पन्हाळेकाजीत मगरीने
केला गायीवर हल्ला
ग्रामस्थ भयभीत; वनविभागाकडून पंचनामा
गावतळे, ता. ९ : दापोली तालुक्यातील बौद्ध लेण्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या पन्हाळेकाजी या गावातील कोडजाई नदीकाठी चरणाऱ्या गायीवर मगरीने हल्ला चढवला. गायीच्या पायाचे लचके तोडल्यामुळे एक पाय तुटला आहे. त्यामुळे गावातील नागरिक भयभीत झाले आहेत. हा प्रकार मंगळवारी (ता. ८) सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास घडला.
कोडजाई नदीकिनारी मंगळवारी होळेश्वरवाडी तेथील पाणवठ्याजवळ गावातील गुरे चरत होती. संध्याकाळच्या सुमारास नदीकाठी चरत असलेली जनार्दन सहदेव जाधव यांची गाय तहान लागली म्हणून नदीच्या काठावर पाणी पिण्यास गेली. त्याचवेळी अचानक एका मोठ्या मगरीने गायीला पाण्यात खेचून घेतले. एक पाय व मानेखालील भागात चावे घेतले. हा प्रकार समजताच तिथे जवळच असलेल्या प्रणील जनार्दन जाधव यांनी मोठमोठ्या दगडी उचलून मगरीवर फेकल्या. त्यामुळे गायीला सोडून मगर पळून गेली. गायीला बाहेर काढल्यावर तिचा एक पाय मगरीने तोडल्याचे दिसले तसेच मानेखाली मोठ्या प्रमाणत रक्त येत आहे हे लक्षात आले. ही घटना वनविभागाला कळवण्यात आली. वनविभागाचे वनपाल खोत यांनी जखमी झालेल्या गायीची पाहणी केली. शासकीय पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्यामुळे खासगी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावून गायीवर उपचार करण्यात आले. या सर्व प्रकारामुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.
कोट
गेले तीन वर्षे वनविभागाकडे पत्रव्यवहार करीत आहोत; पण मगरींविषयी ठोस उपाय केलेले नाहीत. आतापर्यंत बारांहून अधिक कुत्री मगरींनी भक्ष्य बनवले आहेत. अनेक गुरे जखमी झालेली आहेत. दोन ग्रामस्थांवरही हल्ला केला आहे. त्यामुळे या मगरींना येथून दूर सोडण्यात यावे, अशी मागणी केली होती. कोडजाई नदी स्थानिकांसाठी रोजगाराचे साधन होती. आठ महिने भाजी पीक घेणे आणि चार महिने शेती यावर येथील लोकांचा उदरनिर्वाह अवलंबून असतो. आता महिला नदीवर कपडे धुण्यासाठी जाण्यासही घाबरतात. भाजी पीक घेणे बंद झाले आहे.
- राजेंद्र जाधव, ग्रामस्थ, पन्हाळेकाजी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.