19667
वैभववाडी ः भातपिकाला अशाप्रकारे कोंब फुटण्यास सुरुवात झाली आहे.
भातपिकांना फुटताहेत कोंब
ईशान्य मोसमीचीही झोड; शेतकरी आर्थिक संकटात
सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. १७ ः नैर्ऋत्य मोसमीने गेल्या पंधरा दिवसांपासून झोडपून काढले असताना आता ईशान्य मोसमीने देखील जिल्ह्याला झोडपण्यास सुरूवात केली आहे. गेले दोन दिवस जिल्ह्याच्या बहुतांशी भागात विजांच्या कडकडाटांसह जोरदार पाऊस पडत असून या पावसामुळे भातपिकांना कोंब फुटण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे भातपिकांचे नुकसान अटळ मानले जात आहे.
नैर्ऋत्य मोसमीने सहा जूनला दाखल होत २४ जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र व्यापला. यानंतर ६ ते २० जुलैपर्यंत अतिवृष्टी झाली. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी नैर्ऋत्य मोसमी जोरदार बरसला. तब्बल चार महिने आणि १४ दिवसांनंतर १५ ऑक्टोबरला मॉन्सूनचे देशातून निर्गमन झाले. नैर्ऋत्य मोसमी परतल्यानंतर पावसाचे प्रमाण कमी राहील, या आशेवर असलेल्या शेतकऱ्यांची ईशान्य मोसमी पावसाने निराशा केली आहे. गेले दोन दिवस या पावसाने जिल्ह्याच्या अनेक भागाला अक्षरक्षः झोडपून काढले आहे. बुधवारी (ता. १६) सायंकाळी सहाला सुरू झालेला पाऊस रात्री उशिरापर्यंत बरसत होता. आज पहाटेपासून विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पाऊस वैभववाडी, कणकवली तालुक्यांमध्ये झाला. सकाळी दहापर्यंत पाऊस सुरू होता. त्यानंतर पाऊस थांबला असला तरी जिल्हाभर पावसाचे वातावरण आहे.
सततच्या पावसामुळे भातपीक संकटात आहे. जिल्ह्यातील ९० टक्के भातपीक परिपक्व असून पहिल्या टप्प्यात लागवड केलेले ३० टक्के भातपीक नुकसानीच्या उंबरठ्यावर आहे. यातील काही पीक जमिनीला लगटले आहे, तर काही ठिकाणी उभ्या पिकाला कोंब फुटण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे या पिकांचे नुकसान आता अटळ मानले जात आहे. त्यातच पावसाचे प्रमाण कायम राहिल्यास मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.
पाच टक्के पिकांची कापणी नाही
जिल्ह्यातील ९० टक्के पीक कापणीयोग्य आहे; परंतु पाच टक्के पिकांची देखील कापणी झालेली नाही. नवरात्रौत्सवानंतर गतीने कापणी केली जाते; परंतु पावसाअभावी कापणी रखडली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.