17753
निवडणुकांमुळेच पुलाच्या बतावण्या
सुशांत नाईक ः मोंड-वानिवडेप्रश्नी आमदार राणेंवर टीका
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. ९ ः मोंड-वानिवडे (ता.देवगड) पुलाची स्थानिकांची अनेक वर्षाची प्रलंबित मागणी आहे. तत्कालीन खासदार विनायक राऊत आणि दीपक केसरकर यांनी त्यावेळी स्थानिकांची भेट घेऊन महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच पुलासाठी सुमारे पाच कोटी रूपये मंजूर केले होते. मात्र, दहा वर्षे नीतेश राणे आमदार राहूनही गामस्थांच्या मागणीकडे दुर्लक्ष करून आता निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पुलाबाबत ते बोलत असल्याचा टोला ठाकरे गट युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी पत्रकार परिषदेत लगावला. जनहिताच्या अनेक प्रश्नांकडे श्री. राणे यांची डोळेझाक असल्याची टिप्पणीही त्यांनी यावेळी केली.
येथील संपर्क कार्यालयात श्री. नाईक पत्रकारांशी बोलत होते. यावेळी युवासेना तालुकाप्रमुख गणेश गावकर, नगरसेवक निवृत्ती उर्फ बुवा तारी, माजी नगरसेविका हर्षा ठाकूर, निनाद देशपांडे आदी उपस्थित होते. अलीकडेच आमदार श्री. राणे यांनी पत्रकार परिषदेत मोंड वानिवडे पुलाच्या अनुषंगाने माहिती दिली होती. त्याला श्री. नाईक प्रत्युत्तर देताना म्हणाले, ‘‘मोंड-वानिवडे पुलाची ग्रामस्थांची अनेक वर्षाची मागणी होती. त्यावेळी पाण्यात उतरून आंदोलन केले गेले होते. तत्कालीन खासदार विनायक राऊत आणि दीपक केसरकर यांनी स्थानिकांची भेट घेतली होती. महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्यावेळी पुलासाठी सुमारे पाच कोटी रूपये मंजूर केले होते. मात्र, सीआरझेड आणि कांदळवन यामुळे पुल मार्गी लागण्यात अडथळे आले होते. यासाठी गेले दहा वर्षे आमदार राहिलेल्या श्री. राणे यांचा कोणताही संघर्ष नाही किंवा प्रयत्नही नाही. आता निवडणूका डोळ्यासमोर ठेवून श्री. राणे पहिल्या टप्याची परवानगी उपलब्ध झाली आहे, आता दुसऱ्या टप्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगत आहेत. मात्र, त्यांची ही निव्वळ बतावणी आहे. पुलाच्या पहिल्या टप्याच्या परवानगी संदर्भातील पत्र मार्चमध्ये आले असताना श्री. राणे यांना ते समजण्यासाठी ऑक्टोबर उजाडला. म्हणजे त्यांना त्याची माहितीच नव्हती, असे यावरून दिसते. ग्रामस्थांच्या मुलभूत प्रश्नांऐवजी रस्ते करण्यावर त्यांचा भर असतो.’’
...............
कोणतेही विकासकाम राणेंना जमले नाही
अप्पासाहेब गोगटे आणि जयदेव कदम यांनी वारंवार मागणी केलेला इळये ते वळकूवाडी पूल आमदार राणे यांना आजवर करता आला नाही. देवगड जामसंडेचा पाणीप्रश्न त्यांना अद्याप सोडवता आला नाही. नगरपंचायतीमध्ये ठाकरे गटाची सत्ता असताना पाणी आरक्षण दाखला मिळवला होता. मात्र, पुढे योजनेसाठी आमदारांनी काही केले नाही. त्यामुळे जनतेच्या प्रश्नाला बगल देऊन शाश्वत कोणतेही विकासकाम त्यांना जमले नसल्याची टीका श्री. नाईक यांनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.