शिक्षक बदल्या वादाच्या भोवऱ्यात
सुरेश ऐनारकर ः कमी पटसंख्येचा निकष धाब्यावर
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ०५ : तालुका पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून कामगिरीवर शिक्षक बदली करताना कमी पटसंख्येचा निकष धाब्यावर बसवल्याचा आरोप करत करकचे सरपंच सुरेश ऐनारकर यांनी या बदल्यांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.
नऊ पटसंख्येच्या काही शाळांमधील शिक्षकांची कामगिरीवर बदली होत असताना त्यापेक्षा कमी असलेल्या पाच पटसंख्येच्या शाळांमधील शिक्षकांना अभय देण्यात आल्याकडे लक्ष वेधताना कामगिरीवर शिक्षक नियुक्ती करताना प्रशासनाने नेमका कोणता निकष लावला? असा सवाल ऐनारकर यांनी उपस्थित केला. त्यामुळे कमी पटसंख्येच्या निकषावर कामगिरीवर झालेल्या शिक्षक बदल्या संशयासह वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत.
कमी पटसंख्येच्या निकषाखाली कामगिरीवर करण्यात आलेल्या शिक्षक बदल्यांमुळे दुर्गम भागातील शाळांमध्ये शिकणऱ्या मुलांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा झाला आहे. त्यामुळे या बदल्या तत्काळ थांबवाव्यात अन्यथा मुले अन् पालकांसमवेत पंचायत समितीच्या शिक्षण विभागावर धडक मोर्चा काढण्याचा इशारा ऐनारकर यांनी दिला आहे.
जिल्हा परिषदेकडून काही महिन्यांपूर्वी नवीन शिक्षक भरती करण्यात आली असून, या भरतीतून अनेक शिक्षक तालुक्यामध्ये नियुक्त झाले आहेत. त्यानंतरही अनेक शाळांमधील शिक्षकपदे रिक्त राहिली आहेत. अशातच, कंत्राटी पद्धतीनेही डीएड्, बीएड्धारकांची शिक्षक म्हणून नियुक्ती करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यापूर्वी, कमी पटसंख्येच्या शाळांमधील शिक्षकांची मोठ्या पटसंख्येच्या शाळांमध्ये प्रशासनाकडून कामगिरीवर नियुक्त्या करण्यात आल्या आहेत; मात्र, पटसंख्येच्या निकषावर शिक्षकांची कामगिरीवर नियुक्ती करण्याच्या प्रक्रियेवर सरपंच ऐनारकर यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. पटसंख्येच्या निकषांवर कामगिरीवर शिक्षक नियुक्ती करताना सर्वांना समान न्याय मिळणे गरजेचे असताना शिक्षण विभागाकडून नियुक्त्या करताना पटसंख्येचा निकषच धाब्यावर बसवल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. या बदल्या तत्काळ थांबवाव्यात अन्यथा त्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.
-----
शाळा एकशिक्षकी झाल्यास काय?
कमी पटसंख्येच्या अनेक शाळा असल्या तरी त्या दुर्गम भागामध्ये आहेत. अशा शाळा एकशिक्षकी झाल्यास आणि त्या शिक्षकाला अचानक प्रशासकीय कामासाठी जावे लागल्यास त्या शाळांमधील शिक्षणाचे काय? विद्यार्थ्यांना शिकवणार कोण? असे विविध प्रश्न उपस्थित करताना कामगिरीवरील शिक्षक बदल्या करताना शिक्षण विभागाकडून कोणाचे तरी हितसंबंध जोपासले तर जात नाहीत ना? असा संशयही ऐनारकर यांनी व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.