सिंधुदुर्गात तीन नवीन मतदान केंद्रे
‘विधानसभे’साठी तयारी ः मतदानाचा टक्का वाढण्याची अपेक्षा
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ९ ः सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील मतदान केंद्रात वाढ करण्यात आली आहे. तीन मतदान केंद्रे वाढविण्यात आल्याने ९२१ मतदान केंद्रे झाली आहेत. यामुळे मतदान केंद्रातील गर्दी कमी होतानाच मतदानाचा टक्का वाढेल, असे अपेक्षित आहे.
मतदार याद्या अपडेट नसणे, बूथ बदलणे तसेच अनेकांचे नावच यादीतून गायब झाल्याचे प्रकार झालेले या समस्यांचा सामना मतदारांना करावा लागला. ही स्थिती पुन्हा ओढावू नये, यासाठी निवडणूक विभागाने सतर्कता बाळगत मतदार याद्या अपडेट केल्या. जिल्ह्यात यापूर्वी ९१८ मतदान केंद्रे होते. त्यात ३ नवीन मतदान केंद्रे वाढवीत मतदारांना सोयीस्कर ठरेल, याची काळजी घेण्यात आली आहे. त्यामुळे जास्त मतदार संख्या असलेल्या मतदान केंद्रांवर विधानसभा निवडणुकीत मतदारांचा गोंधळ उडणार नसल्याची निवडणूक विभागाला खात्री आहे.
जिल्ह्यात ६ लाख ७२ हजार ५३ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. भारत निवडणूक आयोगाच्यावतीने विशेष म्हणजे, बीएलओमार्फत स्थानिकस्तरावर पुर्नरीक्षण कार्यक्रम राबवून नावात बदल, फोटो बदल करणे, नवीन मतदार कार्ड उपलब्ध करून देणे, यासाठी मोहीम राबविण्यात आली होती. १ जलै २०२४ या अहर्ता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविला होता. यानुसार अंतिम मतदार यादी ३० ऑगस्टला संबंधित विधानसभा क्षेत्रातील सहायक मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयात प्रसिद्ध केली. जिल्हास्तरावरसुद्धा या याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. विधानसभा निवडणुकीचे बिगुल कधीही वाजू शकते, अशी स्थिती आहे. विजया दशमीनंतर निवडणूक आयोग याची कधीही घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आपल्या पूर्वतायारीला वेग घेतला आहे. लोकसभा निवडणूक मे महिन्यात झाल्याने त्याचा अनुभव व तीच यंत्रणा जिल्हा निवडणूक विभागाकडे उपलब्ध आहे. त्याच यंत्रणेला प्रशिक्षण देण्याचे काम निवडणूक विभागाकडून केले जात आहे. त्यामुळे मतदान केंद्रातील संभाव्य अधिकारी, कर्मचारीही सज्ज झाले आहेत.
---------------------
११९७२ नवीन मतदार
जिल्ह्यात ३० ऑगस्टला जाहीर केलेल्या मतदार यादीत ११ हजार ९७२ नवीन मतदारांची भर पडली आहे. यात ४ हजार ६६६ पुरुष आणि ७ हजार ३०६ महिला मतदारांचा समावेश आहे. एकूण मतदार ६ लाख ७२ हजार ५३ मतदार असून त्यात पुरुष मतदार ३ लाख ३३ हजार १९० तर महिला मतदार ३ लाख ३७ हजार ८६२ व तृतीयपंथी १ असा समावेश आहे.
-----------------------
गर्दी टाळण्यासाठी केंद्रांत वाढ
लोकसभा निवडणुकीदरम्यान अनेक मतदान केंद्रावर मतदानासाठी नागरिकांची गर्दी उसळली होती. उन्हाळ्याचे दिवस होते. त्यामुळे मतदारांना उन्हाचा मोठा त्रास सहन करावा लागला होता. मतदान केंद्रावरील गर्दी टाळतानाच मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मतदान केंद्रे वाढविण्यात आलेली आहेत. याचा फायदा मतदानाची टक्केवारी वाढण्यात होईल, अशी अपेक्षा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.