‘सावंतवाडी’साठी
वैकुंठ रथाची मागणी
सावंतवाडी ः मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे सावंतवाडी, दोडामार्गसह वेंगुर्ले शहरात वैकुंठ रथ उपलब्ध करून द्यावेत, जेणेकरून त्यांचा फायदा आपत्कालीन परिस्थितीत होईल, अशी मागणी भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी निशांत तोरसकर यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत पालकमंत्री सावंतवाडी दौऱ्यावर आल्यानंतर त्यांच्याशी चर्चा करणार असून, याबाबतचा निर्णय तत्काळ घ्यावा, अशी मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तोरसकर यांनी याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेताना गाड्या उपलब्ध होत नाहीत. वाहन चालक मृतदेह नेतात; परंतु सर्वसामान्यांना तो खर्च परवडणारा नसतो. त्यामुळे याबाबत सकारात्मक धोरण ठरवावे आणि सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील तिन्ही तालुक्यांमध्ये हे वैकुंठ रथ उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी केली आहे.
---
तालुका निबंध स्पर्धेत
सम्राट पाटील प्रथम
वैभववाडी ः राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त आयोजित निबंध स्पर्धेत मांगवली येथील मधुकर सीताराम भुर्के विद्यालयाचा विद्यार्थी सम्राट पाटील याने तालुकास्तरावर माध्यमिक गटातून प्रथम क्रमांक पटकावला. शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त ही निबंध स्पर्धा घेण्यात आली. त्याचे शाळास्तरावर मूल्यमापन करून प्रत्येक विद्यालयातून तीन उत्कृष्ट निबंध तालुकास्तरावर मागविले होते. त्यांची तपासणी करून स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यामध्ये मधुकर सीताराम भुर्के विद्यालयात दहावीमध्ये शिकत असलेला विद्यार्थी सम्राट पाटील याने प्रथम क्रमांक पटकावला. विद्यालयाचे सहायक शिक्षक एस. एस. पाटील यांचा सम्राट हा चिरंजीव आहे.
---
‘शब्दांगण’मार्फत
वेंगुर्लेत पुस्तक प्रदर्शन
वेंगुर्ले ः वाचन संस्कृती वृद्धिंगत होण्यासाठी सातत्याने पुस्तक प्रदर्शन आयोजित करणाऱ्या शब्दांगण, पुणे या संस्थेतर्फे रामेश्वर मंदिरनजीकच्या वेंगुर्ले नगर वाचनालय सभागृहात ३ ते १३ ऑक्टोबरदरम्यान सकाळी १० ते रात्री ८ वेळेत पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. या प्रदर्शनात कथा, कादंबरी, चरित्र, आत्मचरित्र, ललित, नाटक, बालवाङ्मय, ऐतिहासिक, अनुवादित, महिलांसाठी आदी विषयांची आणि रणजित देसाई, वि. स. खांडेकर, व. पु. काळे, विश्वास पाटील, शिवाजी सावंत, व्यंकटेश माडगुळकर, द. मा. मिरासदार, शंकर पाटील, रत्नाकर मतकरी, सुधा मूर्ती, आनंद यादव आदी नामवंत लेखकांची हजारो पुस्तके आहेत. लाभ घ्यावा, असे आवाहन शब्दांगण पुणे संस्थेचे संचालक लक्ष्मण राठिवडेकर केले आहे.
-------------
शिरवंडे विद्यालय
परिसरात स्वच्छता
कणकवली ः त्रिमूर्ती विकास मंडळ, मुंबई संचलित त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय, शिरवंडेच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छता पंधरवडा उपक्रमानिमित्त किर्लोस येथील खाण कामगारांच्या घरी जाऊन स्वच्छता केली. यावेळी स्वच्छतेचे महत्त्व त्यांनी पटवून सांगितले. या निमित्ताने चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. शालेय परिसर, स्वच्छतागृह परिसरात स्वच्छता करण्यात आली. हायस्कूल ते किर्लोस खाण कामगार वस्तीपर्यंत स्वच्छता फेरी काढली. मुख्याध्यापक वामन तर्फे आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.