१९६३९
माने, बने, महाडिकांमध्ये गुफ्तगू
तर्कवितर्कांना उधाण ः सक्षम उमेदवारासाठी हालचाली
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १७ : रत्नागिरीत विधानसभा मतदारसंघात परिवर्तनासाठी सक्षम उमेदवार दिला पाहिजे, या मुद्द्यावर उद्धव ठाकरे गटाचे नेते राजेंद्र महाडिक आणि उदय बने यांच्याशी माजी आमदार बाळ माने यांची बंद दाराआड चर्चा झाली. विद्यमान मंत्री उदय सामंत यांच्यासमोर सक्षम पर्याय देऊन परिवर्तन करण्याबाबत ठाकरे गटाकडून जय्यत तयारी सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
भाजपचे माजी आमदार बाळ माने कोठेही जाणार नाहीत, असे वक्तव्य रत्नागिरी दौऱ्यावर आलेल्या भाजपच्या नेत्या आमदार चित्रा वाघ यांनी काल केले होते. त्यानंतर २४ तासांतच माने यांची ठाकरे सेनेतर्फे विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या दोन प्रमुख शिलेदारांची भेट घेतल्याची माहिती पुढे आल्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आले आहे. माने ठाकरे सेनेत जाणार, अशी आवई काही दिवसांपूर्वी उठवण्यात आली होती. याला माने यांनी दुजोरा दिला नसला तरीही एका मेळाव्यात आपण चाललो आहोत, असे वक्तव्य केले होते. त्यामुळे माजी आमदार बाळ माने यांची ठाकरे गटाचे नेते राजेंद्र महाडिक आणि उदय बने यांच्याशी बंद दाराआड झालेली चर्चा हा ट्विस्ट असल्याचे बोलले जात आहे.
विधानसभा निवडणुकीत बाळ माने यांचा तीनवेळा पराभव झाला आहे. यापूर्वी भाजप-शिवसेना युतीमुळे ठाकरे गटातील अनेकांशी मानेंचे जवळचे संबंध आहेत. त्यातूनच ते ठाकरे गटात प्रवेश करतील, असा अंदाज बांधला जात आहे; मात्र ठाकरे सेनेतून विरोध होत असल्यामुळे माने भाजपतच राहून आणखी वेगळा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या चर्चेबाबत अधिकृत माहिती देण्यास तिन्ही पदाधिकाऱ्यांनी नकार दिला. निवडणुकीत सर्वच गोष्टी उघड करायच्या नसतात, असे एका पदाधिकाऱ्याने सांगितले.
चौकट
ठाकरेंकडे कार्यकर्त्यांची ताकद
युती तुटल्यानंतर २०१४ मध्ये उदय सामंत यांच्या रूपाने रत्नागिरीत शिवसेनेचा पहिला आमदार झाला. त्यानंतर पुन्हा युती होऊन २०१९ ला सामंत धनुष्यबाणाच्या निशाणीवर निवडून आले. त्यानंतर राज्यात सत्तांतर झाले आणि भाजप, शिंदे-अजित पवार एकत्र आले. राजकीय भूकंप झाला आणि शिवसेना फुटली. सध्या ठाकरे सेनेकडे सत्ता नाही, आमदारही नाहीत; परंतु कार्यकर्त्यांच्या बळावर ते निवडणुकीला सामारे जाणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.