‘बाउन्सर’प्रकरणी संशयित मोकाट
आठ जणांवर गुन्हे; सिंधुदुर्गनगरी पोलिसांकडून तपास
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ९ ः जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागाच्या प्रवेशद्वारासमोर अनधिकृतपणे बसून कार्यालयात येणाऱ्या व्यक्तींकडून कागदपत्रांची तपासणी बाउन्सरने केल्यानंतर घडलेल्या घटनेप्रकरणी सिंधुदुर्गनगरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सार्वजनिक ठिकाणी मारामारी व धक्काबुक्की करून शांततेचा भंग केल्याप्रकरणी पोलिसांनी एकूण आठ संशयितांवर गुन्हा नोंद केला आहे. मात्र, अद्याप कोणालाही अटक केलेली नाही.
जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत सावंतवाडी येथील पंचायत समिती इमारत बांधकाम टेंडर मॅनेज करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात बाउन्सर आणल्याचा आरोप करीत ठाकरे शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांच्यासह शिवसेना कार्यकर्ते आणि बाउन्सर यांच्यात झटापट झाली होती. पोलिसांनी मध्यस्थी करून बाउन्सरना ताब्यात घेतले होते, तर काहींना शोधून आणून पोलिसांच्या ताब्यात दिले होते. या प्रकाराने जिल्ह्यात खळबळ माजली होती. या प्रकरणी संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी आमदार वैभव नाईक यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केली होती. त्यानंतर ठाकरे शिवसेनेने जिल्हा परिषदेसमोर आंदोलनही केले होते. या प्रकरणी ३० सप्टेंबरला दुपारी १ ते २ या वेळेत जिल्हा परिषद इमारतीत झालेल्या गोंधळप्रकरणी चौकशी करून पोलिसांनी योग्य कारवाई करावी, अशी तक्रार जिल्हा परिषदेकडून पोलिसांत दिली होती. त्या अनुषंगाने पोलिसांनी केलेल्या तपासात उपलब्ध झालेल्या माहितीच्या आधारे पोलिस शिपाई प्रथमेश ओरोसकर यांनी याप्रकरणी तक्रार दिली असून, पोलिसांसमक्ष सार्वजनिक धक्काबुक्की करून शांततेचा भंग केल्याप्रकरणी ऑल्विन पिंटो, क्रिस्तोफर डिसोजा, फयाद मुजावर, रूपेश राठोड या संशयित बाउन्सरसह उत्तम लोके, जयेश धुमाळे, लक्ष्मण हनिकोड, प्रथमेश सावंत या विरोधी गटातील चार अशा एकूण आठ संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल वरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राजेंद्र दळवी अधिक तपास करीत आहेत.
--------------------
कोट
दिलेल्या तक्रारीनुसार चौकशी करून एकूण आठ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अधिक तपास सुरू असून, लवकरच कारवाई केली जाईल.
- राहुल वरोटे, सहाय्यक पोलिस निरीक्षक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.