19674
स्वरचित काव्य स्पर्धेत
मैत्रेयी बांदेकर प्रथम
मालवणात आयोजन ः वाचन मंदिराचा पुढाकार
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १७ ः येथील नगर वाचन मंदिरच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय कवी (कै.) शरद साटम स्मृती स्वरचित काव्य स्पर्धेत मैत्रेयी बांदेकर हिने प्रथम क्रमांक पटकाविला.
स्पर्धा संस्थेच्या सभागृहात आयोजित केली होती. या स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन श्री देवी सरस्वती व कवी शरद साटम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे कार्यवाह नागेश कदम, परीक्षक ज्येष्ठ साहित्यिक रवींद्र वराडकर, अक्षय सातार्डेकर हे उपस्थित होते. १५ ऑक्टोबरला डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन वाचन प्रेरणा दिन म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येतो. ग्रंथालयाच्या वतीने यादिवशी डॉ. कलाम यांचे प्रतिमा पूजन व काल (ता. १६) याचाच एक भाग म्हणून जिल्हास्तरीय काव्य स्पर्धा झाली. प्रास्ताविकाच ग्रंथपाल संजय शिदी म्हणाले, "सुप्रसिद्ध कवी शरद साटम हे आपल्या मालवणचे कवी आहेत. मालवणातल्या चारीवडे या गावी त्यांचा ११ ऑक्टोबर १९३९ ला जन्म झाला. त्यांचे शालेय शिक्षण भंडारी हायस्कूलमध्ये झाले. १९५६ पासून त्यांनी कविता लेखनाला सुरुवात केली. त्यांचे ''गाज'', ''संभवी'' व ''छळवाद'' असे तीन काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत."
यावेळी रवींद्र वराडकर यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्याबद्दलची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. काव्य स्पर्धेमध्ये द्वितीय-नारायण धुरी, तृतीय-प्रकाश पाटील, उत्तेजनार्थ प्रथम-भूषण दत्तदास, द्वितीय-अंजुषा पिल्लई यांनी यश संपादन केले. परीक्षक अक्षय सातार्डेकर यांनी स्पर्धकांना स्पर्धेविषयी मार्गदर्शन केले. यशस्वी स्पर्धकांना अनुक्रमे ७००, ५००, ३०० रुपये, प्रशस्तिपत्रके व कवी शरद साटम यांचा ''छळवाद'' हा काव्यसंग्रह देऊन गौरविण्यात आले. सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली. या स्पर्धेला जिल्हाभरातून बहुसंख्य स्पर्धक उपस्थित होते. या स्पर्धेचे सूत्रसंचालन श्रेया चव्हाण यांनी केले व या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रतिभा पेडणेकर व रमाकांत जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.