16456
‘राजकोट’ पर्यटकांसाठी खुला करा
जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी ः पर्यटक, व्यावसायिक महासंघाचे निवेदन
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ५ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावरील शिवपुतळा दुर्घटनाग्रस्त झाल्यानंतर राजकोट किल्ला पर्यटक व शिवप्रेमींसाठी बंद केला आहे. याबाबत पर्यटक व्यावसायिक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी अनिल पाटील यांची भेट घेऊन राजकोट किल्ला पर्यटक व शिवप्रेमींसाठी खुला करण्याची मागणी केली.
याबाबतचे निवेदन पर्यटन महासंघाचे अध्यक्ष विष्णू मोंडकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
निवेदनात म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांनी १६६४ मध्ये उभारलेला राजकोट किल्ला पूर्णपणे नष्ट झाला होता. राज्याच्या माध्यमातून जिल्ह्यातील हा ऐतिहासिक राजकोट किल्ला जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून पुनर्जीवित करण्यात आला. सर्व शिवप्रेमींसाठी ही अभिमानास्पद बाब आहे. राजकोट किल्ला उभारणी झाल्यावर पर्यटन व्यावसायिक महासंघातर्फे सर्व शिवप्रेमी, जिल्हा प्रशासन, स्थानिक ग्रामपंचायतींना सोबत घेऊन जिल्ह्यातील ३० गडकिल्ल्यांवरील माती तसेच शिवनेरी व रायगड गडांवरील माती कलश यात्रेच्या माध्यमातून आणून भूमी कलश विधिवत पद्धतीने पालकमंत्री चव्हाण यांच्या हस्ते राजकोट किल्ल्यावर स्थापित करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेले गड-किल्ले शिवप्रेमींसाठी प्रेरणादायी असून, राजकोट किल्ल्यालाही मोठा इतिहास आहे. त्याजागी नवीन शिवपुतळा उभारणीसाठी काही महिन्यांचा कालावधी जाऊ शकतो. तोपर्यंत राजकोट ऐतिहासिक किल्ला शिवप्रेमींच्या दर्शनासाठी बंद न ठेवता ज्या ठिकाणी सर्व गडकिल्ल्यांची भूमी कलश स्थापित केला आहे, त्याठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात शिवप्रतिमा (फोटो) स्थापित करून राजकोट किल्ला शिवप्रेमींसाठी खुला करावा, अशी विनंती पर्यटन व्यावसायिक महासंघातर्फे करण्यात आली. यावर जिल्हाधिकारी पाटील यांनी लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले. याबाबतची माहिती मोंडकर यांनी दिली. या भेटीदरम्यान किशोर दाभोलकर, सहदेव साळगावकर, रवींद्र खानविलकर, मंगेश जावकर, मिलिंद झाड, रामा चोपेडेकर, मनोज खोबरेकर, दर्शन वेंगुर्लेकर आदी पर्यटन व्यावसायिक उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.