. रमजान इमाम साटविलकर (वय ३७, रा. नांदगाव खालची मुस्लिमवाडी) असे मृताचे नाव आहे. अपघातानंतर दोन तास वाहतूक ठप्प होती. ही घटना आज दुपारी पावणेचारच्या सुमारास घडली.
अधिक माहिती अशी, रमजान साटविलकर हे दुचाकीने नांदगाववरून फोंडाघाटच्या दिशेने जात होते तर अर्जुन विलास जाधव (२४, रा. नांदगाव-वाशिनवाडी) हा नांदगाव तिठ्ठा येथे जात होता. दोन्ही वाहने देवगड-निपाणी राज्य मार्गावर नांदगाव तिठ्यानजीक वाशिनवाडी येथील धोकादायक वळणावर आली असता त्यांची समोरासमोर धडक झाली. धडकेत साटविलकर हे रस्त्यावर तर जाधव हा साईडपट्टीवर पडला. याच दरम्यान देवगड येथून चिरे घेऊन निपाणीच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकचे चाक साटविलकर यांच्या डोक्यावरून गेल्याने ते जागीच ठार झाले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत एकच गर्दी केली. ट्रकचालकने पळ काढत कणकवली पोलिस स्थानक गाठले. गंभीर जखमी जाधव याला नांदगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
अपघाताची माहिती मिळताच नांदगाव पोलिसपाटील वृषाली मोरजकर यांनी कणकवली पोलिस ठाण्यात वर्दी दिली. यानंतर घटनास्थळी कासार्डे आऊट पोस्ट व कणकवली पोलिसांनी धाव घेत अपघाताची माहिती घेत पंचनामा केला. यावेळेस कणकवली पोलिस निरीक्षक मारुती जगताप, पोलिस उपनिरीक्षक, महामार्ग वाहतूक पोलिस यांनी धाव घेत मदतकार्य केले. अपघातानंतर दोन तास वाहतूक ठप्प होती. यामुळेच दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. चिरे वाहतूक करणाऱ्या ट्रकना वेळीच आवर घाला, असे स्थानिकांकडून पोलिस निरीक्षक मारुती जगताप यांना सांगण्यात आले. साईडपट्टीवरील मोठ्या प्रमाणात गवत वाढल्याने संबंधित विभागाकडून तातडीने कापावे, अशा अनेक समस्या नागरिकांकडून सांगण्यात आल्या. या परिसरात तीव्र उतार असल्याने वाहन आवरत नसल्याने दोन्ही बाजूला स्पीड ब्रेकर घालण्यात यावेत, अशीही मागणी करण्यात आली.
कुटुंबावर आघात
मृत रमजान साटविलकर नांदगाव खालची मुस्लिमवाडी येथील रहिवाशी होते. त्यांचा मंडप व डेकोरेटर्सचा व्यवसाय होता. सध्या नवरात्रीचे उत्सव सुरू असल्याने त्यांना काही ठिकाणी ऑर्डरीही होत्या. ते मनमिळाऊ स्वभावाचे असल्याने त्याचा नांदगाव व परिसरात मोठा मित्रपरिवार होता. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, वडील, भाऊ, भावजय असा परिवार आहे. कुटुंबातील कमावती व्यक्ती गेल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.