केसरकरांकडून उद्योग आणण्याचे नाटक
एकनाथ नाडकर्णी ः ‘त्या’ कंपनीच्या भूमिपूजनाशी संबंध नाही
सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. ५ : पंधरा वर्षांत उद्योगांच्या बाता मारून शिक्षणमंत्री दीपक केसरकरांनी जनतेची चेष्टा केली आहे. आता निवडणुकीच्या तोंडावर आडाळी एमआयडीसीत उद्योग आणण्याचे नाटक ते करत आहेत. ज्या कंपनीच्या भूमिपूजनाची त्यांनी घोषणा केली आहे, त्याच्याशी केसरकरांचा काडीचाही संबंध नाही. त्यामुळे त्यांनी भूमिपूजनाच्या आडून स्वार्थाचे राजकारण करू नये, अशी टीका भाजप जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी यांनी केली.
त्यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, दीपक केसरकरांनी आता राजकारण थांबवावे. ज्या कंपन्या स्वतःहून आडाळीत येत आहेत, त्यांना आपले उद्योग उभारू दे. केसरकरांच्या अशा राजकारणामुळे येथील औद्योगिक क्षेत्र बदनाम होत आहे. त्यामुळे येणारे उद्योजकही माघारी परत जातील. त्यांच्या नाकर्तेपणामुळे उद्योजक आले नाहीत म्हणून जनता त्रस्त आहे. निवडणुका समोर आल्याने केसरकारांना आडाळी एमआयडीसीची उचकी लागली आहे. खासदार नारायण राणेंना प्रत्येक गोष्टीत विरोध करणाऱ्या केसरकरांनी त्यावेळी आडाळी एमआयडीसीलाही विरोध केला होता. आता तेच केसरकर राणेंना स्वार्थासाठी सोबत घेण्याची भाषा करतात. कदाचित राणेंचे मन मोठे असल्याने ते केसरकरांकडून झालेले राजकारण विसरले असतील; पण आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या मनातील वेदना आजही कायम आहेत. दहा वर्षांत दोन कोटींची गुंतवणूक ज्यांना आणता आली नाही, ते केसरकर चक्क ‘इंडस्ट्रीयल हब’ तयार करायला निघाले, यासारखा दुसरा विनोद नाही. आडाळी एमआयडीसी ‘फुल्ल’ करून आता त्यांना माटणेत एमआयडीसी आणायची आहे. उद्योगराज्य मंत्री सचिन आहीर यांना २०११ मध्ये माटणे येथे आणून मिनी एमआयडीसीचे गाजर दाखवले होते; पण येथे १०० एकर शासकीय जागेचा जावईशोध त्यांना कसा लागला, हेही हास्यास्पद आहे. त्यानंतर आम्ही तत्कालीन उद्योगमंत्री नारायण राणे यांच्याकडे आडाळी एमआयडीसीचा २०१३ मध्ये प्रस्ताव दिला. अवघ्या आठ महिन्यांत त्यांनी २८८ हेक्टर जागेवर एमआयडीसी मंजूर केली आणि केसरकरांची माटणे एमआयडीसी मात्र अद्याप घोषणेतच अडकली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.