दरोड्याच्या प्रयत्नातील
दोघांना २ वर्षे कारावास
सहा महिन्यांत सुनावणी ः राजापूर पोलिसांचे यश
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १७ ः मुंबई-गोवा महामार्गावर पाच महिन्यांपूर्वी दरोड्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना राजापूरच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी २ वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली. त्यांना शिक्षा होण्यासाठी राजापूर पोलिसांनी विशेष प्रयत्न केले असून, सहा महिन्यांत त्यांना शिक्षा झाली आहे. दरोड्याचा प्रकार मे २०२४ रोजी घडलेला होता. अजय माणिक घेगडे (राजापूर माठ, मूळ रा. ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर), दीपक बाळासाहेब श्रीमंदीलकर (रामलिंग, ता. शिरूर, जि. पुणे) असे शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-गोवा महामार्गावरील ओणी येथे दोन दुचाकीवरून आलेल्या तिघांनी चारचाकी वाहनांना धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ओरडा झाल्यामुळे तिघा तरुणांनी तेथून पळ काढला. ते ओणी येथून अणुस्कुरा घाटमार्गे कोल्हापूरच्या दिशेने दुचाकीवरून पळाले. याबाबतची माहिती रायपाटण पोलिसांना मिळाल्यानंतर अणुस्कूरा चेकपोस्ट येथे पोलिसांनी कडक नाकाबंदी केली. त्याचवेळी तिघे संशयित तरुण मोटारसायकलवरून अणुस्कुरा चेकपोस्टवर आले. तेथे नाकाबंदी असल्याचे पाहून भीतीने त्यांनी दुचाकी तिथेच ठेवली आणि येरडव, अणुस्कुरा जंगलाच्या दिशेने धूम ठोकली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी राजापूर पोलिस ठाण्याला भेट दिली. त्यानंतर पोलिस अधिकारी व अंमलदार, राज्य सुरक्षा दल (आरसीपी) आणि शिघ्र कृती दलाचे (क्युआरटी) अंमलदार, श्वानपथक तसेच येरडव आणि पांगरी गावातील ग्रामस्थांची वेगवेगळी पथके तयार करून घाटातील जंगलामध्ये संशयितांचा कसून शोध घेतला. अणुस्कुरा चेकपोस्ट व रायपाटण दूरक्षेत्र येथे नाकाबंदी करण्यात आली. सर्व वाहनांची पोलिसांमार्फत कसून तपासणी करण्यात आली. जंगलात श्वानपथकामार्फत शोध घेण्यात आला. या शोधमोहिमेमध्ये येरडव व पांगरीच्या ग्रामस्थांनी पोलिसांना मदत केली. त्यावेळी एक संशयित सापडला. त्यानंतर इतर संशयित आरोपी सापडले. त्यांची कसून चौकशी केली असता, गुन्ह्यासाठी वापरलेले लायटर-पिस्टल, मोटारसायकल असा सुमारे २ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. सबळ पुरावे असल्यामुळे न्यायालयाने त्यांना २ वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.