रत्नागिरीत भाजपचा उमेदवारच नाही
कार्यकर्त्यांतून नाराजी ः शिवसेनेला चार जागा; सिंधुदुर्गात भाजपला एकच जागा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ९ ः आगामी विधानसभा निवडणुकीत रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भाजपला एकच जागा लढण्याचे संकेत मिळाले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेला ४, तर राष्ट्रवादी काँग्रेसला चिपळूणची जागा सोडली जाणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १ जागा भाजप लढणार असल्याचे समजते. महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी तसे संकेत दिले. यामुळे भाजपमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे.
लोकसभा निवडणुकीत यश मिळाले आहे तरी विधानसभा निवडणुकीत हमखास निवडून येणाऱ्या जागांवर एकमत झाले आहे. त्यामुळे भाजप एक पाऊल मागे येताना दिसत आहे. भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांमधून यामुळे नाराजीचा सूर असून, मैत्रीपूर्ण लढतींची शक्यता वर्तवली जात आहे. दापोलीत योगेश कदमांविरोधात भाजपची नाराजी आहे.
गुहागरमध्ये माजी आमदार विनय नातूंनीही लढण्याची मागणी केली आहे. तशी तयारी नातू यांनी केली आहे. कोकणात एकच जागा लढवणार का, या प्रश्नाला उत्तर देताना भाजपचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिलेल्या उत्तरातून भाजप बॅकफूटला गेल्याचा निष्कर्ष काढण्यात येत आहे. आगामी निवडणूक महायुती म्हणून लढली जाईल. प्रत्येक जागा जिंकून आणणे हे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी ठरवलेले आहे. त्यामुळे कोणीही मिठाचा खडा टाकला तरी महायुती जिंकणे हे महाराष्ट्राच्या जनतेसाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे भाजपचा कार्यकर्ता हा विचाराने आणि पूर्ण प्रेरित झालेला कार्यकर्ता आहे. त्याला संघटना कळते, त्याला वरिष्ठांनी हे का केले आहे, या दिशेने का जावे लागले हे समजते. त्यामुळे तो महायुतीच्या दिशेने नक्की जाईल, असे सूचक विधान त्यांनी केले. त्यामुळे कोकणात भाजप नेमक्या किती जागा लढवणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. भाजपला रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या आठ जागांचा विचार करता केवळ एकच जागा सुटणार, अशी चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर रवींद्र चव्हाण यांनी दिलेले उत्तर आणि केलेले विधान हे लक्षवेधी आहे. नीलेश राणे यांच्या शिवसेना पक्षात प्रवेशाबाबत बोलणे उद्योगमंत्री उदय सामंत आणि बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी टाळले.
दृष्टिक्षेपात
नीलेश राणेंच्या शिवसेना प्रवेशावर मौन
गुहागरात विनय नातूंचे काय होणार
रत्नागिरीत मैत्रीपूर्ण लढत होणार का
भाजपमध्ये नाराजीचा सूर
बाळ मानेंनी बोलाविली
आज तातडीने बैठक
महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या जागांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे भाजपमध्ये नाराजीचा सूर आहे. माजी आमदार बाळ माने यांनी देखील निवडणुकीची तयारी केली आहे. मैत्रीपूर्ण लढत होण्यापर्यंत चर्चा सुरू आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बाळ माने यांनी गुरुवारी (ता. १०) तातडीची प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकारिणीची बैठक बोलावल्याचे समजते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.